सुशांतची ‘अनटोल्ड स्टोरी’

0
330
  •  बबन भगत

गेल्या रविवारी म्हणजेच १४ जून रोजी जेव्हा सुशांतसिंह राजपूत या उमद्या अभिनेत्याने मुंबई येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा संपूर्ण भारतभरातल्या लोकांना धक्का बसणे हे साहजिकच होते. सुशांतचं जाणं हे खूप क्लेशकारक व दुःख देणारं आहे. सुशांतसिंह राजपूत याच्याएवढ्या लोकप्रिय व आघाडीच्या अन्य एखाद्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण हिंदी चित्रपटसृष्टीत दुसरे नाही. याच्या मृत्यूची ‘अनटोल्ड स्टोरी’ आणखी बराच काळ चर्चेत राहील हे निश्‍चित.

सुशांतची गणना एक अत्यंत हुशार ज्याला आपण स्कॉलर म्हणू अशा युवकांमध्ये करावी लागेल, ज्याने एकाच वेळी कित्येक मोठी स्वप्ने पाहिलेली आहेत. ज्याला आकाश व अवकाश संशोधन अशा कठीण विषयातही रस आहे. ज्याने चंद्रावरील जमिनीचा तुकडाही विकत घेतलेला आहे व ज्याने विद्यार्थीदशेत इंजिनिअरिंगसाठीच्या जेईई (प्रवेश परीक्षा) मध्ये भारतातून सातवा येण्याची किमया केलेली आहे. ज्याने टीव्ही मालिकांनंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवला व एकामागोमाग एक हिट चित्रपट देत तो हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नट बनला.

मुंबईत ज्याचं २० कोटी रुपयांचं घर व करोडो रुपयांच्या चार चाकी गाड्या आहेत. ज्याला काहीही कमी नव्हतं. तो एक- एक चित्रपटासाठी ५ ते १० कोटी रुपये एवढं मानधन घ्यायचा. असा उमदा, चुणचुणीत अभिनेता जो स्क्रिनवर दिसला की मुली भाळायच्या. ज्याचं यश पाहून कुणालाही वाटावं, हा केवढा भाग्यवान!
त्याचमुळे गेल्या रविवारी म्हणजेच १४ जून रोजी जेव्हा या तरुणाने मुंबई येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा संपूर्ण भारतभरातल्या लोकांना धक्का बसणे हे साहजिकच होते.
चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची ‘अनटोल्ड स्टोरी’ आणखी बराच काळ चर्चेत राहील हे निश्‍चित.

सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केली असं म्हणायला पोलिसांना पुरावे सापडले आहेत. पण सगळी सुखं पायाशी लोळण घालीत असताना या ३४ वर्षांच्या हुशार व गुणी अभिनेत्याला नैराश्य का बरं आलं असावं.. असाच प्रश्‍न आता त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच पडलेला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो नैराश्यासाठीची (म्हणजेच ‘डिप्रेशन’वरील) औषधं घ्यायचा. अशी औषधं व डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन मृत्युचा पंचनामा करणार्‍या पोलिसांना आढळलं. नंतर पोलिसांनी त्याच्या निकटवर्तीयांशी केलेल्या चौकशीतही त्याची मानसिक स्थिती बिघडली होती हे स्पष्ट झालं. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या म्हणण्यानुसार सुशांतची मानसिक स्थिती ही हल्लीच्या दिवसांत पूर्णपणे ढासळली होती. त्याला कसले कसले भास व्हायला लागले होते. मी अमुक माणसाची चित्रपटाची ऑफर नाकारली. त्यामुळे तो आता माझा खून करील असे विचित्र काहीसे तो बोलत होता. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सुशांतची स्थिती ही एकेकाळची त्याची प्रेयसी व प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासारखी झाली होती असं विधान केल्याने प्रसार माध्यमांवरून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

– कंगना राणावतचे आरोप –
अशातच बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री कंगना राणावत यांनी सुशांतसिंह राजपूत हा बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी व राजकारणाचा बळी असल्याचे विधान करून खळबळ माजवून दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता प्रसार माध्यमांवर तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी व राजकारण याविषयीची गरमागरम चर्चा चालू झाली आहे.

बॉलिवूडमधील मोठी प्रॉडक्शन हाऊसेस
बॉलिवूडमध्ये काही मोठी प्रॉडक्शन हाऊसेस आहेत. त्यात सर्वांत मोठं नाव आहे ते ‘यशराज फिल्म्सचं. त्या पाठोपाठ क्रमांक लागतो तो धर्मा प्रॉडक्शनचा. त्यानंतर क्रमांक लागतो म्युझिक कंपनी असलेल्या टी-सिरीजचा. ‘टी-सिरीज’ हे या घडीला सर्वांत जास्त चित्रपट निर्मिती करणारे प्रॉडक्शन हाऊस आहे. एकता कपूर यांचं ‘बालाजी फिल्म्स’, साजीद नादियाडवाला यांचं ‘नादियाडवाला ग्रँडसन एन्टरटेनमेंट प्रा.लि.’, सलमान खान यांचं ‘सलमान खान फिल्म्स’ व दिनेश विजन यांची ‘मॅडॉक’फिल्म्स.

