हजारे, देवधर, दुलीप ट्रॉफी रद्द करा

0
268

>> वसीम जाफर याची मागणी

देशांतर्गत क्रिकेटमधील भारताचा सर्वांत यशस्वी खेळाडू व भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने विजय हजारे, दुलीप ट्रॉफी व देवधर ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याची मागणी काल सोमवारी केली. देशांतर्गत क्रिकेट मोसम ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे बीसीसीआयने केवळ रणजी करंडक व सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटीवर लक्ष केंद्रीत करावे, असे जाफरला वाटते.

जाफर म्हणाला की, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर जेव्हा क्रिकेट सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आयपीएलच्या नियोजनावर बीसीसीआयचा भर असेल.

बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे, पण आशिया चषक आणि टी-ट्वेंटी विश्‍वचषकाच्या भवितव्यावर आयपीएलचे नियोजन होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआयने इराणी चषकाचे आयोजन करावे. कारण सौराष्ट्रने पहिल्यांदा हा चषक जिंकला होता. त्यांना ही स्पर्धा खेळण्याचा पूर्ण हक्क आहे.

तो म्हणाला, त्यानंतर रणजी चषकाला आपण सुरुवात करू शकतो. पुढील वर्षी आयपीएल लिलावाच्या अगोदर बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे आयोजन करायला हवे. बीसीसीआयने रणजी आणि आयपीएल या दोन स्पर्धांच्या आयोजनावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. यामुळे खेळाडूंना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो, असेही त्याने नमूद केले.

जाफर पुढे हा म्हणाला की, कनिष्ठ स्तरावर देखील अशा पद्धतीचे नियोजन करायला हवे. यंदाच्या मोसमात २३ आणि १९ वर्षांखालील वनडे स्पर्धा रद्द केल्या पाहिजेत.

जाफरने सुमारे दोन दशके क्रिकेटमध्ये योगदान देऊन त्याने मार्च २०२० मध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती घेतली. प्रथम श्रेणीचे तब्बल २६० सामने खेळत जाफरने १९ हजार ४१० धावा केल्या आहेत. यामध्ये ५७ शतके आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे १५० रणजी सामने खेळणारा वसीम जाफर हा पहिला खेळाडू आहे आणि त्याच्या नावे १२ हजारांपेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आहे.