आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

0
163

 

दक्षिण अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे आज सोमवार १ ते ३ जून दरम्यान गोव्यातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली. येथील हवामान विभागाने राज्यात केशरी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राज्यभरात रविवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेे आहे. लक्षद्विप भाग आणि दक्षिण मध्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे तयार झालेले चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने महाराष्ट्र, गुजरातच्या दिशेने सरकत आहे. यामुळे गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या अरबी समुद्रातील वादळामुळे वार्‍याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे ४ जूनपर्यत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

रविवारी राज्यातील विविध भागात जोरदार वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. आगामी दोन दिवसात पावसाबरोबरच वार्‍याची गती वाढणार आहे. डोंगराळ भागात पावसाळी पीकाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. राज्यात सकाळी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहने घसरून अपघात झाले आहेत. पहिल्या पावसात वाहन चालकांनी आपली वाहने कमी वेगगतीने चालवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मान्सूनपूर्व पावसाबरोबरच विजेचा लपंडाव सुरू झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. पाऊस व जोरदार वार्‍यामुळे झाडे, झाडाच्या फांद्या मोडून वीज वाहिन्यांवर पडत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे, अशी माहिती वीज खात्याच्या सूत्रांनी दिली.