वरील प्रॉडक्शन हाऊसेस उच्च दर्जाच्या अशा बिग बजेट चित्रपटांची निर्मिती करीत असतात. मोठा स्टार म्हणून बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे असल्यास या प्रॉडक्शन हाऊसेसचे चित्रपट मिळावे लागतात. तर अशा या सर्व आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसनी एकाच वेळी सुशांतसिंह राजपूतवर बहिष्कार घातला होता व त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती व त्यातूनच तो डिप्रेशनमध्ये गेल्याची सध्या चर्चा आहे.

मधल्या काळात नशिबानेही सुशांतला म्हणावी तशी साथ दिली नव्हती. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’सारखे उत्कृष्ट चित्रपट जे प्रचंड गाजले ते सुशांतने त्याला ऑफर आली असता सोडले होते. हे चित्रपट साईन केल्यास शेखर कपूर यांच्या बहुचर्चित ‘पानी’ या चित्रपटासाठी आपल्याला डेट्‌स देता येणार नाहीत म्हणून त्याने वरील चित्रपट सोडले होते. पण शेखर कपूरचा ‘पानी’ चित्रपट काही होऊच शकला नाही आणि सुशांतने या चित्रपटासाठी सोडलेले संजय लीला भन्साळी यांचे ‘रामलीला’ व ‘बाजीराव मस्तानी’ हे दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले व त्या चित्रपटांमुळे रणवीर सिंह हा तर मोठा स्टार बनला. आपणाला मोठा स्टार बनवू शकले असते असे दोन चांगले चित्रपट हातचे गेल्यामुळेही सुशांत त्यावेळी खूप निराश झाला होता.

‘एम्.एस्. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ने
नशीब बदलले
भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावरील बायोपिक असलेला ‘एम्.एस्. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात संधी मिळाली आणि सुशांतचं नशीबच बदलून गेलं. या चित्रपटात महेंद्रसिंग धोनी हुबेहूब रंगवणारा सुशांत स्टार म्हणून उदयास आला. या चित्रपटाला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि सुशांतच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

सिने रसिकांबरोबरच सिने समीक्षकांनीही त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं. चित्रपट कारकिर्दीला आकार मिळावा यासाठी एका मोठ्या हिटची जी गरज होती ती सुशांतची गरज ‘एम्.एस्.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’या चित्रपटाने पुरी केली. चित्रपट शौकिनांबरोबरच क्रिकेटवेड्या प्रेक्षकांनीही या चित्रपटावर उड्या घातल्या. धोनीची प्रेरणादायी कथा याबरोबरच चित्रपटाची सुंदर व मनाची पकड घेणारी पटकथा, कर्णमधुर संगीत व सुशांतसिंहने ताकदीने उभा केलेला एम्.एस्.धोनी यामुळे हा चित्रपट गाजला. शिवाय त्याचा गाजावाजाही खूप झाला.

सुशांतच्या आयुष्यातली ‘पवित्र रिश्ता’ ही टीव्ही मालिका व ‘काय पो छे’ या चित्रपटानंतरचा ‘एम्.एस्.धोनी ः द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट म्हणजे त्याच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट होता. या चित्रपटाद्वारे सुशांतने संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सुशांतची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये व्हायला लागली. धोनी जसा क्रिकेट खेळताना जबरदस्त षट्‌कार मारायचा तसा अभिनयाचा षट्‌कारच सुशांतने जणू या चित्रपटाद्वारे मारला होता. अर्थातच धोनी रंगवण्यासाठी त्याने जबरदस्त कष्ट घेतले होते. धोनीची देहबोली, त्याचा जलवा, क्रिकेटच्या मैदानावरील धोनीचा आवेश, षट्‌कार व विशेष करून धोनीचं स्वतःचं फाईंड असलेला हेलिकॉप्टर शॉट (षट्‌कार मारण्यासाठीची एक नावीन्यपूर्ण अशी शैली ज्याद्वारे उत्तुंग असा षट्‌कार मारला जातो) शिकण्यासाठी तासन्‌तास गाळलेला घाम याचं गोड फळ सुशांतला मिळालं होतं. त्या यशाची गोड फळे तो गेली वर्षे चाखत होता.

