पुन्हा कुरापत

0
203

दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा चीनने भारताची पूर्व सीमेवर कुरापत काढली आहे. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३४८८ किलोमीटरच्या सीमेवर कुठे ना कुठे अशा प्रकारे भारताची कुरापत काढायची आणि भूभागावर आपला दावा करायचा ही चीनची नेहमीची रणनीती राहिली आहे. दोकलाम असेल, दौलतबेग ओल्डी असेल किंवा लडाखची पूर्व सीमा असेल, कुठे ना कुठे कधी ना कधी चीनने भारतीय सैनिकांशी तणातणी केलेलीच दिसेल. हे विवाद अनेक दिवस तणाव निर्माण करतात आणि नंतर चीन मैत्रीचा राग पुन्हा आळवायला सुरूवात करतो.
दक्षिण भारतातील पल्लव राजांच्या नगरीत ममलापुरममध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचा रंग वाळण्यापूर्वीच सिक्कीममध्ये चीनने भारताची कुरापत काढून आपले खरे रंग दाखवले होते. यावेळी गेल्या पाच मे पासून चीनने पूर्व सीमेवर सतत भारताची कुरापत काढायला प्रारंभ केला आहे. पँगॉंग सरोवरापासून जेमतेम दोनशे मैलांवर चीनने गेल्या पाच आणि सहा मे रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सैनिकांची कुरापत काढली. त्यानंतर नऊ मे रोजी नाथु लाजवळ भारतीय सैनिकांशी जवळजवळ हाणामारी केली गेली गेली. आता सीमेवर जवळजवळ पाच हजार सैनिकांची मोर्चाबंदी चीनने केलेली आहे. भारतीय हद्दीत एक ते तीन किलोमीटर आत घुसण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. त्यामुळे कारगिलनंतरचा हा सर्वांत मोठा सीमाविवाद आणि घुसखोरी असल्याचे मानले जाते आहे. कोरोनाशी लढणार्‍या भारताला चीनने सीमेवर हे लष्करी आणि त्यापेक्षा अधिक राजनैतिक आव्हान उभे केले आहे.
आधीच चीनने जगाला बहाल केलेल्या कोरोना विषाणूमुळे अवघे जग हवालदिल झालेले असताना चीन अशा प्रकारच्या कुरापतखोरीवर उतरतो यातून त्यामागचे इरादे स्पष्ट होतात. खरे तर अमेरिकेसारखी बलाढ्य महासत्ता आज चीनवर प्रचंड नाराज आहे. दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये अमेरिकेने आपली गस्त वाढवली आहे. हॉंगकॉंगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याबद्दल अमेरिका चीनविरुद्ध निर्बंध लादू पाहते आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारास चीन कारणीभूत असल्यामुळे त्याची पाठराखण करणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेलाच अमेरिकेने शिंगावर घेतलेले आहे, तिचा निधी रोखला आहे आणि खुद्द चीनमधून होणार्‍या आयातीवरही निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न राहणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतेच आपल्या देशाला युद्धसज्ज राहण्याचे आवाहन केले त्याला अमेरिकेची ही आक्रमक नीती कारणीभूत आहे.
