गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता लंका जाळायला गेलेल्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे बघता बघता वाढू लागली आहे. विशेष म्हणजे हे नव्याने आढळणारे सर्वच्या सर्व रुग्ण गोव्याबाहेरून आलेले आहेत. यातील कोणी रस्तामार्गे आले, कोणी मालवाहतुकीच्या गाड्या घेऊन आले, कोणी सरकारने दर्यावर्दींसाठी पाठवलेल्या बसगाडीतून आले, कोणी केंद्र सरकारने सुरू केलेल्या रेल्वेने आले, परंतु हे सगळे म्हणजे गोव्यासाठी ‘विकतचे श्राद्ध’ आहे. सरकार आणखी शेकडो गोमंतकीय दर्यावर्दींना, हजारो विदेशस्थ गोमंतकीयांनाही परत आणणार आहे. म्हणजेच या सगळ्यातून आम गोमंतकीय जनतेपुढे एक मोठे संकट येणार्या काळामध्ये उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
गोव्याबाहेरून येणार्यांना सीमेवर केवळ थर्मल गनद्वारे तापमान तपासून गोव्यात सर्रास दिला जाणारा प्रवेश, काही तासांपुरते हॉटेलांत ठेवून एकमेव कोरोना चाचणी नकारात्मक येताच होम क्वारंटाईनची दिली जाणारी मोकळीक, अजूनही मोकळ्याच असलेल्या राज्याच्या चोरवाटा, तथाकथित होम क्वारंटाईनचा सर्रास उडणारा फज्जा, बिगरगोमंतकीयांचा मौजमजेसाठी गोव्याकडे लागलेला लोंढा, त्यांच्यासाठी रेल्वेने सताड उघडी केलेली दारे, गोमंतकीय खलाशांचे आणि विदेशस्थ गोमंतकीयांचे वाढते आगमन आणि हे सगळे होत असूनही जनतेमध्ये आणि बर्याच राजकारण्यांमध्ये अजूनही न दिसणारे गांभीर्य हे पाहता गोवा आज कोरोनाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभा तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवरची निर्धास्तता आता मुळीच उरलेली नाही.
सुरवातीला सापडलेले कोरोना रुग्ण गोव्याबाहेरून राज्यात प्रवेश कसा करू शकले? मुंबईत चौदा दिवस विलगीकरणात राहिलेला दर्यावर्दी गोव्यात येताच कोरोनाबाधित कसा आढळला? देशभरात लॉकडाऊन असताना वास्कोतील सातजण बार्जेस देण्यासाठी थेट कोलकत्त्यापर्यंत कोणाच्या वरदहस्ताने जाऊ शकले? गोव्याच्या सीमा बंद आहेत, तर येथून तब्बल ऐंशी कामगार चोरवाटांनी थेट रत्नागिरीपर्यंत कसे पोहोचले? तथाकथित होम क्वारंटाइनखालील लोक घराबाहेर कसे फिरू शकतात? गोव्याबाहेरील पर्यटक आगरवाड्यात आलिशान यॉटवर मौजमजा कसे करू शकतात? अनेक प्रश्न आज जनता विचारताना दिसते आहे. सरकारने याची उत्तरे दिली पाहिजेत.
गोव्याच्या सीमा तुम्ही जेवढ्या खुल्या कराल, तेवढी येथील परिस्थिती असुरक्षित बनत राहील हे तर एव्हाना स्पष्ट झालेले आहे. रेल्वेला मडगावचे स्थानक देऊ नये अशी रास्त मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे. राज्य सरकारने त्याबाबत अधिक आग्रही राहायला हवे. केंद्र सरकारचे निर्बंध शिथिल करण्याचे धोरण चुकत असेल आणि त्याचा विपरीत परिणाम गोव्यावर होणार असेल तर कणखरपणे तसे केंद्र सरकारला सांगणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.
