पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमद याने पाकिस्तान वनडे व टी-ट्वेंटी संघाचा नवनियुक्त कर्णधार बाबर आझम याला काही दिवसांपूर्वीच इंग्रजी शिकण्याचा सल्ला दिला होता. तन्वीरच्या या सल्ल्यानंतर बाबरने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी एक क्रिकेटपटू आहे. माझे काम म्हणजे क्रिकेट खेळणे. मी इंग्रजी भाषा जाणणारा एक ‘गोरा’ नाही. होय, मी त्यावर काम करत आहे. परंतु, आपण अशा गोष्टी वेळेसह शिकतो. आपण अचानक हे सर्व शिकू शकत नाही.’ असे ट्विट बाबरने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर केले आहे. ‘जेव्हा कोण कर्णधार बनतो तेव्हा नाणेफेक आणि सामन्यानंतर त्याला बक्षीस वितरण समारंभात बोलणे आवश्यक असते.
तसेच, जेव्हा तो दौर्याला जाईल तेव्हा त्याला बर्याच वाहिन्यांना मुलाखतीही द्याव्या लागतील, त्यामुळे बाबरने इंग्रजी शिकावे, असा सल्ला अहमद यांनी यूट्यूब व्हिडिओद्वारे दिला होता. पाकिस्तानकडून ५ कसोटी, २ वनडे व १ टी-ट्वेंटी सामना खेळलेल्या अहमद याचा हा सल्ला बाबर आझमच्या चाहत्यांना रुचला नव्हता. समाज माध्यमांवर त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. संघ आणि त्याच्या कामगिरीपेक्षा बाबरचे व्यक्तिमत्व आणि इंग्रजी महत्त्वाचे आहे का, असे काही चाहत्यांनी तन्वीर यांना विचारले आहे.