जीवन एवढे स्वस्त आहे का?

0
246
  •  रश्मिता राजेंद्र सातोडकर,
    (शिरोडवाडी-मुळगाव)

जीवन खूप सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदला. दुःखाचे पहाड चढाल तर जीवनाचा खरा अर्थ कळेल. दुःखाला सावरता सावरता सुखाचा शोध घेऊन बघा. जीवन हे एक कोडंच आहे, जर ते सोडवलंत तर तुमचं जीवन नक्कीच बदलेल.

नुकतीच अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येची बातमी सगळ्या युवा पिढीला हादरून टाकलं आहे. आम्ही त्याला कोणीही जवळून ओळखत नाही. परंतु त्यांनी केलेल्या अभिनयातून त्यांनी आमचे मन जिंकून घेतले. त्यांनी असं का केलं असेल, कशासाठी केलं, आम्ही काहीच सांगू शकत नाही. आपण कित्येक जणांनी स्टेटस ठेवले- का केलं असेल? आणि आत्महत्याच का? पण असे स्टेटस टाकणारे कित्येक युवक काही क्षुल्लक गोष्टींवर ‘मेलो असतो तर बरं झालं असतं’ हाच विचार मनात आणून आत्महत्येसारखी क्रूर गोष्ट करून स्वतःचा जीव घेतात. का आपण जीवनाची दोरी स्वतःच कापून घेतो? का आपलं आयुष्य मातीमोल करून ठेवतो? आपलं जीवन एवढं स्वस्त आहे का?
‘‘जगणं कठीण नि मरण सोप्प असतं
कधीतरी जगण्याची वेदना झेलून तर बघ…’’
आजकाल आत्महत्या सर्रास होताना दिसत आहे. शाळेत जाणार्‍या मुलांपासून ते मोठमोठ्या पदवी घेणार्‍या माणसांपर्यंत का.. तर नापास झाल्यामुळे, आई-वडिलांनी मागितलेल्या गोष्टी आणून न दिल्यामुळे, शिकूनसुद्धा अपयश वाट्याला आल्यामुळे नाही तर मग प्रेमभंग! आयुष्य संपवणे हे एकच निवारण आहे का? स्वतःला संपविण्याची ताकद आपल्यात आहे, पण स्वतःला सिद्ध करण्याची ताकद नाहीय का? नापास झालेलं ते प्रमाणपत्र आपलं आयुष्य थांबवू शकतं का? मी तर म्हणेन नापास झालेले विद्यार्थी तर कधी कधी नावलौकिक करून स्वतःला सिद्ध करतात. का आपण आपली तुलना दुसर्‍यांशी करावी? का आपण कोलमडून जावं? आपण आपल्याला सिद्ध नाही करू शकत का? प्रेमात पडणं ही सुद्धा एक निव्वळ भावना आहे. पडतो आपण प्रेमात. पण कधी कधी नाही आपले एकमेकांचे विचार पटत. म्हणून काय मरण पदरी घ्यायचं? त्याच्यावर काहीच उपाय असू शकत नाही का? आपल्या बरोबर आपण कित्येक नात्यांना आपले करत असतो. पण कधी कुणी त्या नात्यांचा विचार करत असतो का? का आपण एवढं स्वार्थी होऊन जातो? का आपण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतो आणि अपयश वाट्याला आले की हादरून जातो? अपयश येत असेल तर निरखून बघा. यशाची पायरी चढणं सोपं असतं. कधीतरी चढण्याचा प्रयत्न करा. कदाचित अपयश देव मुद्दाम देत असेल. कारण काय माहीत पुढे त्याने आपल्याला काहीतरी चांगलं ठेवलं असेल. असा विचार जर करून तुम्ही वाटचाल कराल तर नक्कीच अपयशाला कधी घाबरणारच नाही. अपयश प्रत्येकाला धाडसी बनवतो. यश प्राप्त करण्याची हिंमत देतो. निराशा येते. पण त्याच्यावर विचार करणे फार महत्त्वाचे ठरेल.

मरणारा माणूस काही क्षणात आपलं जीवन नष्ट करतो. पण आपल्यामागे आपल्या माणसांसाठी यातना आणि आठवणींचे पहाड मात्र ठेवून जातो. आपल्याला आपले जीवन कवडीमोल वाटेल, पण त्या जिवाची किंमत तुमच्या आई-वडिलांना विचारा, ज्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले. आपण एकटे नसून आपण त्यांच्या जीवनाचा एक भाग असतो. कधी विचार केलात त्यांच्या डोळ्यांनी आपल्या मुलांचं प्रेत बघण्याची ताकद असेल? का आपण त्यांना भाग पाडतो त्यांच्याच हातांनी त्यांना आपल्या देहाला अग्नी देण्यासाठी? याचसाठी त्यांनी मोठे केले होय आपल्याला?

देवाने ही सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे. का कधी विचार करत नाही की देवाने जन्माला येऊ दिलंय त्यात काहीतरी चांगलंच असेल. नाही तर देवाने तुम्हाला या सृष्टीत आणलंच नसतं. जीवन हे सुख-दुःखाने भरलेलं आहे. दुःखाशिवाय सुखाला अर्थच नाही. निराशा, अपयश हे कधी ना कधी वाट्याला येतंच. मग का हा असा विचार? कधी बघितलं आहे का चिमणीच्या पिल्लांना? ते कित्येकवेळा झेप घेण्याचा प्रयत्न करतात. पण नाही होत. कित्येकदा पंख साथ देत नाहीत. पण ती जिद्द सोडत नाहीत, लढत राहतात. कारण तिला विश्‍वास असतो की आपले पंख मजबूत झाले नाहीत, उंच झेप घेण्यासाठी. जेव्हा यश येतं हाती तेव्हा ती अखेरची झेप घेते. तिच्यात एवढं बळ आहे तर मग आपण तर मनुष्य, विचार करण्याची कुवत आहे. मग एवढ्या लवकर हार का?

जीवन खूप सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदला. दुःखाचे पहाड चढाल तर जीवनाचा खरा अर्थ कळेल. दुःखाला सावरता सावरता सुखाचा शोध घेऊन बघा. जीवन हे एक कोडंच आहे, जर ते सोडवलात तर तुमचं जीवन नक्कीच बदलेल.