हडफडेत दोडामार्गमधील युवकाचा खून

0
133

सांकवाडी -हडफडे येथील एका हॉटेलच्या परिसरात रविवारी रात्री तेथील कर्मचार्‍यांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या भांडणात दोडामार्ग-सिंधुदुर्ग येथील विश्वनाथ सदाशिव गवस (२८ रा. पिकुळे) या तरुणाचा रामभरोसे निशाद (उ.प्र) याच्याकडून चाकूने भोसकून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच हणजुण पोलीस पथकाकडून संशयितास ताब्यात घेण्यात यश आले.
दरम्यान, संशयित आरोपी रामभरोसे निशाद याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक सुरज गावस वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

सांकवाडी-हडफडेतील त्या हॉटेलात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा विश्वनाथ गवस शनिवारी रात्री आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने संशयित रामभरोसे निशाद आणी अन्य सहकारी मित्रांसोबत दारु पीत बसला होता. यावेळी क्षुल्लक कारणावरून गवस आणी रामभरोसे यांच्यात बाचाबाची झाली, मित्रांनी त्यांना वेगळे करीत खोल्यांमध्ये पाठवून दिले. दरम्यान, मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास संशयित रामभरोसे याने विश्वनाथ गवस गाढ झोपेत असल्याची संधी साधत धारधार चाकूने त्याच्यावर वार केले. यावेळी गवसचा जागीच मृत्यू झाला.