रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठ्याची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करून निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सचा दर्जा खराब निघाल्यामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किट्सचा वापर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला.
काही राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरकडून या किट्सच्या साहाय्याने चाचणी केल्यानंतर खूप फरक दिसून आला. चिनी कंपन्यांनी जे आश्वासन दिले होते त्या विरोधात हे किट्स असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
या किट्सचा वापर करू नका, हे किट्स पुन्हा त्या कंपन्यांना परत करा असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटी पीसीआर गळा/नाक स्वॅब चाचणीच सर्वोत्तम आहे. या चाचणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच व्हायरस असल्यास समजतो, असे आयसीएमआरने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.