खोकला(कास)

0
1450

 डॉ. सुरज स. पाटलेकर
(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

खोकला येणे हे जरी स्वाभाविक असले तरीही काळजी मात्र नेहमीच घेतली गेली पाहिजे. खोकला हा एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतो किंवा एक स्वतंत्रपणे व्याधीही असू शकतो. कोरोना/कोविड-१९ ह्या महामारीमध्येसुद्धा खोकला येणे हे त्यातील प्रमुख लक्षणांमधील एक आहे.

खोकला हा शरीराच्या व्याधिप्रतिकारशक्तिमुळेही असू शकतो. जी गोष्ट शरीरासाठी हानीकारक आहे अशा गोष्टीचा शरीरामध्ये प्रवेश होऊ न देण्यासाठी शरिराची ही एक नैसर्गिक क्रिया असू शकते… मग तो एखादा खाण्याचा पदार्थ (ज्याची ऍलर्जी आहे जसे की अण्डे, थंड/शीतपेये/कार्बोनेटेड ड्रिंक्स इ. जे खाल्ल्याने त्रास होतो, जेवताना घश्यामध्ये माश्याचा काटा अड़कणे) असेल किंवा बाहेरील उग्र पदार्थांचा वास (धुर, परफ्युम-डीजेल-पेट्रोल-केरोसिन-फीनोल-फ्लोर क्लीनर, सौंदर्य प्रसाधने इ. सारख्या केमिकल्सच्या वासाने).
खोकल्यालाच आयुर्वेदात कास म्हणून ओळखले जाते. जर जुनाट खोकला असेल व त्याची योग्य काळजी न घेतल्यास त्याचे रूपांतर राजयक्ष्मा ह्या व्याधीमध्ये होऊ शकते. सुरुवातीस कमी असलेला खोकला पुढे जाऊन पूर्ण फुफ्फुसांमध्ये पसरुन न्युमोनियासारख्या एखाद्या घोर, भयंकर व्याधीमध्ये रूपांतरित होऊ शकतो. दोषांच्या प्रकोपानुसार किंवा इतर बाह्य कारणांनी येणारा खोकला हा अनेक प्रकारचा असतो.

खोकला हा व्याधिस्वरुप जेव्हा असतो तेव्हा ३ लक्षणे अवश्यभावी असतात ः-
१. खोकल्यामध्ये घशात टोचल्याप्रमाणे वाटणे (विशेषतः गिळताना)- काहीतरी अडकल्याप्रमाणे वाटणे २. घशात खाज सुटणे किंवा घसा खवखवणे
३. घास गिळताना तो घशात अडकणे/अडणे.
तसेच आवाज बसणे, आवाजात बदल होणे, गळ्याच्या-टाळुच्या ठिकाणी एक प्रकारचा थर साठल्यासारखा वाटणे, घशाच्या आतील श्लैष्मिक त्वचेवर बारीक फोड येणे, तोंडाला चव नसणे, भुक व्यवस्थित न लागणे, जीव कासावीस होणे इ. ही लक्षणे पूर्वरुपामध्ये दिसतात म्हणजेच खोकला हा पूर्ण व्यक्त होण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये.
जसा खोकला अजून वाढून व्यक्त होत जाईल तशी ही उपरोल्लेखित सर्व लक्षणे अजुनच बळावतील व वाढतील. त्यासोबतच खोकताना छातीत, पाठीत, कुशीमध्ये, थोड़ेसे पोटातही दुखणे, घसा दुखणे, बोलणे नकोसे वाटणे किंवा बोलताना त्रास होणे, उत्साह नसणे यांसारखी लक्षणे असतात.
तर काय आहेत खोकला येण्याची कारणे? –
ज्यावेळी खालच्या (मलमुत्रवायू इ. शरीराच्या बाहेर जाण्याचे द्वार) बाजुने वायु किंवा वात याचा अवरोध होतो (अपचन किंवा इतर कारणांमुळे शौचास व्यवस्थित न होणे, आलेले वेग अडवून ठेवणे मग ते कामाच्या व्यापामुळे असतील किंवा वाईट सवयींमुळे), त्यावेळी खाली जाणार्‍या वायुचीसुद्धा प्राकृत गती बिघडते व तो वरच्या बाजूस फेकला जातो. अश्याने हा वायु छाती, कण्ठ, डोके यामध्ये जाऊन घुसतो आणि तेथील अवयवांमध्ये विकृती निर्माण करतो. हा वायु बाहेर पडताना विशिष्ट प्रकारचा आवाज (फुटलेला काश्याच्या भांड्याप्रमाणे) होतो म्हणूनच यास कास असे म्हणतात.
खोकला हा कोरडा/सुका किंवा ओला/कफासह अश्या २ प्रकारचा असतो.

आयुर्वेदात ५ प्रकारचे कास सांगितले आहेत. वातज, पित्तज, कफज, क्षयज आणि क्षतज. खालील सर्व लक्षणे ही आयुर्वेद संहितेत उल्लेखित आहेत. जेवणामध्ये रूक्ष/कोरडे (चणा इ.), थंड, तुरट आहाराचे सेवन, कमी जेवणे, उपवास करणे, वेग अडवून ठेवणे (अश्रु, शिंक, मल-मूत्र-वायु इत्यादी), शक्तीपेक्षा अधिक परिश्रम करणे (बोलणे, धावणे इ.) याने वातज प्रकारचा कास होतो आणि ह्यात हृदयाच्या ठिकाणी, दोन्ही भुवयांच्या बाहेरील बाजुला डोके, पोट व कुशीमध्ये दुखणे चालू होते. चेहरा थोडासा निस्तेज होतो, शरीरबल, आवाज हे कमी होते, एकप्रकारचा थकवा जाणवतो, अंगावार शहारे येतात. खोकला हा सतत असतो, बाहेर येणारा सुका खोकला हा जोरात व वेगाने बाहेर रेटला जातो. ठसका लागतो. फार खोकलल्यावर थोडासा सुकलेला कफ बाहेर पडतो. कफ निघून गेल्यावर थोडा काळ आराम मिळतो पण पुन्हा निरंतर कासाचे वेग येतच राहतात. स्निग्ध (तुप इ.) गरम/उष्ण, आंबट, खारट अश्या गोष्टी खाण्या-पिण्याने थोड़े बरे वाटते. जेवल्यानंतर अगदी सुरुवातीस खोकला थोडा कमी होतो पण अन्न पचल्यानंतर खोकला परत वाढतो.
लहान मुलांमध्ये जर हा वातज प्रकारचा खोकला झाला तर तो अधिक त्रासदायक असतो. त्यांना वारंवार ढ़ास लागते, लगेच बेचैन होतात, खोकला आल्यानंतर उलटी होते किंवा होणार असे वाटते, उलटीतून कफ बाहेर पडून गेला की थोड़ेसे बरे वाटते. ह्याच वातज खोकल्याला व्यावहारिक भाषेमध्ये ‘डांग्या खोकला’ असे म्हणतात.

* पित्तज कास हा तिखट, उष्ण (गुणाने व स्पर्शाने), दाह/जळजळ करणारे पदार्थ, आंबट पदार्थ यांचे अति प्रमाणात सेवन करणे आणि त्यासोबत जास्त रागराग करणे, सतत अग्नीच्या संपर्कात राहणे, उन्हात फिरणे ह्यामुळे होतो. यामध्ये मुखातून जो वारंवार पातळ कफ पडतो तो पिवळ्या रंगाचा असतो (त्याची चव आंबट व तिखट असते), थुंकीसुद्धा किंचित पिवळसर असते, डोळे पिवळसर होतात, तोंड कडवट होते, घुसमटल्याप्रमाणे वाटते (छातीमध्ये जास्त), तहान वाढते, असह्य दाह होतो (विशेषतः कंठाच्या ठिकाणी), डोळ्यांसमोर अंधारी येते व तारे चमकल्याप्रमाणे वाटते, तोंडाला चव नसते.
* कफज प्रकारचा कास हा पचायला जड, चिकट व गुळगुळीत, गोड पदार्थांच्या अतिसेवनाने होतो. तसेच दिवसा झोपणे, कोणत्याही प्रकारच्या शारिरीक हालचाली न करणे, या गोष्टी अतिप्रमाणात जर झाल्या तर त्यामुळे शरिरातला कफ वाढून वायुच्या गतीस अडथळा निर्माण करतो आणि अश्याने भुख न लागणे, पचनशक्ती बिघडणे, तोंडाला चव नसणे, उलटी होणे, सर्दी होणे, मळमळल्यासारखे होणे, अंगास जडपणा, मरगळ वाटणे, बाहेर पडणारा कफ हा चिकट, अधिक प्रमाणात, संपूर्ण छाती कफाने भरल्यासारखी वाटणे तरीही खोकताना छातीत अधिक वेदना न होणे, डोकेदुखी व डोके जड होणे ही लक्षणे असतात.

