दीड लाख स्थलांतरीत कामगार अजूनही गोव्यात अडकून पडलेले असून नोकरी नाही, अन्न नाही आणि अशातच सामाजिक विलगीकरणात रहावे लागत असल्याने हे कामगार आता हिंसक बनू लागलेले असून कामगारांनी रागाच्या भरात रावणफोंड-मडगाव येथे पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना घडली. या घटनेविषयी समाजमाध्यमावरून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
आतापर्यंत केवळ १० हजार स्थलांतरीत कामगारांनाच त्यांच्या गावात पाठवून देण्यास राज्य सरकारला यश आलेले आहे. तर तब्बल १.५ लाख जण आपल्याला गावात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल या प्रतीक्षेत आहेत. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, प. बंगाल आदी राज्यांतील स्थलांतरीत कामगारांचा समावेश आहे.