जडेजा सर्वांत मौल्यवान भारतीय कसोटीपटू

0
255

‘विस्डेन’या क्रिकेटसंबंधी सर्वांत जुन्या व लोकप्रिय मासिकाने रवींद्र जडेजा याची २१व्या शतकातील भारताचा सर्वांत मौल्यवान खेळाडू म्हणून निवड केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे. जडेजाला या मध्ये ९७.३ गुण मिळाले आहेत.

जगातील प्रत्येक खेळाडूचे तुलनात्मक मूल्यांकन करून त्यांना एमव्हीपी (मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर) रेटिंग देण्यात आले. यामध्ये जडेजाला ९७.३ गुण मिळाले. श्रीलंकेचा दिग्गज ऑफस्पिन गोलंदाज मुथय्या मुरलीधन याच्यानंतर तो दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मौल्यवान कसोटी खेळाडू ठरला. ‘३१ वर्षीय जडेजाची गोलंदाजी सरासरी २४.६२ ही शेन वॉर्नपेक्षा चांगली व फलंदाजी सरासरी ३५.२६ ही शेन वॉटसनपेक्षा अधिक आहे. त्याच्या फलंदाजी व गोलंंदाजी सरासरीतील अंतर केवळ १०.६२ आहे. एक हजाराहून जास्त धावा व १५० पेक्षा जास्त बळी घेतलेल्या खेळाडूसाठीची ही वर्तमान शतकातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोत्तम अंतिम आहे,’ असे क्रिकविज संस्थेच्या फ्रेडी वाईल्ड यांनी सांगितले.

२००९मध्ये भारताकडून पदार्पण करणार्‍या जडेजाने भारताकडून ४९ कसोटी, १६५ एकदिवसीय आणि ४९ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. ४९ कसोटी सामन्यात १८६९ धावा करण्याशिवाय त्याने २१३ गडी बाद आहेत. दरम्यान, सर्वांत कमी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करणारा डावखुरा गोलंदाज होण्याचा विक्रमही जडेजा याच्या नावावर आहे. त्याने ४४ व्या सामन्यात २०० वा कसोटी बळी मिळवला होता. सर्वांत कमी सामन्यात २०० विकेट घेणारा जडेजा रविचंद्रन अश्‍विननंतर भारताचा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याने अवघ्या अश्‍विनने ३७ कसोटीत २०० गडी बाद केले होते. दुसरीकडे, सध्या जडेजाच्या क्षेत्ररक्षणाची जगभरात प्रशंसा होत आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक क्रिकेटपटूने त्याला सध्या घडीस जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानले. जडेजाने अनेकवेळा आपल्या शानदार क्षेत्ररक्षणातून केवळ चाहतेच नव्हे तर मोठ्या क्रिकेटपटूंनाही आश्चर्यचकित केले आहे. गौतम गंभीर, जॉन्टी र्‍होड्स, विराट कोहली, ब्रॅड हॉग, स्टीव स्मिथ यांनी जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे.