‘मोप’साठी अतिरिक्त जमीन संपादनास मंजुरी

0
216

>> मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोप येेथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २३६७ चौ. मी. एवढी अतिरिक्त जमीन संपादित करण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच विमानतळाची धावपट्टी ३७५० मीटर ऐवजी ३५०० मीटर एवढी करण्याचा निर्णय यावेळी झाला. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता १५० वरून २५० टीपीडी एवढी वाढवण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर मडगाव-वास्को रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणासाठी माजोर्डा येथे १२३५ चौ. मी. एवढी जमीन ताब्यात घेण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनासाठी वैद्यकीय साहित्य घेणार
कोरोनासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. सुमारे ५ कोटी रु. खर्च करून हे साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने आणखी ३० परिचारिकांना (नर्सेस्) कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्याचा निर्णय घेतलेला असून सदर निर्णयही बैठकीत संमत करण्यात आला. त्याचबरोबर येत्या २७ जुलैपासून राज्य विधानसभेचे जे पावसाळी अधिवेशन होणार आहे यालाही संमती देण्यात आली.
मोप आंतरराष्ट्रीय निवासी घरांना सुलभ शौचालये बांधून देण्यासाठीचे जे काम शिल्लक राहिले होते ते पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

दरम्यान, पणजी शहरात ३० ठिकाणी ओल्या कचर्‍यावर नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. हस्तकला महामंडळातर्फे मास्क तयार करून त्यांचे लोकांना वितरण करण्यात येणार आहे. फुफ्फुसांसाठीच्या रोगांच्या एका डॉक्टरची कंत्राटी पद्धतीवर गोमेकॉत भरती करण्यासही मंजुरी देण्यात आली.