व्यसनांपासून रहा दूर…

0
321

– डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
(अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

जसे वडीलधार्‍या माणसांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे तसेच मुलांनीसुद्धा मोठ्या माणसांचे ऐकले पाहिजे व त्यांचा, त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. स्वतःची जवाबदारी दोन्हीही बाजुने पार पाडली पाहिजे. आई-वडील-आजोबा-आजी-मुले यामध्ये व्यवस्थित संवाद होणे गरजेचे आहे.

व्यसन हे मानसिक व शारीरिक अस्थिरतेचे स्वरूप आहे. हे व्यसन एखाद्या रसायनाचे, अमली पदार्थ, अन्नाचे, द्रव्याचे, क्रियेचे अश्या कित्येक प्रकारचे असु शकते. व्यसन हे नेहमीच वाईट गोष्टींचे लागते कारण चांगल्याची लागते ती सवय. तर त्यांचे सेवन करत असताना ज्यावेळी ते गरजेपेक्षा अतिरिक्त प्रमाणात केले जाते, परिणामांची (शारीरिक, मानसिक, सामाजिक इ.) पर्वा न करता केले जाते ते व्यसन!
व्यसन फक्त त्या गोष्टीवर परावलंबन असणे एवढेच नव्हे तर ती गोष्ट करण्यापासून, खाण्यापिण्यापासून न रोखू शकणे ह्यालाही म्हणतात. जुगार खेळण्याचे, खाण्याचे, काम करण्याचे पण व्यसन लागू शकते.

व्यसन हे एका दिवसात होत नसते. पण तीच चुकीची गोष्ट पुन: पुन:, सतत करत राहणे, जी आपले शरीर, मन यांसाठी आणि कित्येक वेळा आपल्या आजुबाजूच्या लोकांसाठीही हानिकारक असू शकते हे म्हणजे व्यसन.