गोव्याच्या सीमांवर गोव्यात येऊ पाहणार्यांची नुसती रीघ लागून राहिलेली दिसते. हे सगळेच गोमंतकीय असणे शक्यच नाही. इतर भागांच्या मानाने गोवा अद्याप सुरक्षित असल्यानेच येथे मौजमजा करण्यासाठी मोठ्या संख्येने धनदांडगे गोव्यात घुसत आहेत. सीमांवरून या हौशागवशांची परत पाठवणी व्हावी. सद्यपरिस्थितीत गोव्यात मौजमजा करताना आढळणार्या पर्यटकांवर कारवाई झाली पाहिजे.
सीमांवरून गोव्यात प्रवेश करणार्यांची कोरोना चाचणी केली जात नाही. तेथे केवळ थर्मल गनने त्यांचे तापमान तपासले जाते. एखाद्याने साधी पॅसासिटामॉलची गोळी घेतलेली असेल तर त्याचा ताप दीड दोन तासांनी उतरतो, त्यामुळे थर्मल गन तपासणीचा हा फार्स केल्याने काहीही साध्य होणारे नाही. गोव्यात येणार्या प्रत्येकाला दार मोकळे करण्याऐवजी केवळ जे आजवर गोव्याबाहेर अडकून पडलेले गोमंतकीय नागरिक असतील, केवळ त्यांनाच काटेकोर तपासणीनंतर गोव्यात प्रवेश दिला जावा आणि त्यांनाही संस्थात्मक विलगीकरणाखालीच ठेवण्यात यावे. सध्याचा होम क्वारंटाईनचा पोरखेळ थांबवून गोव्यात येणार्या प्रत्येक व्यक्तीला सक्तीने कोरोनाचा ‘इनक्युबेशन पिरिअड’ असलेले चौदा दिवस तिला परवडणार्या दरातील हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरणाखाली ठेवण्यात यावे अशी सूचना आम्ही यापूर्वीच केलेली आहे. सद्यपरिस्थितीत गोव्याला सुरक्षित ठेवण्याचा केवळ तो एकमेव उपाय दिसतो. राज्याच्या सीमांवर आघाडीवर राहून हजारोंच्या संपर्कात येणार्या पोलिसांच्या सुरक्षेकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भयावह होऊ शकतात.
गोव्यात आलेल्या दर्यावर्दींपैकी एकजण कोरोनाबाधित आढळला. त्याच्या सोबत आलेल्यांपैकी कोणामध्ये त्याचे संक्रमण झालेले नाही ना हे काटेकोरपणे तपासण्याची गरज आहे. गोव्यात आणलेल्या या दर्यावर्दींना वास्कोतील भरवस्तीतील हॉटेलात विलगीकरणाखाली ठेवण्याची कल्पना कोणाची? विलगीकरणासाठी हॉटेले निवडताना देखील लागेबांधे न पाहता, लोकवस्तीपासून दूरच्या ठिकाणची हॉटेले निवडली गेली पाहिजेत. या मूलभूत गोष्टी आहेत, त्या सरकारच्या नजरेस आणून देण्याची वेळ येता कामा नये.
दर्यावर्दींपाठोपाठ आता विदेशस्थ गोमंतकीय येऊ घातले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यांच्यापाशी पुरेसे पैसेही राहिलेले नाहीत. मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा लोकांना गोव्यात माघारी आणणे हे सरकारचे कर्तव्य नक्कीच आहे, परंतु त्यासंदर्भात योग्य खबरदारी घेण्यात जराशी देखील कसूर राहिली तर गोव्यात होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही.
रेल्वेने आलेल्या पहिल्याच प्रवाशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळणे ही भविष्यातील धोक्याची नांदी आहे. गोव्याच्या एकमेव कोविड इस्पितळातील खाटा भरून वाहावयाच्या नसतील, तर बाहेरून हे जे काही पाहुणे आणले जात आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात काट्याचा नायटा होण्याआधी वेळीच कडक पावले उचलावी लागतील.
राज्य सरकारच्या कसोटीही ही वेळ आहे. आजवर गोवा सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अचानक बदललेले वारे घातक आहे आणि जनतेच्या मनामध्ये धास्ती निर्माण करणारे आहे. गोव्यात प्रवेश करण्यावर कडक निर्बंध कायम राहिले तरच गोवा कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो आणि तो सुरक्षित ठेवणे आता केवळ राज्य सरकारच्या हाती आहे!