आरोग्य टिकवण्यासाठी काय महत्त्वाचे ?

0
164
  • डॉ. मनाली म. पवार

 

लॉकडाउन संपल्यावर तुम्हाला पूर्ववत आयुष्य जगायला आवडेल का  की लॉकडाउनच्या काळातील अनुभव घेऊन जगण्यामध्ये बदल घडवायला आवडेल? हा निर्णय घेण्यासाठी अनारोग्याची कारणे समजून घेऊ, म्हणजे लॉकडाउन संपल्यावर याचे ज्ञान नक्की होईल….

 

सगळ्यांच्या लक्षात येत आहे का?  हॉस्पिटल, दवाखाने, वेलनेस सेंटरमध्ये जी रुग्णांची स्वास्थ्यासाठी जी लोकांची गर्दी दिसत होती ती अचानक कमी कशी झाली बरे! इकडे- तिकडे रस्ता अपघात घडत होते, अपघाती मृत्यू घडत होते, यांची संख्या नगण्य झाली. हॉटेल- रेस्टॉरेंट ओसाड पडली तरी घरात सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ घरातील अन्नपूर्णा बनवत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येणार्‍या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कितीतरी पटीने कमी झाले. म्हणजे आपण किती तणावाखाली जगत होतो, याची कल्पना आली का? लहान मुलांच्या दवाखान्यांमध्ये तर विशेष गर्दी आढळायची. पालकही… एखाद- दुसरी शिंक जरी आली तरी डॉक्टर गाठायचे. दर दोन-चार दिवसांनी डॉक्टर, प्रत्येकालाच हल्ली एक किंवा दोन मुले व तेही ‘प्रिशस चाईल्ड’ असते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त काळजी घेणे हे ओघाने आलेच.

वेळ नाही, व्यायाम नाही, घरचे जेवण नाही, आरोग्यही चांगले नाही, शारीरिक व मानसिक त्रास, सतत चिंता- नैराश्य- काळजी, दुरावलेली नाती, आत्मकेंद्री वृत्ती, सतत अँब्युलन्सचा आवाज, सतत कसला ना कसला संचय, सतत स्पर्धा, सतत धावपळ असेच काहीसे चालू होते आपले जीवन लॉकडाउनपूर्वी, नाही का?

लॉकडाउनच्या काळात या सगळ्याचे वास्तव रूप सगळ्यांनाच जाणवले असेल.

आता लॉकडाउन संपल्यावर तुम्हाला पूर्ववत आयुष्य जगायला आवडेल का?  की लॉकडाउनच्या काळातील अनुभव घेऊन जगण्यामध्ये बदल घडवायला आवडेल? आपल्या सर्वांना हा निर्णय घेण्यासाठी अनारोग्याची कारणे समजून घेऊ, म्हणजे आयुष्य कसे असावे लॉकडाउन संपल्यावर याचे ज्ञान नक्की होईल….

– कुठलाही आजार व्हायला आहार- विहारादीमधील दूषितता, चुकीचे सेवन- आचरण हे मुख्य कारण.

– अस्वच्छता हे दुसरे कारण

– ताण- तणाव हे तिसरे कारण.

– पुरेशी झोप किंवा विश्रांती नसणे हे चौथे कारण.

– सर्व प्रकारचे प्रदूषण हे पाचवे कारण.

– कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रदूषण हे सहावे कारण.

– स्पर्धा, तुलना, सर्वश्रेष्ठ बनण्याच्या शर्यतीत, वस्तू-पैशामध्ये सुख शोधण्याच्या नादात, भारतीय संस्कार – संस्कृतीचा लोप पावला व आनंददायी जीवन जगणेच मानव विसरला आहे. म्हणून या लॉकडाउनच्या काळापासूनच आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘स्वस्थवृत्त’चे पालन करायला सुरुवात करा व हे आचरण असेच लॉकडाऊन संपल्यानंतरही तुमच्या नोकरी- व्यवसाय व इतर कामाच्या वेळापत्रकाप्रमाणे सांभाळून पालन करा.

