>> नवोदित फलंदाज हैदर अली, अष्टपैलू काशिफ भट्टीला संधी
इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी व तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या माालिकेसाठी पाकिस्तानने काल आपला २९ सदस्यीय संघ जाहीर केला. अष्टपैलू काशिफ भट्टी व २०१६ साली आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेला जलदगती गोलंदाज सोहेल खान यांना या संघात स्थान देण्यात आले आहे. १९ वर्षांखालील संघातील स्टार खेळाडू हैदर अली याला निवडून पीसीबीने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेतली आहे.
१९ वर्षांखालील स्तरावर खोर्याने धावा जमवलेल्या हैदर याला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत मात्र फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. भारताविरुद्धचे अर्धशतक वगळता त्याला कधीही ‘पन्नाशी’ ओलांडता आली नव्हती. अंडर १९ स्तरावरून प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्याचे स्थित्यंतर चांगले झाले आहे. सात सामन्यांत त्याने ४९.६१च्या सरासरीने दोन शतके व तीन अर्धशतकांसह ५४५ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेले नसले तरा काशिफ भट्टी हा मागील काही वर्षांपासून पाकिस्तान संघाचा भाग राहिला आहे. २०१९ साली पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात तो संघासोबत होता. रावळपिंडी येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटीसाठीदेखील त्याला निवडण्यात आले होते.
४१७ प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या सोहेल खान याने मागील साडेतीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. ९ कसोटींचा अनुभव असलेला सोहेल हा देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या बळावर संघात आला आहे.
३४ वर्षीय फलंदाज फवाद आलम याने मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चव चाखलेली नाही. मागील वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघात त्याला स्थान मिळाले होेते. खेळण्याची संधी मात्र त्याला लाभली नव्हती.
पाकिस्तान संघ ः अझर अली. बाबर आझम, आबिद अली, फखर झमान, इमाम उल हक, शान मसूद, असद शफिक, फवाद आलम, हैदर अली, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, फहीम अश्रफ, हारिस रौफ, इम्रान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सोहेल खान, उस्मान शिनवारी, वहाब रियाझ, इमाद वासिम, काशिफ भट्टी, शादाब खान व यासिर शाह.