गोव्याच्या आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण

0
184

>> नीला मोहनन ः ‘पत्रादेवी’वरून दररोज पाचशेहून जास्तजण गोव्यात; कर्मचारी संख्येत केली वाढ

राज्यात पत्रादेवी तपासणी नाक्यावरून गोव्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. पत्रादेवी तपासणी नाक्यावरून मागील दोन दिवसांपासून पाचशेपेक्षा जास्त नागरिक प्रवेश करीत आहेत. त्यामुळे म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणीसाठी स्वॅब घेणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करावी लागली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

पत्रादेवी तपासणी नाक्यावरून गुरूवारी ५७१ नागरिकांनी प्रवेश केला. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर १५० नागरिकांनी म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये स्वॅब देण्यासाठी गर्दी केल्याने आरोग्य कर्मचार्‍यांवर मोठा ताण आला. त्यामुळे काही नागरिकांना चाचणीसाठी स्वॅब देण्यासाठी फोंडा आणि मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागले. पत्रादेवी तपासणी नाक्यावरून जास्त नागरिक येत असल्याने स्वॅब घेण्यासाठी तीन ते पाच काउंटरची व्यवस्था करावी लागली असून सुमारे ४० पेक्षा जास्त आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी लागली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली.

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र घेऊन कमीच लोक प्रवेश करीत आहेत. त्यामुळे राज्यात प्रवेश करणार्‍या मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोविड चाचणी करावी लागत आहे. राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांचे कोविड चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर त्यांना घरी जाऊन विलगीकरणात राहण्याची सूचना केली जाते. कोविड चाचणीबाबतच्या अहवालाची माहिती नागरिकांना एसएमएस संदेशाच्या माध्यमातून दिली जाते, असे मोहनन यांनी सांगितले.
आरोग्य खात्याने विमानतळ, रेल्वे स्टेशन, मुरगाव बंदर, जिल्हा हॉस्पिटल, उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये स्वॅब घेण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. मुरगाव बंदरात कोविड चाचणीसाठी स्वॅब घेण्यासाठी चार काउंटरची सोय करण्यात आली आहे. विदेशातून येणार्‍या लोकांना ७ दिवसांचा सरकारी क्वारंटाईन सक्तीचा असल्याने त्यांना प्रथम क्वारंटाईन हॉटेलमध्ये जाण्यासाठी सूचना केली जाते. त्यानंतर विदेशातून आलेल्यांचे स्वॅब घेतले जातात. राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांची संख्या वाढत असल्याने कोविड चाचण्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.

कोरोना ः तिघे बरे झाल्याने रुग्णसंख्या २८

राज्यात काल एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही. मात्र ३ कोरोना रुग्ण बरे झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या २८ वर आली आहे. राज्यातील ४१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

गोमेकॉच्या कोरोना वॉर्डात संशयित ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत मागील २४ तासांत कोरोना चाचणीसाठी १३५९ नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील ९८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून तपासण्यात आलेले सर्व नमुने निगेटिव्ह आहेत. तसेच ४७१ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
आंतरराज्य प्रवास केलेल्या ९३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, २१९ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणण्यात आले असून सरकारी क्वारंटाईनखाली एकूण ३३५ जणांना ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.