राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मडगाव येथील खास कोविड-१९ इस्पितळामधील खाटांची संख्या २२० पर्यत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रपरिषदेत काल दिली.
कोविड इस्पितळामध्ये अतिदक्षता (आयसीयू) विभागात ४० खाटांची सोय आहे. अतिदक्षता विभागात आणखी २० खाटा वाढविण्याची सोय आहे. या इस्पितळामध्ये १६ व्हॅन्टिलेटर उपलब्ध असून जुलै २०२० पर्यंत २०० व्हॅन्टिलेटर उपलब्ध केले जाणार आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
पश्चिम बंगाल, बिहारमधील मजुरांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्या पाठविण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खात्याचे सचिव संजय कुमार यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात विविध माध्यमातून ५८ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्क न वापरणार्या १४ हजार ५०१ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी ७३५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, असेही कुमार यांनी सांगितले.