‘एकमेका साह्य करू…

0
224
  •  सौ. शामल अ. कामत
    (मडगाव)

खरंच, या कोरोनाने माणसांमधली माणुसकी जागवली. असेल तो वाईट पण तरीही ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’… ही भावना अजूनही माणसांमध्ये जिवंत आहे, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

स्वप्नातही घडू शकणार नाही असा काळ पूर्ण जगभर आला. तो कसा आला… का आला… याला जबाबदार कोण… हे सगळे विषय आता महत्त्वाचे नाहीत. त्याहीपेक्षा खूप विचार करण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी परमेश्‍वराने आपल्यासमोर वाढून ठेवल्या आहेत आणि त्याला आपण सगळे कसे सामोरे जाणार आणि २२ मार्चनंतरच्या लॉकडाऊनच्या काळात आजवर आम्ही काय केलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसा बारीक विचार केला तर प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे काही ना काही केलेलंच आहे. कोणी जीवनावश्यक वस्तु वाटपाच्या रुपाने, तर कोणी पाण्याची व्यवस्था तर कोणी पैसे देऊनपण अशा काळात समाजासाठी आपला वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे होते.

भारतीय स्त्री शक्ती आणि भारत माता की जय, मडगाव या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन एक महत्त्वाची भूमिका या काळात निभावली आणि त्याचाच एक आढावा तुमच्यासमोर ठेवण्याचा छोटासा प्रयत्न. २२ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाली. तसे दोन दिवस घरात बसून गेले. कुणीही बाहेर गेले नाही. दि. २५ मार्च रोजी गुढीपाडवा होता त्यामुळे आपला सण म्हणून अशाही परिस्थितीत गोडधोड करायची इच्छा तर होतीच, पण तेव्हाच घरातील तरुणाने मला एक प्रश्‍न केला, ‘‘आई, गोडधोड काय करते? तुला करायचंच असेल तर उद्यापासून परगावाहून आलेले अनेक कामगार आहेत, त्यांचे कुटुंबीय इकडे नाहीत, ते रोजच्या कमाईवर झुणका-भाकर खातात. करायचंच असेल तर त्यांना पोळी-भाजी दे. निदान भुकमरीने मरण्याची तरी पाळी त्यांच्यावर येणार नाही.’’
पण आमचं कुटुंब मध्यमवर्गीय. कोण करेल मदत… हा विचार डोक्यात आलाच आणि खरंच.. परमेश्‍वराने ही हाक ऐकली. त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता आमचे स्नेही मा. श्री. किरण नायक, मडगाव यांचा फोन आला, ‘‘शामल तुझ्याकडे काही कल्पना असेल तर सांग, मडगाव म्युन्सिपाल्टीकडे बसणारे कामगार तसेच नवीन मार्केटकडे राहणारे गरीब कुटुंबं या सगळ्यांना आपण पोळी-भाजी देऊ.’’ मी पटकन विषय उचलून धरला. मी म्हटलं, ‘‘किरणभाई, आप आगे बढो, हम सब आपके साथ है|’’ उद्यापासून सुरू करू पोळी-भाजी आणि हे करणारच हा ठाम निर्णय मी घेतला. कोणाच्या आधारावर हा मोठा प्रश्‍न तर समोर होताच.

पण परमेश्‍वर कृपेने आणि सुदैवाने इतक्या चांगल्या मैत्रीणी, अनेक परिवार लाभले की पूर्ण कोंब मडगाववरून आणि अशा अनेक घरातून दि. २४ रोजी कोणीही घरात शिल्लक राहील की नाही याचा विचार न करता प्रत्येक घरातून प्रत्येकी २५ चपात्या माझ्या घरी आणून दिल्या. दोन घरातून बटाट्याची सुकी भाजी हे दोनच जिन्नस घेऊन आम्ही पहिल्या दिवशी सेफ डिस्टन्स ठेवून वाढायला सुरुवात केली. दुसरा दिवस पाडव्याचा होता. आमच्यापैकी एका कार्यकर्त्याचे दोस्त मिठाईचे व्यापारी होते- श्री. कांतीभाई प्रजापत. त्यांच्याशी आम्ही मिठाईविषयी फोनवर बोललो. खरं तर त्यांची मिठाई जी त्यांनी पाडव्यासाठी बनवली होती ती खराब झालीच असती जी अशा कामी लावण्याचं काम आम्ही त्यांच्याच आधारे केलं, जवळ जवळ ५०० किलो वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आम्ही गरजू लोकांमध्ये वाटली. ‘‘ही काय मिठाई वाटण्याची वेळ आहे?’’ असं आम्हाला अनेक जणांनी म्हटलंसुद्धा. पण ती वाटणं ही त्या वेळेची गरज होती. नंतर आम्हाला श्री. उदय सालेलकर यांनी ३०० किलो आटा तसेच २५ किलो लोणचे दिले. हा आटा आम्ही घरोघरी पाठवला. जवळजवळ २० ते २५ घरात आटा नेला. रोज ९०० चपात्या तयार होऊ लागल्या आणि समाजाला मदत करण्याचा खारीचा वाटा आम्ही उचलला.

