शोएबला सचिन घाबरायचा

0
164

>> मोहम्मद आसिफचा हास्यास्पद दावा

शोएब अख्तरचा बाऊन्सर चेंडू खेळताना सचिन तेंडुलकर आपले डोळे बंद करायचा, असा दावा सामना निकाल निश्‍चिती प्रकरणात अडकल्यामुळे कारकीर्द संपलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफने केला आहे. कराची कसोटीच्या दुसर्‍या डावात शोएब जबरदस्त गोलंदाजी करत होता. मी स्क्वेअर लेगला उभा होतो, शोएबचे एक-दोन बाऊन्सर खेळताना सचिनला डोळे बंद करुन घेताना मी पाहिले आहे. सचिन शोएबला घाबरायचा, असा हास्यास्पद दावा सध्या बंदी भोगत असलेल्या आसिफने केलाआहे.
त्या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज बॅकफूटवर खेळत होते आणि आम्ही त्यांना पहिल्या डावात २४० धावाही करु दिल्या नाहीत. त्यावेळी आम्ही अक्षरशः पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला होता.

पाकिस्तानी कार्यक्रम ‘द बरगर्झ’ मध्ये बोलताना आसिफ म्हणाला की जर तुम्हाला आठवत असेल तर २००६ मध्ये भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता, त्याच्याकडे अत्यंत मजबूत फलंदाजीची क्रम होता. राहुल द्रविडने बर्‍याच धावा फटकावल्या. वीरेंद्र सेहवागने आम्हाला मुलतानमध्ये धुवून काढले. फैसलाबाद कसोटीत दोन्ही संघांनी मिळून ६०० धावा केल्या. भारतीय संघातल्या फलंदाजांना फॉर्म पाहून आम्ही थोडे चिंतेत होतो. कराचीत भारताने पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २४५ धावांना उत्तर देताना २३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने दुसर्‍या डावात ५९९ धावांचा डोंगर उभारत भारताला दुसर्‍या डावात ३४१ धावांत गुंडाळताना मालिका १-० जिंकली होती.

तीन सामन्यांच्या मालिकेतील मुलतान आणि फैसलाबादमधील पहिले दोन्ही सामने अनिर्णीत राहिले. २००३च्या विश्‍वचषकात सचिनने केलेली शोएबची धुलाई अजूनही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात असताना आसिफने सचिनबाबत केेलेला दावा हास्यास्पद वाटत आहे.