- अंजली सं. नायक
(शिक्षिका) म्हापसा
ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अखंडित इंटरनेट सुविधा. अन्यथा विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होऊ शकते. वारंवार खंडित होणार्या विद्युत प्रवाहामुळे, मुसळधार पावसामुळे व जोरदार वार्यामुळे पुनःपुन्हा अडचणी संभवतात.
पावसाळा सुरू झाला की आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते. नव्या कोर्या गणवेशात, पाठीवर नवीन कोरी पुस्तके व वह्यांचे भले मोठे दफ्तर टांगलेले, उत्साहाने ओसंडत, रिमझिम पावसात मौजमस्ती करत शाळेला जाणारे विद्यार्थ्यांचे थवेच्या थवे! बालपणी आपणही या दृश्याचा एक भाग होतो आणि मोठे झाल्यावरही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे नांदताना पाहून कित्येक वर्षे या आनंददायी सोहळ्याचा आपण आनंद लुटत आहोत. परंतु दुर्भाग्याने या वर्षी हे चित्र पूर्णपणे पालटलेले आहे.
– कोरोना आणि झालेले बदल –
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात काही बदल केले जात आहेत. गोव्यातील व एकंदरीत देशातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, शाळा व महाविद्यालयांना ठोकलेली ताळी एवढ्यात खुलण्याची काहीच चिन्हे दिसत नाही. अशा या अनिश्चिततेच्या वातावरणात पर्याय म्हणून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा बोलबाला चालू आहे.
पाश्चात्य देशात जास्त प्रचलीत असलेल्या ऑनलाइन शिक्षणप्रणालीबद्दल काही तज्ज्ञांचे मत असे आहे की या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे घरबसल्या शिक्षण प्राप्त होऊ शकते. तशीच पालकांची जोखीम कमी होते, स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेऊन ती स्वावलंबी बनतात, इ.इ. मान्य आहे की काळाबरोबर जग बदलत आहे व या बदलांना सामोरे जाणे हेच शहाणपण आहे. तंत्रज्ञान-माहिती क्षेत्रात आपला देश सतत प्रगतिपथावर आहे व अनेक भारतीय सुपुत्र-सुपुत्री देशातच नवे तर विदेशातही या क्षेत्रात भरघोस कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. परंतु आता प्रश्न आहे तो अगदी प्राथमिक शिक्षणापासून जर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले तर त्याचे आपल्या भावी पिढीवर काय परिणाम होतील. याचा आपल्या देशाची स्थिती, आपला शैक्षणिक व सांस्कृतिक इतिहास याचा अभ्यास केल्यास काही तात्काळ व काही दूरगामी परिणामांचा विचार होणे अनिवार्य आहे असे वाटते.
– आर्थिक दृष्टीने –
आर्थिकदृष्ट्या आपल्या देशातील बहुसंख्य (७०% अंदाजे) जनता मध्यम व गरीब या वर्गात येते. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन हे उपकरण गरजेचे आहे. घरात एकापेक्षा जास्त शिकणारी मुले असल्यास तेवढ्या संख्येत फोन उपलब्ध करून द्यावे लागतील. हे स्मार्ट फोन महागडे असतात. सर्वसाधारण पालकांच्या खिशाला हा खर्च परवडणार आहे का?
– शारीरिक दृष्ट्या –
लहान मुले असो, तरुण असो किंवा वयस्कर असो, आपला जास्तीत जास्त वेळ टी.व्ही बघण्यात, मोबाईलवर वेगवेगळ्या ऍप्सचा आस्वाद घेण्यात घालवतात, असे सर्वसाधारण सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. आजचा विद्यार्थी शारीरिक व्यायाम व मैदानी खेळ यापासून पूर्णपणे वंचित आहे. त्यात भरीसभर म्हणून जर शिक्षणही चार भिंतींच्या आड सुरू झाले, तर ईश्वरी कृपेने आपल्याला विपुल प्रमाणात मिळणार्या लख्ख सूर्यप्रकाशाला व मोकळ्या शुद्ध हवेला आमची मुलं मुकणार नाहीत का?
– रेडिएशनचा परिणाम –
मोबाईलच्या रेडिएशनने पण वाईट प्रभाव पडतो. परिणामी अत्यावश्यक जीवनसत्त्वांचा अभाव व त्यावर औषधोपचार हे ओघाने आलेच. तासन्तास मोबाईलवर चिकटून राहिल्याने दृष्टिदोष व लहान वयात स्नायू आखडणे, असे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. त्याच्यामध्ये एकलकोंडेपणा, स्वार्थीपणा, संकुचित वृत्ती, मित्रत्वाच्या भावनेचा अभाव, सामाजिक बांधिलकीचा अभाव, असे दोष वाढीस लागून भावी आयुष्यात ते दुःखी बनू शकतात. बौद्धिक प्रगती हेच आपल्या शिक्षणाचे ध्येय आहे का? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना आदर्श नागरिक बनवणे, हेच खर्या शिक्षणाचे रहस्य आहे.
– नैतिक दृष्ट्या –
गुरुशिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीने आम्ही भारतीय भोगी बनलो आहोत. ‘विद्यार्थी’ हे नातं टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आदर, नम्रता, देशप्रेम, धर्मप्रेम, व्यापकता हे गुण मोबाइल नव्हे, तर सुगुणरुपी शिक्षकच कोवळ्या मनावर रुजवू शकतात. नेमका याउलट ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम आहे. इंटरनेटवर अनेक अश्लील अशी संकेतस्थळे कार्यरत आहेत. जिज्ञासेपोटी विद्यार्थी या संकेतस्थळांकडे वळू शकतात. ज्या वयात नैतिक मूल्ये रुजली जायला हवीत त्या कोवळ्या वयात त्यांचा पूर्णतः र्हास होऊन विद्यार्थी विकृतीच्या गर्तेत ढकलले जाऊ शकतात.
– हवामान व तांत्रिक दृष्ट्या –
ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अखंडित इंटरनेट सुविधा. अन्यथा विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होऊ शकते. वारंवार खंडित होणार्या विद्युत प्रवाहामुळे, मुसळधार पावसामुळे व जोरदार वार्यामुळे पुनःपुन्हा अडचणी संभवतात. तसेच विद्यार्थ्यांनी कश्याप्रकारे काळजी घ्यायची आहे, हे पण त्यांना सविस्तर सांगणे गरजेचे आहे. उदा : मोबाइल किंवा लॅपटॉप चार्जिंगला ठेवून इयर फोन वापरले तर गंभीर परिणाम होऊ शकतात.
सरते शेवटी एवढेच सांगावेसे वाटते….
१. ऑनलाइन शिक्षणप्रणाली सद्यःस्थितीत आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्राथमिक स्तरापासून स्वीकारावा लागणारा एकमेव पर्याय आहे. २. असे जरी असले तरी स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना खुल्या वातावरणात शिक्षणाचा आनंद देण्यासाठी मूळपदावर येणे अत्यंत आवश्यक आहे.
३. शिक्षण हे देशाच्या मूळ पिंडाशी जुळणारे असावे.
४. भारताचा मूलपिंड आध्यात्मिक आहे व म्हणूनच माझा देश जगात महान आहे.
५. आणि सरतेशेवटी गुरुशिष्य परंपरा अबाधित राहावी!!!!