-ः बंध रेशमाचे ः- ग्रीष्म-सृष्टीचे वरदान

0
283
  • मीना समुद्र

तरीही निसर्ग पुन्हा शुद्ध, निरामय स्वरूपात लाभण्यासाठी; ईश्‍वराने मानवाला दिलेला हा शापकाळ संपुष्टात आणण्यासाठी संयम, स्वच्छता आणि शुद्धाचरण या अग्निसाधनातूनच आपणाला जायला हवे. त्यासाठी या ओजस, तेजस, झळाळत्या ऋतूचे सहाय्य हवेच हवे.

 

‘कोरोना’च्या काळात फोन हे एक वरदानच वाटते. घरात बसून चैन पडत नाही, वेळ जात नाही अशांसाठीही आणि कामात असलेल्यांना घडीभर विरंगुळा म्हणूनही. खरं तर एप्रिल-मे हा मुलांसाठी सुट्टीचा काळ. पण कुठे जाता येत नाही; गाठीभेटी नाहीत तर निदान मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी फोनवर संवाद साधता येतो. दिलखुलास गप्पा मारता येतात, ख्यालीखुशाली विचारता येते. असाच परवा एका मैत्रिणीचा फोन आला तेव्हा म्हटलं, ‘‘किती दिवसांनी फोन केलास.’’ तर म्हणते कशी ‘‘कितीतरी दिवसांत फोन नाही आला तुझा म्हणून म्हटलं करावा पुन्हा आपणच.’’

‘‘अहा! जसं काही मी करतच नाही कधी. उलट तुझाच तर बंद झालाय हल्ली. पूर्वी कामाला जात होतीस तरी करायचीस आठवणीनं. आता तर निवृत्तीनंतर नुसताच आराम चाललाय वाटतं… की आठवणच येत नाही गं?’’-मी म्हटलं.

‘‘अगं बयो, असं कधी होईल का? बरं ते जाऊ दे, तुम्ही सगळे ठीक ना? आणि तुझी उन्हाळी कामं झाली की नाही? दरवर्षी अगदी नेमानं करतेस. मला तर बाई जमलंच नाही नोकरीमुळे कधी. आधी होता उत्साह. सोसायटीतल्या आम्ही पाचसहा जणी मिळून पापड कुरड्यांपासून सगळं करायचो. पण आता मिळतं ना सगळं बाजारात, त्यामुळं नकोच वाटतं घाट घालायला. तू केलंच असशील ना सगळं?’’

‘‘हो ना, पहिल्यांदा वाटलं कोरोनामुळे काही करावं की नको? हवेत विषाणू पसरले आहेत आणि ते येऊन पडले तर, असं वाटायचं. मग वस्तुस्थिती कळत गेली आणि जवळपास सगळ्या वस्तूही मिळायला लागल्या म्हटल्यावर सुरसुरी आलीच. शिवाय आमच्या एका आजीबाईच्या म्हणण्याप्रमाणं वाटलं ऊन कशाला वाया घालवा? मुलाबाळांना आवडतं सारं. पावसाळ्याची बेगमी होते. शिवाय मुलं सध्या घरात त्यामुळं त्यांची मदतही होते.’’ असं म्हणत म्हणत गप्पांच्या ओघात तिला उन्हाळी कामांची सारी यादी ऐकवली. (अशी कित्ती कित्ती कामं चालू असल्यामुळं मला फोन करायला झाला नाही हे त्या सांगण्यामागचं छुपं कारण होतंच.)

खरंच, किती कामं असतात उन्हाळ्याची म्हणून खास अशी. हा ग्रीष्मऋतू- तेजस तसाच तापस. आकाश वरून आग ओकत असतं आणि पृथ्वीचं अग्निकुंड धगधगत असतं. उन्हाच्या कहरामुळे तापून, भाजून, होरपळून जात असताना अंगातून घामाच्या धारा वाहत असतात आणि जीव उष्म्याने हैराण झालेला असतो. घामोळी, पुरळ, खाजसारखे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार टाळण्यासाठी या ऋतूच्या सुरुवातीलाच कापडानं घट्ट तोंड बांधलेली भरली घागर दिवसभर उन्हात ठेवून, मावळतीच्या सुमारास त्या पाण्यानं स्नान करणं हा अगदी खात्रीशीर उपाय कित्येक वर्षे मुलांसाठी तरी होतो आहे. यावेळी फक्त ध्यानात ठेवण्याची एक गोष्ट म्हणजे साबण न लावता कैरी उकळून तिचा गर अंगाला लावायचा आणि मग ते ‘झळोणी’चं पाणी अंगावर घ्यायचं. मोगरा, वाळा घातलेलं माठातलं पाणी दिवसाकाठी तहान लागेल तेव्हा पीत राहायचं. कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरीचं पन्हं, ताक, नाचणीचं सत्त्व किंवा आंबील दिवसातून एकदा तरी घेणं श्रेयस्कर.