सर्वात जगजाहीर असलेले व्यसन म्हणजे तंबाखु, गुटखा, सिगरेट (विडी, हुक्का, सिगार, चिलीम पण यातच आलेत), दारु,अमली पदार्थ (कोकेन, हेरोइन, गांजा, अफीम, ओपीयम, मॉर्फीन, एलएसडी सारखे ड्रग्स), दारु. आजची तरुणाई या सर्व नशा करणार्‍या गोष्टींकडे आकर्षित होत चालली आहे व हे साफ चुकिचे आहे. आपले व आपल्या देशाचे भवितव्य आपण अंधारात ढकलतो आहोत. मज्जा, *जस्ट वन ट्राय* म्हणून चालू केलेली गोष्ट, व्यसन होऊन बसते. कोणाकोणाला दोष द्यायचा? मुलांना, त्यांच्या आईबाबांना, पालनपोषण करणार्‍यांवर, त्यांच्या संगतीवर की त्यांच्यावर झालेल्या संस्कारांवर? इथे तर सर्व भाषांमधील चित्रपटांमध्येसुद्धा *कन्टेन्ट* ची गरज आहे असे म्हणून सिगरेट, ड्रग्स, दारु पिण्याची दृश्य जाणुनबुजून घुसडली, दाखवली जातात, आणि खाली कॅप्शन दिले जाते की *स्मोकिंग किल्स*, *स्मोकिंग इज इन्जुरियस टु हेल्थ* . *डीस्क्लेमर* दाखवला म्हणजे मोकळे झाले. अच्छा डीस्क्लेमर म्हणजे *अस्वीकरण*/ *अस्वीकृति* होय. थोडक्यात काय तर हात वर करणे. कित्येक चित्रपटांमध्ये तर उल्लेखित गोष्टी काल्पनिक आहेत, निव्वळ मनोरंजनासाठी आहेत, वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही व असल्यास योगायोग समजावा, कोणीही करु नयेत असा डीस्क्लेमर असतो. आणि केल्यास आम्ही जबाबदार नाही आहोत असाच अर्थ होतो ना ह्याचा? मग दाखवायच्याच का ह्या सर्व गोष्टी? एवढी काय काळाची गरज आहे? आपली, लहान मुलांची, बहुतांश जणांची मानसिकताच असते की जी गोष्ट नाही करायची अशी दिसली किंवा सांगितली गेली, तीच मुद्दामहून केली जाते. आणि हीच गोष्ट जर त्यांच्या एखाद्या आवडत्या अभिनेता, अभिनेत्री, व्हीलनने जर केली तर मग बघायलाच नको. ह्याचे निमित्त करुन त्यांचे अनुकरण करायला वेळ नाही लागत. आपले आवडते कलाकारच असल्या गोष्टींचे *प्रोमोशन* करताना दिसतात. तम्बाखू, गुटखा, सिगरेट ह्या सर्व *टोबॅको कॉजेस कॅन्सर* असे अगदी ठळक अक्षरात पाकीटावर लिहून विकल्या जातात. आणि हो. सरकारमान्यता प्राप्त. जर तुम्हाला माहीत आहे की अश्याने कर्करोगच होणार, तर कंपनी, फॅक्टरी ज्यात हे उत्पादन होते त्या चालू का आहेत? त्यांना परवाना कोण देतो? अर्थ असाच झाला ना ह्याचा की तुम्हाला अनैसर्गिक मरण हवे असेल तर त्यासाठी सामग्री आणि कारण आम्ही देतो पण आम्ही चेतावनी अगोदरच देऊन ठेवलेली?
कोविड-१९ च्या महामारीमध्ये आपल्या देशातील कित्येक राज्यामध्ये असलेली दारुबंदी उठवावी लागली कारण दारुतून येणारा जवळपास २०-३० टक्के कर हा सरकारी तिजोरीत जमा होतो व तोसुद्धा येण्याचा बंद झालेला होता त्यामुळे सरकारला अजुनच मोठे नुकसान होत होते. बंदी उठवल्यावर लोकांनी (अर्थात बेवड्यानी) जी गर्दी केली तेवढी तर देवदर्शनालासुद्धा करत नाहीत. बेवडे हे स्वतःला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजू लागले व निर्लज्जपणाने स्वतःहून पुढाकार घेतला. तर ही आहे आमच्या लोकांची अवस्था. काही राज्यामध्ये दिवसाला ३०० कोटींची दारु विकली गेली. निदान आपल्या गोव्यात तरी हे दृश्य बघावयास नाही मिळाले (जेथे दारु बाकीच्या राज्यांपेक्षा खूपच स्वस्त आहे म्हणून जास्त शक्यता होती की लोक झुंबड करतील. अगोदरच *ब्लॅक* ने घेऊन साठा करुन ठेवलेलाही असू शकतो, कारण काहीही असो) हे आमचे अहोभाग्य. लोकल मटकान(साध्या शब्दात जुगार) हे पण अत्यावश्यक गोष्टींमध्ये गणले गेले व चालू ठेवण्यात आले. कॅसिनो मात्र बंद होते ..हे विशेष……ड्रग्स सारखे अमली पदार्थ अवैध पद्धतीने विकले जातातच की. ह्यावर आळा का नाहिये? हल्लीच्या पीढीमध्ये तर ह्या व्यसनांची स्पर्धा असते, कोण सगळ्यात जास्त पितो, घेतो याची. मोठेपणाचे लक्षण मानले जाते. जुगारामध्ये लाखांनी पैसे एका वेळेस हव्यासापोटी असेच व्यर्थ केले जातात.

