अर्जुन पुरस्कारासाठी ब्रिज खेळाडूंची शिफारस

0
221

>> वर्धन – सरकार जोडीचे नाव पाठवले क्रीडा मंत्रालयाकडे

भारतीय ब्रिज महासंघाने प्रणव वर्धन व शिवनाथ सरकार यांची काल मंगळवारी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत या दुकलीने सुवर्णपदक मिळवले होते. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले हे पहिलेच ब्रिज खेळाडू आहेत. यापूर्वी पुरस्कारांसाठीच्या यादीत ब्रिज या खेळाचा समावेश नव्हता.

‘बीएफआय’ने दोन्ही खेळाडूंची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली आहेत. पुरस्कारासाठी काही नियम व निकष आहेत. पुरस्कारासाठी सदर खेळ ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग असणे अनिवार्य आहे. त्यामुळे यापूर्वी ब्रिज हा खेळ पुरस्कारासांठी पात्र असलेल्या क्रीडा प्रकारांच्या यादीत नव्हता,’ असे बीएफआयचे सचिव आनंद सामंत यांनी सांगितले.

अर्जुन पुरस्कारासाठीच्या शिफारसीबद्दल पुढे बोलताना सामंत म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी ब्रिज या खेळाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. पहिल्याच प्रयत्नात वर्धन व शिवनाथ यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातल्यामुळे आम्ही त्यांची नावे पाठवली आहेत. कोरोनामुळे आम्हाला पुरस्कारासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडा विलंब झाला.

२०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ब्रिज या खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. त्यावेळी पुरुष दुहेरी विभागात वर्धन-शिवनाथ जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेत भारताने दोन कांस्यपदके देखील मिळवली होती. जागतिक ब्रिज महासंघाला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता प्राप्त झालेली असली तरी पत्त्यांशी संबंधित हा खेळ अजून ऑलिंपिक व राष्ट्रकुलचा भाग होऊ शकलेला नाही.