* क्षतज कास हा शरिराला मार लागल्याने होतो किंवा शरीराची अतिप्रमाणात झीज झाल्याने जी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने, चालल्याने, मोठी ओझी उचलल्याने, बलवान प्राण्यांशी झुंज केल्याने, फार मोठ्याने पठन (वाचन) केल्याने, आपल्या शक्तीपेक्षा अधिक साहसाचे काम केल्याने होतो. अश्याने फुफ्फुसांना मार बसतो. सुरुवातीस सुका खोकला असतो पण नंतर खोकल्यासोबत पिवळा, किंचित काळपट, घट्ट झालेला, दुर्गंधित व अतिप्रमाणात रक्तासह थुंकी येऊ लागते. घसा, छाती व पाठीमध्ये खूप तीव्र सुयांनी टोचल्याप्रमाणे असह्य वेदना होतात व जळजळसुद्धा होते ज्यामुळे ताप येणे, फार तहान लागणे, पूर्ण अंग दुखणे यांसारखे त्रास होतात. सोबत आवाज बदलणे, शरिराला कंपसुद्धा असतो. हा रोगी निरंतर कबुतराच्या घुमण्याप्रमाणे आवाज करीत कण्हत असतो. ही लक्षणे खोकला गेल्यावरही राहतात. त्वचेची कांती नष्ट होते, शरीर क्षीण आणि बारीक होते, लघवीतून रक्त पडते किंवा लघवी लाल रंगाचीच असते.

* क्षयज हा शेवटचा व पाचव्या प्रकारचा कास- परस्पर विरुद्ध गुणांच्या गोष्टी केल्याने, खाण्या-पिण्याने (दुध व मासे; उन्हातून येऊन लगेचच थंड पाणी पिणे; इतर), अतिमैथुन, वेगांचे धारण (जे प्राकृत वेग थांबवू नयेत ते अडविल्याने जसे की मूत्र, मल, भुक, तहान, अश्रु, शिंक, जांभई, उलटी, खोकला, झोप इ.) केल्याने, अतिमात्रेत शोक केल्याने होतो. ह्या कारणांनी पोटातील अग्नी मंदावतो (जरणशक्ती व पचनशक्ती कमी होते), अश्याने धातुंची पोषण क्रिया मंदावते आणि त्यांचा क्षय होतो व क्षयज कास उत्पन्न होतो. यामध्ये कफ, थुंकी ही हिरव्या, लाल रंगाची असते. काहीवेळा पूया प्रमाणे दुर्गंधित असते. खोकताना हृदयात, छातित तीव्र वेदना होतात. कारणांशिवाय अचानक गार किंवा उष्ण पदार्थ, गोष्टींची इच्छा होऊ लागते. रुग्ण भरपुर खातो तरिही बारीक होत जातो, दुर्बल होतो. आवाज बदलतो, बसतो किंचित जड व घोगरा होतो. ताप, पाठित दुखणे, सर्दी होणे, तोंडाला चव नसणे, शौचास पातळ किंवा घट्ट होणे. तरिही त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे तेज असते, तळहात व तळपाय स्पर्शास मऊ व गुळगुळीत असतात. चिड़चिड़ेपणा वाढतो. नेहमी कशाचीतरी किळस वाटत असते.
टॉन्सिलायटीस, फेरिंजायटीस इ. रोगांमध्ये ही इनफेक्शनमुळे, घश्यामध्ये एखादी वस्तु अडकल्याने (माश्याचा काटा इ.) खोकला होतो.

