- मीना समुद्र
निसर्गाचे मानवीकरण आणि ते करताना मानवी भावनांचे आरोपण यामुळे ‘मेघदूत’ हे सौंदर्य, प्रासादिकता, उदारमनस्कता, कल्पकता, अति हळुवार संवेदनशीलता, जीवनसत्ये यांमुळे ‘अति हळुवारपण चित्ता आणोनिया’ वाचण्याचे, काव्यानंदात आकंठ डुंबण्याचे आनंदनिधान आहे एवढे मात्र खरे!
माणसाच्या एकूणच जीवनात योग आणि आषाढ या दोन्ही गोष्टींचे अतिशय महत्त्व. आणि योगायोगानं यंदा दोन्ही दिवस एकमेकांना जोडून किंवा एकमेकापाठोपाठ आले. २१ जून हा आंतरराष्ट्रीय ‘योगदिवस’ किंवा ‘योगदिन’ म्हणून नुकताच साजरा झाला आणि दुसर्याच दिवशी म्हणजे २२ जून रोजी आषाढ मास सुरू झाला.
‘योग’ या शब्दाचा अर्थच आहे जुळणी, जोडणी किंवा संयोग म्हणजे एकत्र येणे. संगतसोबत किंवा भेट झाली तरी आपण म्हणतो, ‘व्वा! किती वर्षांनी भेटीचा ‘योग’ जुळून आला!’ साहचर्य आणि संलग्नतेमुळे ऐक्य- एकवाक्यता निर्माण होते. आपली भगवद्गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला ऐन युद्धभूमीवर सांगितलेले जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. सांख्ययोग, भक्तियोग, पुरुषोत्तम योग, ज्ञानयोग, कर्मयोग अशा योगप्रकारांचे ते विवरण आहे. श्रीकृष्णासारखा गुरू आणि अर्जुनासारखा शिष्य हा आपल्या भारतीयांना मिळालेला दैवयोग आहे. ‘योगदिन’ आसने आणि प्राणायाम यांद्वारे साजरा होतो. आजच्या महामारीच्या संकटकाळात हा भारताने विश्वाला सांगितलेला गुरुमंत्र आहे, जगाला दिलेला अपूर्व असा संदेश आहे. संपूर्ण मानवजातीला तो अतिशय उपकारक असा विचार आहे, जो आचरणात आणण्याची अत्यंत उपयोगी अशी निरपेक्ष देणगी आहे. सर्वांनाच आरोग्याची धनसंपदा लाभावी म्हणून केलेली ही उदात्त प्रार्थना तर आहेच; आणि प्रत्येकाने स्वीकारावी आणि नियमित आचरावी अशी ही जीवनाची सुंदर रीत आहे.
संयमाच्या नियमावलीत बांधलेली निरामय जीवनाबद्दलची आस्था आणि निसर्गनिष्ठ मानवाने नैसर्गिक क्रियाप्रक्रियांचे निरीक्षण करून, प्राणिजीवनाचे विशेष न्याहाळून तयार केलेली ती रीत तपःसाधनेने झालेल्या योग्यांची, साधुमुमुक्षूंची, सिद्धसाधकांची अभूतपूर्व देण आहे. शरीर, मन आणि आत्मा यांवर होणारा तो शास्त्रशुद्ध सुसंस्कार आहे. स्वतःची आणि समाजाची बौद्धिक उन्नती करण्यासाठी, आवश्यक असणार्या निरोगी जीवनासाठीचा योग हा हमीपूर्वक केलेला अंगीकार आहे. श्रद्धा, साधना, निष्ठा यांद्वारे आचरण्याची ही एक अभ्यासप्रणाली आहे. जिज्ञासा आणि ज्ञानपिपासा यांद्वारे साध्य केलेला ज्ञानयोग हे योगमार्गाचे सर्वोच्च, अत्युच्च शिखर आहे. ‘मूकं करोति वाचलम् पंङ्गु लंघयते गिरिम्’ असा आश्चर्यकारक अनुभव देणारा तो साक्षात्कारी आणि आश्वासक मार्ग आहे.
योग सुख-दुःखाकडे समान दृष्टीने पाहण्याचा संदेश देतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी थोडा वेळ काढावा; योगासने आणि प्राणायामाद्वारे (वय आणि प्रकृतीनुसार) शरीर आणि मन ताजेतवाने आणि प्रसन्न ठेवावे; कुठल्याही संकटाचा कणखरपणे सामना करावा; हताश, निराश होऊ नये हाच ‘योग’ करण्यामागचा हेतू असतो. आपल्या मनात अनेक भावभावना, विचार-विकार, चिंता-काळज्या, भीती-दहशत, आकस्मिक संकटे, अनारोग्य या सर्वांमुळे एकच कल्लोळ उसळलेला असतो. यावर नियंत्रण ठेवण्याचे, मन काबूत आणण्याचे काम योग करतो. म्हणून तर ‘योग चित्तवृत्तिनिरोधः’ अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. मनावर ताबा मिळविला की शरीरावर ताबा मिळवता येतो आणि शरीरावर ताबा
मिळविला की मन स्थिर व शांत, संतुलित होते असे हे दोन्ही परस्परावलंबी आहेत.