तसेच मोबाईल हेसुद्धा सर्वात मोठया व्यसनांपैकी एक. अगदी लहान न समजण्याइतक्या वयापासून मुलांच्या हातात हे त्यांचे मनोरंजन करण्यासाठी, मन वळवण्यासाठी, रडत असतील तर शांत करण्यासाठी, नवीन प्रकारचे खेळणे मोबाईल दिले जाते. त्याचा काय वाईट परिणाम होईल याचा विचार करणे खूपच आवश्यक आहे. न्युक्लियर कुटुंबामध्ये, आईबाबा जर दोघेही कामावर जात असतील तर मग परिस्थिती अजुनच कठिण होऊन बसते. आईवडीलांचा वेळ आणि प्रेम सोबत मिळणे गरजेचे आहे. जर शक्य असेल तर आजीआजोबा हे सुद्धा मुलांवर योग्य संस्कार करु शकतात. म्हणूनच *जॉइन्ट फॅमिली* ही काळाची गरज आहे. नाहीतर हे पबजी, ब्लूव्हेल, ऑनलाईन सट्टा(रमी इ.) सारखे खेळ, पॉन र्(अश्लील) व्हिडीओज, चित्रपट… मुलांना, तरुणाईला भरकटत नेण्यासाठी पुरेसे आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडवेल, ईर्ष्या, कपटीपणा, हव्यास, डीप्रेशन (औदासिन्यता), डिमेन्शिया/उन्माद(वेडसरपणा), हॅलुसीनेशन्स व डेल्युजन्स(भ्रम), ऍन्क्झायटी (चिंता), एडीएचडी (अटेंशन डेफीसीट हायपर ऍक्टिव्हिटी डिसॉर्डर), चंचलता (मन अस्थिर असणे), बारिकसारिक गोष्टींचा किंवा त्या न मिळाल्यामुळे रागराग, हायपरऍक्टिव्हिटी, इन्सोम्नीया (व्यवस्थित झोप न येणे), ऍम्नेसिया (स्मृतिभ्रंश) सारखे घोर व भयानक तक्रारी, अवस्था, न आजार चालू होतील व नंतर त्यातून मुक्ति मिळणे खूपच कठिण होऊन बसेल. ह्यांच्या आहारी गेल्याने कित्येकांनी चोर्‍या केल्या आहेत, आपला जीवसुद्धा गमावला आहे. आत्महत्या केल्या आहेत. जर ह्या व्यसनाच्या गोष्टी नाही मिळाल्या तर मग त्याचे *विथड्रॉवल सिम्पटम्स* दिसू लागतात. स्वभावात बदल घडतो. एवढा की ती व्यक्ति त्या व्यसनापोटी खून देखील करु शकते, दरोडा घालू शकते, एखाद्याला फसवुही शकते (मग तो जवळचा असेल किंवा दूरचा).
‘चोरी करणे’ हेसुद्धा एकप्रकारचे व्यसनच आहे. सहज मार्गाने न कमवता सोपेपणी, घाम न गाळता, पैसा जर येत राहिला तर त्याचे व्यसन होते आणि ते सोडविणे खूपच कठिण होऊन बसते. मनुष्य वाममार्गाला लागतो. तसेच तर जुगाराचे आहे. झपाट्याने जेव्हा पैसा येतो तेव्हा सर्वच चांगले वाटू लागते पण अशीच उदाहरणे जास्त मिळणार जे ह्या व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे घरदार विकू न कफल्लक होऊन, रस्त्यावर आले आहेत. स्वतःच्या परिवारापासून दूर गेलेत. डिप्रेशनसारखे आजार जडले आहेत. लोकांकडे उधारी वाढत चालली आहे. मग का ही परिस्थिती स्वतःच स्वतःवर ओढ़वून घ्यायची?
परिक्षेमध्ये अभ्यास न करणे व त्यातही ‘कॉपी करणे’ हे व्यसनच आहे. त्यांना माहीत असते की वर्षभर अभ्यास न करता, कॉपी केल्याने किंवा कोणाच्या मदतीने जर उत्तीर्ण होणे शक्य असेल तर मग अभ्यासच का करायचा? पण फक्त पास होणे महत्वाचे नसते हेही लक्षात घ्यावे. कॉपी करुन १००% मिळवून उत्तीर्णही व्हाल पण जेव्हा तुमच्या ज्ञान, बुद्धिची परीक्षा घेतली जाईल तेव्हा सपशेल नापास व्हाल. तेव्हा काय कराल? हे मुलांच्या आईवडीलांनीपण तेवढेच लक्षात घेतले पाहिजे. अश्या गोष्टींमध्ये मुलांना प्रोत्साहन देऊ नका, वशिलेबाजी करु नका. मुलं बिघडतील. त्यांना कष्ट करायला लावा. त्यामागील मेहनत त्यांच्या लक्षात आणून द्या. मागितल्यावर लगेच गोष्टी आणून देणे टाळा. सगळ्याच गोष्टी ‘पैसा फेको तमाशा देखो’ ह्या तत्वावर चालत नसतात.