ठेवणीतल्या कपड्यांना एकदा तरी चैत्रातलं ऊन दाखवायचं, म्हणजे ते कपडे किमान ४-६ तास उलगडून उन्हा ठेवायचे ही फार पूर्वापार प्रथा. शालू-शेले, जरीचे कापड आपण वापरून वार्‍यावर ठेवून मग घड्या करून पेटीत बंदिस्त करतो ते कधी सहाएक महिन्यांनी वापरायला पुन्हा काढतो. त्यामुळे हे ऊन देणे आवश्यक. त्यामुळे मोकळ्या हवेने दुर्गंधही जातो आणि काही जंतूंचा प्रादुर्भावही टळतो. वैशाखाच्या झळाळत्या उन्हात घरातल्या गाद्यागिरद्या, लोडतक्के अशा चांगल्या उन्हात तापवले की आतला कापूस फुलून येतो आणि त्या चांगल्या टुमटुमीत होतात. काठीने धोपटून, धूळधुरळा उडवून अशा फुगलेल्या गाद्यांवर लोळायला मुलाबाळांना खूप आवडतं. अंथरुणं-पांघरुणंही धुवून झटकून खडखडीत वाळवून ठेवली की बरेच दिवस फिकीर नाही. कुबट-घामट वासही जातो आणि पुन्हा नव्यासारखी करकरीत होऊन वापरता येतात.

दाहकतेमुळे ग्रीष्मऋतू माणसाचा उत्साह शोषून घेणारा असला तरी तो त्याच्यातील चैतन्य जागविण्याचे काम हरतर्‍हेने करतो. रंग-रस-रूप-पुष्प-फलांकित करणार्‍या वसंताचे पाऊल याच काळात वाजते. आंबे, काजू, फणस, कोकमांनी झाडे नुसती लगडलेली… मोगरा, अबोली, जास्वंदी, जुई बोलकी झालेली. फळाफुलांची समृद्धी अनुभवावी या जीवघेण्या उन्हाळ्यातच. पण शीतलता देणारे उपायही निसर्ग याच काळात उत्पन्न करतो. वाळ्याचे पडदे, पंखे घेऊन सुगंध आणि शीतलता मिळवता येते. भरभरून देणार्‍या सृष्टीचे दान वाया जाऊ नये म्हणून आणि येणार्‍या पाऊसकाळाची बेगमी म्हणूनही या झळाळत्या उन्हाचा लाभ गृहिणी, लेकीबाळी अगदी जरूर घेतात. पापड, कुरड्या, साबुदाणा, बटाटा, नाचणी, तांदूळ, रवा यांच्या वेगवेगळ्या पापड्या, पापड, वेफर्स, सालपापड्या, सांडगे असे नाना प्रकार कडक उन्हात वाळवले जातात. आंबोशी, छुंदा, कोकम, मिरच्या, मसाल्याचे पदार्थ उन्हात वाळवून टिकाऊ बनवता येतात. धान्याची साठवण कडुनिंबाची पाने त्याबरोबर मिसळून वाळवली की किडीचे भय नाही. सूर्यचुलीवर अन्न शिजवणं, स्नानासाठी सोलर पॅनचा वापर, घरगुती इमर्जन्सी दिव्यांसाठी सूर्याची ऊर्जा हे सारं त्या सहस्ररश्मीचं पसायदानच आहे. आंबापोळी, फणसपोळी, लिंबाचं गोड लोणचं, मुरांबे, गुलकंदही उन्हात ठेवून तयार करता येतात. जांभळा-करवंदांचे हेच दिवस. थंडगार पेय, आईस्क्रीम, कुल्फीसारख्या पदार्थांची लज्जत चाखण्याचे हेच दिवस.

कोरोनामुळे झालेल्या ‘लॉकडाऊन’मुळे या ऋतूतल्या एका परमसुखाला आपण वंचित झालो आहोत. सृष्टीचे सारे सजीव वैभव आपल्याला फिरून पाहता येत नाही. कॅमेर्‍यात बंदिस्त झालेली निर्जीव चित्रे पाहावी लागत आहेत आणि समुद्र, नद्या, तळी येथे जलविहार, स्नान आणि शरीरमनाचा दाह शमविणे हे सारेच वर्षभराने लांबले आहे. तरीही निसर्ग पुन्हा शुद्ध, निरामय स्वरूपात लाभण्यासाठी; ईश्‍वराने मानवाला दिलेला हा शापकाळ संपुष्टात आणण्यासाठी संयम, स्वच्छता आणि शुद्धाचरण या अग्निसाधनातूनच आपणाला जायला हवे. त्यासाठी या ओजस, तेजस, झळाळत्या ऋतूचे सहाय्य हवेच हवे.