* आहार – लॉकडाउनमुळे हॉटेल बंद, गाडे बंद, टपर्‍या बंद आहे, फास्ट फूड बंद, चमचमीत मसालेदार तेलकट पदार्थ बंद म्हणजेच हॉटेलिंग पूर्णतः बंद झाले. रस्त्यावरील खाणे यापासून तर पूर्णतः सुटकाच आणि पिझ्झा-बर्गर यांसारख्या पदार्थांवाचून युवक- युवतींची जी तृप्ती होत नव्हती त्याचे काय? घरातही बिस्किट, वेफर्स, शेव- फरसाण, केक, नूडल्ससारख्या अनावश्यक पदार्थांचा साठा असायचा. मुलांना हेच आवडते असे आपण पालक ठामपणे सांगत होतो, त्याचे काय? म्हणजेच या लॉकडाउनच्या काळात घरचे ताजे आरोग्यदायी खाणे आपल्याला आजारांपासून दूर ठेवीत आहे. याचाच अर्थ आरोग्य टिकवण्यासाठी घरचे ताजे अन्न सर्वश्रेष्ठ आहे. बर्‍याच वेळा हॉटेलचे पदार्थ, टपर्‍यांवरचे पदार्थ हे फक्त जिभेचे चोचले पुरवतात. जिभेची तुष्टी करतात पण आरोग्यास मात्र हानिकारक असतात. कोल्ड ड्रिन्क्ससारख्या थंड पेयांच्या पिण्याने कितीतरी प्रकारचे आजार होतात म्हणून आपल्या पारंपरिक लिंबू, कोकम, आवळासारख्या सरबतांचे सेवन करावे. तसेच फळांचे शेक व ज्यूसपेक्षा फळांचे ताजे रस किंवा फळे खावीत.

– दूध, तूप, लोणी, ताक यांचा आहारात भरपूर वापर करावा.

– जास्तीत जास्त शाकाहाराचा वापर करावा व घरचेे ताजे अन्नच खावे म्हणजे बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो.

स्वच्छता – स्वच्छतेचे महत्त्व या काळात सगळ्यांनाच उमगले असेलच. आपण वारंवार हात धुवू लागलो. सॅनिटायझर वापरायला सुरुवात केली म्हणजे विषाणू संसर्गजन्य व्याधी होत नाहीत. मास्क वापरायला लागलो म्हणजे प्रदूषित हवा शरीरात प्रवेश करत नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत म्हणजे जनोपध्वंस व्याधींची लागण होत नाही. म्हणूनच या काळात सर्दी- खोकल्यासारखे विषाणूजन्य आजार आटोक्यात आहेत व लहान मुलेही सुरक्षित आहेत.

ताण, तणाव – बहुतेक आजार हे मानसिक ताणाशी संबंधित असतात. सध्या धावपळ कमी, स्पर्धा कमी म्हणजेच ताण (स्ट्रेस) कमी. लॉकडाउनच्या या काळात आपण कुटुंबाला, आपल्या मुलांना पूर्ण वेळ देत आहोत.  मित्र- मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांची चौकशी करत आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये जवळीक होत आहे. सुखदुःखांची देवाण-घेवाण होत असल्याने तणाव आपोआप कमी होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य लाभते आहे.

विश्रांती – प्रत्येकाने किमान साते ते आठ तास शांत झोपणे आवश्यक आहे. पण तणावामुळे, अभ्यासामुळे, धावपळीमुळे म्हणा किंवा मोबाइलमुळे म्हणा कुणाचीच झोप पूर्ण होत नाही. पण या लॉकडाउनच्या काळात प्रत्येकाची पुरेशी झोप होते आहे. त्यामुळे झोपच येत नाही.. यासारखी लक्षणे किंवा व्याधीही नष्ट होताना दिसते आहे.

* प्रदूषण –  लॉकडाउनमुळे वाहने बंद, मोठ-मोठे कारखाने बंद, कार्यालये बंद, हॉटेल्स बंद म्हणजे हवेचे, पाण्याचे, आवाजाचे प्रदूषण नाही. त्यामुळे प्रदूषणापासून होणारे आजार थांबले पाहिजेत.

* या कोरोनामुळे सर्व प्रकारच्या व्यसनांवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे त्यातून उद्भवणारे आजार, रुग्णही कमी झाले आहेत.

म्हणजे सुखी- समाधानी जीवनासाठी चांगला आहार-विहार-आचरणाची गरज आहे. आपल्या गरजा खूप कमी असतात.