हस्तमैथुन अतिप्रमाणात करणे हेसुद्धा एक व्यसनच आहे. सतत पॉर्न साईट्‌स बघत बसणे हे ह्याचे मुख्य कारण आहे. टीव्ही, व्हिडीओमध्ये दाखविली जाणारी प्रत्येक गोष्ट ही एडीटेड असते. पण आजच्या तरुणाईला ह्याच गोष्टी आकर्षित करतात व ते त्यांच्यामध्ये पण त्या तश्याच घडाव्यात अशी ही अवाजवी इच्छा असते त्यामुळे हे अनुकरण होते. इरेक्टाइल डिसफंकशन (ध्वजभंग), प्री-इजॅकुलेशन, मैथुन असामर्थ्यता, मुलबाळ न होणे (इनफर्टिलिटि) किंवा उशिरा होणे, शुक्राणुंची कमतरता- असामर्थ्यता ह्या सर्व गोष्टी हस्तमैथुन केल्याने उदभवू शकतात. आता यातही कोण नक्की जबाबदार हे प्रत्येकानी ठरवावे.

जसे वडीलधार्‍या माणसांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे तसेच मुलांनीसुद्धा मोठ्या माणसांचे ऐकले पाहिजे व त्यांचा, त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. स्वतःची जवाबदारी दोन्हीही बाजुने पार पाडली पाहिजे. आई-वडील-आजोबा-आजी-मुले यामध्ये व्यवस्थित संवाद होणे गरजेचे आहे. घरच्यांसोबत आपल्या व्यथा मांडाव्यात. लाजू नये. तेथे अहंकार, मीपणा आड़ यायला नको. कदाचित बहुतांशी प्रश्नांची उत्तर तेथेच मिळू शकतात. तसेही शक्य नसेल तर इतर जवळच्या भरवशाच्या व्यक्तिला त्या सांगून पहाव्यात जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल असे तुम्हाला वाटते. पण एकटेच यावर उपाय शोधत बसु नये. काहीवेळा आपल्यापेक्षा इतर जवळची माणसं आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे ओळखतात व तीच आपली मदत चांगल्याप्रकारे करु शकतात. जेव्हा गोष्टी व व्यसन हाताबाहेर जातात तेव्हा मग शस्त्रक्रिया, नशामुक्ति केन्द्र, रिहॅबीलीटेशन सेंटर, वेड्यांचे रुग्णालय, इतर चिकित्सा यांची गरज भासू लागते. यापैकी कित्येक व्यसनांमुळे एकएक अवयव निष्क्रिय होत जातात आणि मग शरीरसुद्धा. थोड्याना तर खाण्याचे – चॉकलेट्स, नुडल्स, कोल्ड ड्रिंक्स इ.चेसुद्धा व्यसन असते. म्हणूनच त्या वेळेत टाळाव्यात. उशीर होऊ नये याचेसुद्धा भान असावे. आपल्यासोबत आपला परिवार, नातेवाईक, शेजारी इ. सर्व ह्या गोष्टींमुळे प्रभावित होत असतात. आपली, आपल्या शरीराची आणि इतरांचीही काळजी घ्या.