केंद्र सरकारने गृह मंत्रालयाने अनलॉक २ साठीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जारी केली आहे. तथापि, गोवा सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. नवीन मार्गदर्शक तत्त्वावर विचारविनिमय सुरू असून लवकरच जारी केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यालय, महाविद्यालये ३१ जुलै २०२० पर्यत बंद राहणार आहेत. थिएटर, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, बार, सभागृहे बंद राहणार आहेत. रात्री १० ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यू राहणार आहे. तथापि, राज्य सरकारने अनलॉक २ साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाही.
राज्यातील बार ऍण्ड रेस्टॉरंट सुरू करण्याची गरज आहे, असे मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. राज्यातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली पाहिजे. राज्यातील रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नियमांचे पालन करून बार ऍण्ड रेस्टॉरंट खुली करण्याची गरज आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.
येत्या ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार्या पर्यटक मोसमासाठी विदेशातील एजंट हॉटेल बुकिंगसाठी संपर्क साधत आहेत. राज्य सरकारने हॉटेल सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.