>> शिरेन-चिंबललाही कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची मागणी
कोरोना पॉझिटिव्ह वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे सत्तरी तालुक्यातील मोर्ले पंचायत क्षेत्रातील घोडेमळ हा भाग राज्यातील दुसरा कन्टेनमेंट झोन (प्रतिबंधित) म्हणून जाहीर करण्यात आला असून कांसारवाडो आणि देऊळवाडा हे दोन भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मांगूरहिल पाठोपाठ घोडेमळ हा गोव्यातील दुसरा कंटेनमेंट झोन ठरला आहे. दरम्यान, चिंबलमध्ये काल ८ पॉजिटिव्ह कोरोना रुग्ण सापडले.
मोर्ले पंचायत क्षेत्रात १४ पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मोर्ले पंचायत क्षेत्राला भेट देऊन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपाय योजनांचा शुक्रवारी आढावा घेतला. आरोग्य मंत्री राणे यांनी मोर्लेतील वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या पार्श्वभूमीवर घोडेमळ हा भाग कन्टेनमेंट झोन आणि कांसारवाडा आणि देऊळवाडा हे दोन भागात बफर झोन जाहीर करण्याची सूचना संबंधितांना केली. मोर्लेतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. या भागातील जास्तीत जास्त नागरिकांच्या कोविड चाचण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राणे यांनी दिली.
दरम्यान, वाळपई शहरात दोन संशयित कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते दोघेही सरकारी कर्मचारी आहेत.
आठ रुग्ण सापडल्याने
चिंबलमधील लोक भीतीच्या छायेत
चिंबल पंचायत क्षेत्रातील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चिंबल पंचायत क्षेत्रातील शिंरेन भागात कोरोना पॉझिटिव्ह ८ रुग्ण आढळून आले असून पोलिसांनी हा भाग सील केला आहे. या भागातील नागरिकांचे कोविड चाचणीसाठी स्वॅबचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार ऍन्थोनी फर्नांडिस यांनी काल दिली.
आमदार फर्नांडिस यांनी शिंरेन चिंबल भागाला भेट देऊन सदर भागात कन्टेंनमेंट भाग जाहीर करून कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. या भागातील सर्व नागरिकांनी कोविड चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन आमदार फर्नांडिस यांनी केले आहे. या शिंरेन भागाच्या जवळच इंदिरानगर या झोपडपट्टीचा भाग आहे. सदर भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नव्या कंटेनमेंट झोनमुळे
घाबरू नये ः मुख्यमंत्री
राज्यात आणखी एक कन्टेनमेंट झोन जाहीर केला म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागाबाबत जनजागृती निर्माण व्हावी. कोरोना रुग्ण असलेल्या भागापासून दूर राहावे या उद्देशाने झोन जाहीर केला जात आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केली. राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून उपाय योजना हाती घेण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असलेल्या भागाचे सॅनिटायझेशन केले जात आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
पणजीतील भाजीविक्रेत्या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
पणजी मार्केटमध्ये भाजी विक्री करणार्या चिंबल येथील महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली. पणजी महानगरपालिकेत काम करणार्या चिंबल भागातून येणार्या सर्व कामगारांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. मार्केटजवळील दारूच्या दुकानातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व पालिका कर्मचार्यांची कोविड चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
तावेर्नमधील ‘त्या’ व्यक्तीचा थांगपत्ता नाही
पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमधील एका तावेर्नमधून गायब झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा थांगपत्ता लागलेला नाही. सदर व्यक्ती नवी दिल्लीहून गोव्यात आल्यानंतर साफसफाईच्या नावाखाली सदर दुकान सुरू करून दोन – तीन दिवस दारूची विक्री केली आहे. या प्रकरणी अबकारी विभागाने चौकशी सुरू केली आहे.
कुंभारजुवेतील सर्व दुकाने सोमवारपर्यंत बंद
तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवा पंचायत क्षेत्रात ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शुक्रवार मध्यरात्र ते सोमवार १५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तेथील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत कार्यालयात नागरिकांच्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक सरपंच निशिता गावडे यांनी दिली.
ताळगावच्या ‘त्या’ कर्मचार्याची पत्नी, २ मुलीही पॉझिटिव्ह
इएसआय इस्पितळातील कोरोनाबाधित कर्मचार्याची पत्नी व दोन मुलींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्या कर्मचार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची पत्नी व मुलींची चाचणी करून मोतीडोंगर येथे इस्पितळात विलगीकरण केले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोविड इस्पितळात दाखल केले आहे. सदर कर्मचारी कोविड इस्पितळातील स्वयंपाकी असून ताळगाव येथील रहिवाशी आहे.
राज्यात सापडले नवीन
४६ कोरोना रुग्ण
>> सध्याची कोरोना रुग्णसंख्या ३९४
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन ४६ रुग्ण काल आढळून आले असून राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ३९४ वर पोहोचली आहे.
मांगूर हिलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह २१७ रुग्ण, मांगूर हिलशी संबंधित कोरोना पॉझिटिव्ह ११७ रुग्ण आढळून आले आहेत. मांगूर आणि मांगूर हिलशी संबंधित एकूण ३३४ रुग्ण आहेत. तसेच, मोर्ले – सत्तरी येथे १५ रुग्ण, बायणा येथे १५ रुग्ण, नवे वाडो येथे ११ रुग्ण, चिंबल येथे ८ रुग्ण आढळून आले आहेत. रस्ता, विमान, रेल्वेतून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे. दरम्यान, मडगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४६३ झाली आहे. त्यातील ६९ रुग्ण बरे झाले आहेत. ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात मध्ये मांगूर हिलशी संबंधित ३९ रुग्ण, बायणा ६ रुग्ण, मोर्ले ४ रुग्ण, चिंबल ३ रुग्ण आणि ५ प्रवाशांचा समावेश आहे.
बांबोळी येथील जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या खास वॉर्डात कोरोना संशयित १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य खात्याने दिवसभरात १४४० स्वॅबचे नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविले आहेत. कोविड प्रयोगशाळेतून २११८ नमुन्यांचे अहवाल जाहीर केले आहेत. त्यात २०७२ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. ४६ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तसेच १३८३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
आरोग्य खात्याने २१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे. २३ आंतरराज्य प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच २८ प्रवाशांची सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये रवानगी करण्यात आली आहे.