यंदा चीनने आपल्या संरक्षणविषयक खर्चात मोठी वाढ केली आहे. चीनचे डिफेन्स बजेट भारताच्या तिप्पट असते. त्यामुळे आपली त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही, परंतु भारताला फ्रान्सकडून राफेलसारखी अत्याधुनिक साधने यायची आहेत. आपल्या पश्‍चिम सीमेबरोबरच भारत आता आपल्या पूर्व सीमेवरही लक्ष देऊ लागला आहे. तेथे दळणवळण साधने वाढवू लागला आहे. ईशान्य भारतामध्ये लष्कराला वेगवान हालचाली करता याव्यात यासाठी चांगले रस्ते उभारले गेले, सेतू उभारले गेले, त्याने चीन अस्वस्थ आहे. ६२ चे युद्ध ज्या भागात लढले गेले होते, त्या गालवान नदीच्या खोर्‍यात भारताने गेल्या वर्षी दौलताबाग ओल्डीच्या भारतीय हवाई तळाशी जोडणारा रस्ता निर्माण केला. चेनांग रिंचेन सेतू बांधकाम केले. चीनची या सगळ्यावर नजर आहे. म्हणूनच सीमेवरती भारताची कुरापत काढून विकासकामांना अडथळे आणण्याचा त्याचा प्रयत्न सतत चालत असतो. एकीकडे हे करीत असताना सीमेच्या आपल्या बाजूला मात्र स्वतःची लष्करी संसाधने वाढवत नेण्यास चीनने कधीच मागेपुढे पाहिलेले नाही. तिबेटमध्ये रस्ते आणि रेल्वेचे जाळे उभारून चीनने आपल्या लष्कराला तेथे अत्यंत गतिमान हालचाली करण्यासाठी सर्व व्यवस्था करून दिलेली आहे. जेथे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चकमक उडाली, तेथून जवळच तिबेटमधील आपल्या न्गारी गुंसा हवाई तळाचा चीनने विस्तार केल्याचे आता उघड झालेे आहे. केवळ विस्तारच करून चीन थांबलेला नाही, तर तेथे आपली लढाऊ विमानेही त्याने तैनात केली आहेत. हवाई तळावर दुसरी पर्यायी धावपट्टीही उभारण्यात आल्याचे आढळले आहे. जगातील सर्वांत उंच विमानतळांपैकी एक असलेल्या या तळावर लढाऊ विमाने तैनात करण्याचे कारण काय? अर्थातच, भारताला आपल्या वाढत्या हवाई ताकदीचा धाक दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय हद्दीत सैनिकांना घुसवायचे, कुरापत काढायची आणि संधी मिळाली तर तो भूभाग बळकावायचा हा कावा आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने तसे प्रयत्न झाले नाही का? गेल्या वर्षी पूर्व लडाखच्या सीमेवर अशीच कुरापत काढली गेली, त्याच्या आधल्या वर्षी देमचोकमध्ये घुसखोरी झाली. २०१७ मधील दोकलाम विवाद तर जगभरामध्ये गाजला. त्याही पूर्वी दौलतबाग ओल्डीमध्ये देखील चीनने भारताची कळ काढली होती. हे सगळे अगदी ठरवून केले जाते आहे. उभय देशांमधली मॅकमोहन रेषा चीनला कधीच मान्य झालेली नाही. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या भारत – चीन सीमेतील मधला हिमाचल आणि उत्तराखंडचा काही भाग सोडला तर एका बाजूने लडाख आणि दुसर्‍या बाजूने सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूभाग बळकावण्याचे अनेक प्रयत्न चीनने सातत्याने केल्याचे दिसेल. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे हे चीनने कधीच मान्य केलेले नाही. सिक्कीमवरही कब्जा करण्याचा प्रयत्न कधी सोडलेला नाही. ही दंडेलशाही भारत किती काळ अशी मुकाटपणे खपवून घेणार आहे हा प्रश्न आहे.
आजवरचे चीनबरोबरचे तणाव राजनैतिक पद्धतींनी मिटवण्यात भारताला यश आले. यावेळी ज्या प्रकारे पाच हजार चिनी सैनिक सीमेवर आणून भारताला धाक दाखवण्यात आला आहे, ते भारतानेही गांभीर्याने घ्यायला हवे. चीनला मर्यादेत ठेवण्यासाठी राजनैतिक पातळीवरही करता येण्याजोगे खूप आहे. भारताने तशी आक्रमकता दाखवण्याची आवश्यकता आहे. चीनच्या व्यापारी अश्वमेधाला आडकाठी आणून कोंडी केली गेली तर लष्करी प्रत्युत्तरापेक्षाही ती अधिक प्रभावी ठरू शकेल!