दहावी, बारावी परीक्षा ठरल्यानुसारच

0
134

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती

गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेली दहावी आणि बारावीची परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

देशाच्या विविध भागांतून सुमारे ६२०० गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. जहाजांवरील ८२११ गोमंतकीय खलाशी, इतर देशातून ३८४२ गोमंतकीयांनी येण्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
खलाशी आणि विदेशातील गोमंतकीयांना आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. गोव्यात थेट विमान आणण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
राज्याच्या सीमा नाक्यावर वाहन चालक व इतरांची तपासणी करणार्‍या पोलीस व इतर कर्मचार्‍यांना पीपीई पोशाख उपलब्ध केला जाणार आहे. सीमांवरील नाक्यावर सोयी सुविधा वाढविण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जारी केलेल्या २० लाख कोटी पॅकेजचा लाभ घेण्यावर विचार विनिमय करण्यासाठी शुक्रवारी राज्य पातळीवर बँकिंग क्षेत्रातील अधिकार्‍यांची बैठक घेतली जाणार आहे. गोवा विविध क्षेत्रांत आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.