श्रीकांतची शिफारस; प्रणॉयला ‘कारणे दाखवा’

0
181

भारतीय बॅडमिंटन महासंघाने शुक्रवारी किदांबी श्रीकांत याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. स्पर्धेच्या मध्यावर अंग काढून घेतल्याप्रकरणी जाहीर माफी मागितल्यानंतर महासंघाने श्रीकांतचे नाव पाठवले असून अर्जुन पुरस्कारासाठी नाव न सुचवल्यानंतर महासंघावर टीका केल्याप्रकरणी एचएस प्रणॉयला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

श्रीकांत व प्रणॉय या दोघांनी मनिला येथे फेब्रुवारी येथे झालेल्या आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली होती व बार्सिलोना येथील स्पर्धेत खेळण्यासाठी ते रवाना झाले होते. भारताला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित व्हावे लागले होते. परंतु, इतरांच्या कामगिरीमुळे भारताला तिसरा क्रमांक मिळाला होता.

या शिस्तभंग प्रकरणामुळे महासंघाने जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावरील श्रीकांत व २८व्या स्थानावरील प्रणॉय यांची अनुक्रमे राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली नव्हती.

श्रीकांतने माफी मागितल्यामुळे त्याचे नाव क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आले असून प्रणॉयला आपले म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

‘आम्हाला श्रीकांत याचा माफीचा ई मेल आला आहे. यात त्याने आली चूक मान्य केली आहे. भविष्यात या चुकीची पुनरावृत्ती न करण्याची ग्वाहीदेखील त्याने दिली आहे. श्रीकांतची गुणवत्ता, त्याचे यश लक्षात घेता त्याची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे.’ असे महासंघाचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे प्रणॉयला सलग दुसर्‍या वर्षी महासंघाने अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीतून डावलले होते. यानंतर प्रणॉयने ट्विटरचा आधार घेत महासंघावर सडकून टीका केली होती. प्रणॉयबाबत बोलताना सिंघानिया म्हणाले की, ‘प्रणॉय व शिस्त यांचा दूरपर्यंत संबंध नाही. यापूर्वी अनेक वेळा त्याने आपला बेशिस्तपणा दाखवून दिला आहे. प्रत्येकवेळी महासंघाने त्याच्यातील गुणवत्ता पाहून त्याच्यातील शिस्तीच्या अभावाकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता ते शक्य नाही. महासंघावर केलेल्या टीकेबद्दल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल’.