>> बाहेरून येणार्यांना पुन्हा होम क्वारंटाईनचा पर्याय
राज्य सरकारने राज्यात विमान, रस्ता, रेल्वे मार्गाने प्रवेश करणार्या नागरिकांसाठीच्या प्रमाण कार्यवाही पद्धतीत (एसओपी) बदल केला असून नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध केले आहेत. कोरोना विषाणूची थर्मल स्क्रिनिंगमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून येणार्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. कोविड चाचणी विना १४ दिवस होम क्वारंटाईन, दोन हजार रुपये शुल्क भरून कोविड चाचणी व चाचणी अहवाल जाहीर होईपर्यंत सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये राहणे, किंवा १४ दिवस सरकारी क्वारंटाईन सुविधेत राहणे, असे तीन पर्याय उपलब्ध केले आहेत. राज्यात प्रवेश करणार्या नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. या नवीन एसओपीची येत्या १० जूनपासून अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात येणार्या प्रवाशांच्या संख्येत विमान, रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर वाढ झाली आहे. तसेच रस्ता मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. राज्यात येणार्या प्रत्येकाची कोविड चाचणी केली जात असल्याने प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल जाहीर होण्यास दोन – तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे एसओपीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
पंच, नगरसेवकांवर
देखरेखीची जबाबदारी
होम क्वारंटाईन करण्यात येणार्या नागरिकांवर स्थानिक पंच, नगरसेवक, पंचायत सचिव, आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखरेख ठेवली जाणार आहे. पंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून त्यासंबंधीचा आदेश जारी करून संबंधित पंच, नगरसेवकाला दिला जाणार आहे. होम क्वारंटाईन केलेली व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारी पेड क्वारंटाईन सुविधेमध्ये ठेवले जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आढळून आलेल्या केवळ १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांवर कोविड केअर सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. शिरोडा येथे पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शिरोडा येथील लोकांसाठी आयुर्वेद महाविद्यालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. राज्यात आणखी एक कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यावर विचार केला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
मांगूर हिल वास्को येथील प्रतिबंधित क्षेत्रात आत्तापर्यंत १२०० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कोरोना चाचणीविना क्वारंटाईनचा पर्याय
नवीन एसओपीमध्ये कोरोना चाचणीविना क्वारंटाईनचा पर्याय देण्यात आला आहे. तथापि, कोविड चाचणी करणार्याला होम क्वारंटाईन केले जाणार नाही. तर, सरकारी पेड क्वारंटाईन सुविधेमध्ये अहवाल जाहीर होईपर्यंत राहावे लागणार आहे. राज्यात प्रवेश करणार्यची तपासणी नाका, विमानतळ, रेल्वे स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. या स्क्रिनिंगमध्ये कोविडची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास कोविड चाचणी केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.