सर्वसामान्य माणूस अहोरात्र ध्यानमग्न राहून ज्ञानसाधना करू शकत नाही; पण योगासने, प्राणायाम यांद्वारे त्याला कामात सुसूत्रता आणता येते. निर्णयशक्ती वाढते. शरीर लवचीक आणि मन प्रसन्न, आनंदी, उल्हसित, प्रफुल्लित तसेच शांतस्थिरही होते. ‘कर्मसु कौशलं’ अशा योगामुळे बुद्धीची दक्षता आणि आत्मिक समाधान सहजसाध्य होते. व्यक्तिगत आणि सामाजिक उत्कर्ष साधायचा असेल, कल्याण साधायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यासारखा संयमित, सुलभ उपाय नाही हे भारतीयांनी जाणले आणि त्यांच्या या दिव्य प्रेरणेचा परिपाक म्हणून ‘योगदिन’ जगभर साजरा होतो हे मात्र निश्चित!
आणि आता आषाढ मास सुरू आहे. आषाढाचा पहिला दिवस हा भारतीय साहित्यविश्वातला महत्भाग्याचा महन्मंगल दिवस! ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा भारतभर सर्वत्र काव्य-नृत्य-नाट्य-संगीत अशा विविध कलाविष्कारांनी साजरा होतो तो ‘कालिदास-दिन’ म्हणून. या दिवशी असं काय घडलं? या दिवशी कालिदासाच्या प्रत्युत्पन्न मतीला आणि अलौकिक प्रतिभेला एक सुंदर, सुकुमार, लालस, लोभस, तेजस असा नवतेचा अंकुर फुटला आणि त्याच्या दर्शनाने वाचन, श्रवण, मननाने संपूर्ण साहित्यजगत् आश्चर्यमुग्ध झाले.
आषाढमेघ हे वर्षा वर्षण करतात हे सार्यांनाच माहीत; पण अशा एका जलभारित घनश्याम मेघाला कालिदासाने आपल्या काव्यातील विरही यक्षाद्वारे दूत बनवून कैलासावर वसलेल्या अलकानगरीत आपल्या प्रियकांतेला एक प्रेमपूर्ण निरोप पाठवला. यातले कथासूत्र एवढेच असले तरी ‘मंदाक्रांता’ वृत्तात लिहिलेले अवघ्या १२० कडव्यांचे हे काव्य आपल्याला काय काय आणि किती किती म्हणून सांगून जाते. बाळकृष्णाच्या माथ्यावरील लडिवाळ मोरपिसासारखे हे काव्य आपल्याला सौंदर्याचे आणि मार्दवाचे अक्षय लेणे बहाल करते. वप्रक्रीडा करणार्या हत्तीसारखा, पुष्करावर्तक घराण्यातला, उदार अंतःकरणाचा हा आषाढमेघ आपली विनंती फोल होऊ देणार नाही याची खात्री असल्याने आपल्या सुहृदाला अतिशय काळजीपूर्वक प्रवासाचा योग्य मार्ग तर त्याने सांगितला आहेच; तिथल्या ठिकठिकाणच्या वनराया, नद्या, पर्वत, पाऊस, फुले, माणसे, नगर्या यांचे वर्णन करत कुठे काय पहा, कशी विश्रांती घे हेही सांगितले आहे. ऐश्वर्यसंपन्न अलकानगरीत तर त्याचा प्राणविसावा आहे. त्याची प्रिय पत्नी कोणत्या स्थितीत असेल, सारिकेशी कशी बोलत असेल, तिला न घाबरवता माझे कुशल सांग आणि तिच्या कुशल सांगणार्या शब्दांनी माझे जीवन सावर. असा हा व्याकूळ निरोप अतिशय विनवणीने करून नंतर ‘तुझा विद्युल्लतेशी अशा प्रकारे एक क्षणभरही वियोग होऊ नये’ अशी इच्छा हा उदात्त अंतःकरणाचा यक्ष शेवटी व्यक्त करतो. निसर्गाचे मानवीकरण आणि ते करताना मानवी भावनांचे आरोपण यामुळे ‘मेघदूत’ हे सौंदर्य, प्रासादिकता, उदारमनस्कता, कल्पकता, अति हळुवार संवेदनशीलता, जीवनसत्ये यांमुळे ‘अति हळुवारपण चित्ता आणोनिया’ वाचण्याचे, पुनः पुन्हा वाचण्याचे, काव्यानंदात आकंठ डुंबण्याचे आनंदनिधान आहे एवढे मात्र खरे!
आषाढाचा दुसरा दिवस पुरीच्या जगन्नाथयात्रेचा. अन्नदाता मेघ हा येथे जगन्नाथ बनून आला आणि पंढरपुराचा सावळा विठू बनून सगुणसाकार रूपात ठाकला. भक्तांच्या आर्ततेने पालवत राहिला.
आभाळमाया बरसत राहिला. तो वारीचा सोहळा म्हणजे भक्तजनांच्या मेळ्याचा योगच. या ‘आषाढी’पासून स्त्री-पुरुषांच्या चातुर्मासाच्या व्रताचरणाला सुरुवात होते. आपला अन्नदाता शेतकरी या आषाढधारांनी सुखावतो आणि बी-बियाण्यांची पेरणी, रोपाची लावणी शेतात करतो. आषाढाच्या जलवर्षावाने शेती सुख-समृद्धी घरी आणते. ती लक्ष्मी बैलांच्या कष्टाने म्हणून त्यांना पोळ्याची विश्रांती देऊन नटवून-सजवून-ओवाळून मिरवणूक काढतात. आषाढ-पौर्णिमा म्हणजे गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
अन्न, धनधान्य, जल, ज्ञान यांची आशा वाढविणारा म्हणून याला ‘आषाढ’ म्हणत असावेत का?