आता आम्हा सर्वांना समाजात गरजू लोक अन्नासाठी तळमळतात ही जाणीव होऊ लागली. काही कुटुंबात पेज शिजण्याचेपण वांधे होऊ लागले. अशातच उसगाव पेट्रोलपंपचे मालक श्री. माणिक दळवी तसेच त्यांची सौभाग्यवती सिद्धी दळवी यांनी आम्हाला हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे २०, ०००/- रु.चा धनादेश देऊ केला. खरंच, तेव्हा जाणीव झाली की अशा कठीण परिस्थितीतही परमेश्‍वर आमच्या सोबत आहे. त्या धनादेशाच्या आधारावर प्रत्येकी ४००/-रु.प्रमाणे ४० पाकिटे तांदूळ, मुग, तूर डाळ, वाटाणे व तेल या गरजेच्या वस्तु मजूर लोकांना पुरविण्याचे काम आम्ही काही गरीब वस्तीत केले. तेव्हाच सिंधी समाजाचे कार्यकर्ते श्री. चंदवानी यांनी आम्हाला आपल्याकडील धान्याच्या पिशव्या दिल्या. कोंब महिला मंडळाकडून धनादेश आला. त्या पैशातून घेतलेल्या धान्याचे वाटप आम्ही देवळानजीक फळविक्री करणार्‍या बायकांना केला. तशातच कोणीतरी सांगितले की टायटनमध्ये काम करणार्‍या बाहेरगावातील काही मुली ज्या वेरणा इथे आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांना धान्य, कांदा, बटाटा, टोमॅटो अशा जीवनावश्यक वस्तु पुरवण्याचे कामही आम्ही केले.

या काळात जवळजवळ १२०० मजुरांपर्यंत आम्ही पोळी-भाजी दिली तसेच २५० घरात धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. असे असतानाच आमचेच एक स्नेही श्री. निलम नाटेकर यांनी पोलीस जे आपल्यासाठी राब राब राबतात त्यांना नाश्ता, चहा, फलाहार, पाणी देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले व अजूनही करत आहेत.
हा सर्व व्याप करत असताना सुरुवातीला आम्ही केवळ सहा जणच होतो, सेफ डिस्टन्स तर होतंच पण जसे दिवस गेले ही संख्या वाढली. कोंब महिला मंडळ व भारत माता की जयचे कार्यकर्ते सगळ्यांचे खूप सहकार्य लाभले.

काही महिलांनी धनादेश दिला व सांगितले की आपण पैसे दिलेत हे कुणालाही सांगण्याची गरज नाही, आमच्या मनात खूप आहे, करावेसे वाटते पण करू शकत नाही. तुम्ही करता, आम्ही सगळ्याजणी तुमच्या सोबत आहोत. खरंच, किती हा मोठेपणा! खरंच, या कोरोनाने माणसांमधली माणुसकी जागवली. असेल तो वाईट पण तरीही एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ… ही भावना अजूनही माणसांमध्ये जिवंत आहे, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बाहेरील जगात डोकावून बघितलं तर या सगळ्या गोष्टींची अजूनही आवश्यकता आहे. काम करण्याची ताकदही आमच्यात आहे. आपल्यासारखे दानी जर आम्हाला लाभले तर अजूनही आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहचू शकतो.