>> लॉकडाऊन वाढविण्याचा केंद्राचा विचार ः मुख्यमंत्र्यांची माहिती
देशभरातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असतानाच येत्या १ जूनपासून राज्यात उपाहारगृहे, मॉल्स व व्यायामशाळा सुरू करण्यास गोव्याला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की आपण गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असल्याचे आपणाला सांगितले.
यावेळी आपणही त्याबाबत सहमती दर्शविली. मात्र, त्याचबरोबर वाढीव लॉकडाऊनच्या काळात गोव्यात सामाजिक अंतराच्या तत्त्वाचा अवलंब करून रेस्टॉरन्ट्स, मॉल्स व व्यायामशाळा सुरू करण्यास गोव्याला परवानगी देण्यात यावी, अशी केंद्राकडे आजच आम्ही मागणी करणार आहोत असे सावंत यांनी स्पष्ट केले.
एकावेळी क्षमतेपैकी केवळ ५० टक्के ग्राहकांना प्रवेश देऊन तसेच सामाजिक अंतराच्या तत्त्वाचा अवलंब करून रेस्टॉरंट्स, मॉल्स व जिम्स सुरू करण्यास परवानगी दिली जावी, अशी विनंती गोवा सरकार केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाकडे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्रालय शनिवारी (आज) नवीन मार्गदर्शक तत्त्वे (लॉकडाऊन संबंधीची) जाहीर करणार असून गोवा सरकार त्याची वाट पाहत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आल्यानंतरच केंद्र सरकार गोव्याला रेस्टॉरंट्स, मॉल्स व व्यायामशाळा सुरू करू देईल की नाही हे स्पष्ट होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात रेस्टॉरंट्स, मॉल्स व व्यायामशाळा सुरू व्हायला हवीत असे म्हटले होते. तसेच एकूण क्षमतेपैकी एका वेळी केवळ ५० टक्के ग्राहकांना आत सोडले जावे व सामाजिक अंतराचे तत्त्व अवलंबून त्यांना आपला व्यवसाय चालू करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली होती.
महामारीनंतर पर्यटक गोव्यात
येणेच पसंत करतील
दरम्यान, कोविड-१९ महामारी संपुष्टात आल्यानंतर सुटी घालवण्यासाठी गोवा हेच सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ ठरणार असल्याचा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशी तसेच विदेशी पर्यटक या महामारीनंतर अन्य कुठेही जाण्यापेक्षा गोव्याला येणेचे पसंत करतील, असे सावंत म्हणाले.