तर ह्या सर्वांची चिकित्सा ही दोषांनुसार – त्यांची अवस्था, रोगीचे बल, वय, प्रकृती, जरणशक्ती, राहण्याचे ठिकाण (थंडगार, बर्फाळ प्रदेशांमध्ये हा त्रास अजुनच वाढेल), विहार (सतत वातानुकूलित कक्षात राहात असाल, एसी चा एअर ब्लास्ट अगदी तोंडावर पडत असेल, पंख्याच्या खाली झोपत असाल), यांसारख्या कित्येक गोष्टींवरून ठरवावी लागते व ते तज्ञ चिकित्सकांकडूनच करवून घेणे आवश्यक. प्रत्येक खोकल्याला कफसिरप हा पर्याय होऊ शकत नाही. जेथे एखादे तीक्ष्ण औषध देऊन चिकट कफाच्या तंतुंना एकामेकांपासून वेगळे करुन बाहेर काढणे अपेक्षित आहे, तेथे श्युगरबेस्ड कफ सिरपने (ज्यात साखर अधिक प्रमाणात आहे) हा कफ अजूनच वाढेल. सिरपमधील साखर ही त्याची कडवट चव लपवण्यासाठी कंपनी वापरतात जेणेकरुन त्यांचा सेल वाढावा. तसेच खोकल्याची अजूनही बरीचशी कारणे असू शकतात.
– सर्दी, सायन्युसायटीससारख्या आजारांमध्ये सायनस (नाकाच्या दोन्ही बाजुला, भुवयांच्यावर, दोन्ही डोळ्यांच्यामध्ये असलेल्या पोकळ अस्थि) मधील स्राव (इन्फेक्टेड) हा घश्याच्या मागील बाजूस लागल्याने कोरड्या खोकल्याची ऊबळ येऊ शकते. तसेच आजारामुळे नाक जर बंद राहील, तर साहजिक आहे की तोंडाने श्वासोश्वास प्रक्रिया घडेल आणि तोंड सतत उघडे राहिल्याने जंतुंचा संपर्क थेट घशाशी झाल्यानेसुद्धा खोकला होऊ शकतो (हवा ही नाकातून फिल्टर केली जाते आणि जंतुंना घसा व फुफ्फुसामध्ये जाण्यापासुन रोखले जाते. मग ती शुद्ध असेल किंवा दूषित. तसेच हवेचे तापमानदेखील नाकामध्येच नियंत्रित केले जाते). तंबाखु, गुटखा, ड्रग्स (अंमली पदार्थ), धुम्रपान, मद्यपानसारख्या गोष्टीने तोंड, घसा इतर अवयवाना शुष्कता येतो, कोरडेपणा येतो व खोकला येऊ शकतो. बाहेरील तेलकट पदार्थ जे एकाच तेलामध्ये पुनः पुनः तळले जातात (वड़ा, समोसा, भजी इ.), तसेच चॉकलेट, आईस्क्रीम, पनीर- दही- चीज-लस्सीसारखे दुधाचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यानेसुद्धा खोकला होतो.

रात्रीचा खोकला लागणे किंवा वाढणे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. आधुनिक परीक्षणामध्ये छातीची क्ष-किरण चाचणी, थुंकीची तपासणी (स्पुटम टेस्ट), कोक्स टेस्ट, स्वॅब टेस्ट (जी आता कोविड-१९ लासुद्धा केली जाते), ऑस्कल्टेशन (छातीमधील श्वासोश्वासाचे व्हीजींग, रौन्काय, राल्स हे विकृत आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकणे) सारख्यांची गरज भासू शकते. अँटीबायोटिक्स, ऍनालजेसिक्स, लोसेंजीस, नेसल डीकंजेस्टंट ड्रॉप्स इतर आधुनिक औषधांनी तात्पुरता आराम लाभेलही पण कारणं जर चालूच राहिली तर हा खोकला पुन्हा चालू होईल. आयुर्वेदात उल्लेखित शास्त्रोक्त पंचकर्म (वमन, नस्य, बस्ति इ.), कवल, गण्डूष, औषधीयुक्त तूप पिणे, वाफ घेणे (नाकातून व मुखातून), मुखातून घ्यायच्या इ. औषधीही उपयुक्त ठरतात पण चिकित्सकांच्या सल्ल्यानेच.