धोनीवरील चित्रपटापूर्वी सुशांतला खूप मोठं यश मिळालं होतं असं म्हणता येणार नाही. बॉलिवूडमधील त्याचा पहिला चित्रपट ठरलेला ‘काय पो छे’ हा २०१३ साली प्रदर्शित झाला होता. सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक चेतन भगत यांच्या ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’या कादंबरीवर तो आधारित होता. २५ कोटी रु.चे बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल ९२ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे या चित्रपटाची गणना हिट चित्रपटात झाली होती.

सुशांतच्या अभिनयाचेही कौतुक झाले. त्यामुळे बॉलिवूडमधील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली होती. या चित्रपटातील भूमिकेतही त्याचे उत्कृष्ट अभिनेता (पदार्पण)चा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन झाले होते, मात्र दुर्दैवाने त्याला पुरस्कार मिळू शकला नाही. (फिल्मफेअर पुरस्कार हे वशिल्यानेच मिळतात अशी सध्या चर्चा ऐकू येते. अमीर खान, कंगना राणावत यांच्यासह काही कलाकारांनी या पुरस्कारावर बहिष्कारच घातलेला आहे.) २०१३ मध्येच सुशांतला ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट मिळाला. अभिनेता म्हणून तुम्ही मोठी झेप घेता तेव्हाच एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला यशराजच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळत असते. सुशांतला ती संधी मिळाली तेव्हा बॉलिवूडमधील सर्वांनाच त्याचा हेवा वाटणे साहजिकच होते.

मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या सुशांतचं हे यश बॉलिवूडमधील काही जणांना व विशेष करून त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना मानवलं नसावं कदाचित. सुशांतचं करिअर संपवण्याचं कट कारस्थान बॉलिवूडमधील काही जणांनी रचलं होतं व त्यामुळेच नैराश्य येऊन त्याची मानसिक स्थिती ढासळली व त्याने वेडाच्या भरात आत्महत्या केली अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते.

पण मागच्या काही वर्षांत सुशांतला चांगले चित्रपट मिळाले. ‘केदारनाथ (२०१८)’ हा त्यांपैकी एक. ‘केदारनाथ’ हा उत्तराखंड येथे आलेल्या पुराच्या पार्श्‍वभूमीवरील प्रेमावर. सुशांतचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘डिटेक्टिव्ह बोमकेश बक्षी (२०१५)’, ‘सोनचिडिया (२०१९)’ व ‘राबता (२०१६)’, ‘किझी और मॅनी (२०१६)’ या चित्रपटांबरोबरच त्याचा सर्वांत महत्त्वाचा चित्रपट होता तो गेल्या वर्षीचा ‘छिछोरे’.

– छिछोरे –
दिल्ली टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या सुशांतने तीन वर्षे तेथे शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाला रामराम ठोकून अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फार धाडसी होता. कारण गॉडफादर नसताना या इंड्रस्ट्रीत येऊन करिअर घडवणे हे एवढं कठीण असतं की त्याकाळी घरदार सोडून मुंबईच्या मायानगरीत येणार्‍या बहुतेक सर्वांनाच (अगदी काही जणांचा अपवाद सोडल्यास) कित्येक वर्षे ‘स्ट्रगल’ केल्यानंतर आपल्या घरीच निघून जावं लागत होतं.
इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या सुशांतने आपल्या ‘छिछोरे’ या चित्रपटात एका आय्‌आय्‌टीयनचं पात्र रंगवलेलं आहे.

इंजिनिअरिंगसाठीच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर आपणावर अपयशी युवक असा शिक्का बसेल का या भीतीपोटी राहत्या इमारतीच्या उंचावरील फ्लॅटमधून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व कोमामध्ये गेलेल्या आपल्या किशोरवयीन मुलाला अपयशावर आत्महत्या हा उपाय असू शकत नाही, असं सांगून इस्पितळामध्ये उपचार घेताना त्याला नव्याने आयुष्याला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणार्‍या वडिलांची भूमिका करणार्‍या सुशांतने स्वतःच जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्याच्या चाहत्यांसाठी तो एक मोठा धक्काच होता. वर्षभरापूर्वी आपल्या चित्रपट कारकिर्दीतील एका अत्यंत महत्त्वाच्या अशा चित्रपटातून आपण जी प्रेरणादायी व्यक्तिरेखा रंगवली त्या व्यक्ति रेखेकडून सुशांतने स्वतः काहीच धडा घेतला नाही काय, असा प्रश्‍न त्याच्या चाहत्यांना पडला. सुशांतच्या आत्महत्येनंतर ‘छिछोरे’ या त्याच्या गाजलेल्या चित्रपटावर त्याच कारणाने बरीच चर्चा झाली.

‘पवित्र रिश्ता’ आणि सुशांत
‘पवित्र रिश्ता’हे सुशांतने केलेले पहिले टीव्ही धारावाहिक नव्हते पण त्याने त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख दिली. ‘मानव’ म्हणून तो घराघरांत ओळखला जाऊ लागला. या सिरियलमध्ये त्याच्याबरोबर काम केलेल्या अंकिता लोखंडे या अभिनेत्रीबरोबर झालेले त्याचे प्रेम प्रकरणही बरेच गाजले होते. ती दोघं ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’मध्ये होती, अशीही चर्चा होती. त्यानंतर सुशांत बॉलिवूडमध्ये आल्यानंतर क्रिती सेनन या अभिनेत्रीबरोबर व नंतर रिया चक्रवर्ती यांच्याबरोबरची त्याची अफेअर्सही गाजली.
आमीर खानच्या अत्यंत गाजलेल्या ‘पीके’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेसह सुशांतने एकूण १० चित्रपट केले. अन्य सर्व चित्रपटात तो प्रमुख नायकाच्या भूमिकेतच होता. २०१३ ते २०१९ पर्यंत त्याचे हे १० चित्रपट.
दिल बेचारा
‘दिल बेचारा’ हा त्याचा चित्रपट २०२० साली प्रदर्शित व्हायचा होता. पण त्यापूर्वीच होत्याचे नव्हते झाले. सुशांतने आकस्मिक एक्झिट घेतली. कायमची. कधीही परत न येण्यासाठी.

पैसा, प्रसिद्धी, यश, मान-सन्मान सगळं काही मिळालं असता सुशांतसिंह राजपूत या तगड्या तरुण युवकाने ऐन उमेदीच्या वयात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं अशी जी चर्चा त्याच्या आत्महत्येनंतर सुरू झाली होती ती अजून संपलेली नाही. त्याच्या आत्महत्येला जबाबदार धरून बॉलिवूडमध्ये गटबाजी व राजकारण करीत असल्याचे ज्यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत त्या करण जोहर व मंडळींवर प्रसार माध्यमांवरून शिव्यांची लाखोली वाहणे चालूच आहे. तर दुसर्‍या बाजूने आत्महत्येची चौकशी करणार्‍या पोलिसांनी हा लेख लिहून होईपर्यंत तरी आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले नव्हते. आणि ते केले जाण्याची शक्यताही आता धुसरच दिसते आहे. कारण हाय प्रोफाईल लोकांच्या मृत्यूची कारणे कळली तरी ती सार्वजनिक केली जाण्याची शक्यताही तशी कमीच. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या का केली याचं उत्तर मिळेल अशी आशा बाळगणं हे मूर्खपणाचंच ठरेल.

सुशांतचं जाणं हे खूप क्लेशकारक व दुःख देणारं आहे. मात्र, झगमगत्या चंदेरी दुनियेत आत्महत्या केलेले आणखी बरेच कलाकार आहेत. एकेकाळचे प्रसिद्ध नट व दिग्दर्शक गुरुदत्त, अभिनेत्री सिल्क स्मिता, अभिनेत्री जिया खान, अभिनेत्री दिव्या भारती (जी इमारतीतून पडली की तिने उडी घेतली ते कळू शकले नाही.) टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी (बालिका वधू फेम) यांनीही आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. आता त्यात सुशांतसिंह राजपूत याची भर पडली आहे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. सुशांतसिंह राजपूत यांच्याएवढ्या लोकप्रिय व आघाडीच्या अन्य एखाद्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत नाही.
बॉक्स
सुशांतला मिळालेले पुरस्कार
१. स्क्रीन सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार
२०१४ – चित्रपट – काय पो छे
२. बिग स्टार मोस्ट एन्टरटेनिंग टेलिव्हिजन ऍक्टर – पुरुष
२०१०- पवित्र रिश्ता
३. गोल्ड पुरस्कार – सर्वश्रेष्ठ नवोदित पुरुष अभिनेता
२०१४ ‘काय पो छे’
४. स्क्रीन पुरस्कार – उत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)
२०१६ – एम्.एस्. धोनी ः द अनटोल्ड स्टोरी.
५. आयटीए देश का सितारा पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता – २०१० – पवित्र रिश्ता
……………………
बॉक्स

२०१३ ते २०१९ पर्यंत सुशांतचे हे १० चित्रपट

चित्रपट – काय पो छे (२०१३), शुद्ध देसी रोमान्स (२०१३)
पीके (२०१४)
डिटेक्टिव्ह बोमकेश बक्षी (२०१५)
एम्.एस्. धोनी ः द अनटोल्ड स्टोरी (२०१६)
किझी और मॅनी (२०१६)
राबता (२०१७)
केदारनाथ (२०१८)
छिछोरे (२०१९), सोनचिडिया (२०१९)