संचारबंदीत सकारात्मतेचा ध्यास

0
149

 

  • माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा)

 

‘आपल्याच विश्‍वात गाढ झोपलो होतो आपण आणि आता एका वेगळ्याच विश्‍वात आपल्याला जाग आलीय. आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या गोष्टी कुचकामी आहेत. विश्‍वाचा गाडा मात्र पूर्ववत चालूच आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना.’

 

 

२१ दिवसांचा लॉकडाऊन.

अरे बापरे, आता कसं होईल? घरकामाची बाई? तिला तर लगेच असल्या सनसनाट्या बातम्या पोचतात. एवढ्यात ‘सेल’ वाजला ‘हेल्पर’चा सेल कॉल, ‘‘ताई उद्यापासून २१ दिवस बंद हाय नव्हं? म्या कामावर नाय येणार… ऐकताय नव्हं?’ माझं डोकं सुन्न झालं. झाडलोट, लादी पूसणं, धुणी, भांडी एकसारखी कामाची जंत्री… चलचित्राप्रमाणे डोळ्यांसमोर सरकू लागली. त्यात घरच्यांचे प्रश्‍न ‘बर्ड फ्ल्यू’मुळे चिकन-मटणावर बहिष्कार. आता या दिवसात मासेपण उपलब्ध नसतील. जेवायचं कसं? या कामाच्या रहाट्याडग्यात घरच्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवायचे कसे? या विचाराने माझी तर दातखिळीच बसली. घरची घडी बसवताना नाकी नऊ आले.

हळूहळू दहा-बारा दिवस सरले. घरकामांची योजनाबद्ध जबाबदारी सांभाळूनही सवड मिळू लागली. कुणाला घरी बोलावणे नाही की कुणाच्या घरी जाणे नाही. कोणाला आपण मदत करावी की कोणी आपलीच मदत करेल हे ही कळेना. काय लिहावे आणि काय वाचावे हेही उमजेना. माझ्यामधील वाचक जागा झाला आहे की लेखक जागा झाला आहे. संभ्रम निर्माण झाला आहे. बाहेर कोरोना नक्की काय करतो ते कळेना व घरात करमेना.

मी निश्‍चय केला. सतत त्या कोरोनाच्या बातम्या ऐकून ‘कोविड-१९’च्या संक्रमित केसेसचे आकडे बघून मी चित्त दुश्‍चित्त करणार नाही. शेवटी आपलं आरोग्य लाख मोलाचं. कोरोना व्हायरस संदर्भात योग्य ती दक्षता घेत फुरसतीचा वेळ सत्कारणी लावावा. काय सांगावं! न पुनरेति लॉकडाऊन!

आज कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. सगळे घरात बसले आहेत. पूर्वीच्या पिढीसारखे एकत्र जेवतो. गप्पा गोष्टी करतो. आपत्‌कालीन परिस्थितीवर ताशेरेही मारले जातात.

काय करायचं? कसा टाईमपास करायचा? अजून किती दिवस असंच घरात बसावं लागणार? अनेक प्रश्‍न अनेकांना पडले आहेत. मला मात्र यातला एकही प्रश्‍न भेडसावत नाही.

सध्या मी या सुवर्णमय सवडीत माझी आवडती पुस्तके वाचण्याचा सपाटा लावलेला आहे. पु.लं., बासी, चिंत्र्य, जीए… वाचता वाचता महाविद्यालयीन स्मृतीही उफाळून येतात. ‘रॅक’ मधील जुनी पुस्तके काढून वाचण्याचा छंद जोपासते. अधुनमधून लेखन चालू आहे. आजच्या विपरित परिस्थितीवर तसेच लॉकडाऊनमुळे नवीन पिढीच्या बदलणार्‍या खाद्यसंस्कृतीवर लिहिणे चालू आहे. तसेच कोरोना संदर्भात फॉरवर्डेड मेसेजेस् दुसर्‍या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करण्याचा पण सजग उपद्व्याप चालू आहे.

गेल्या दोन आठवड्यात कोणत्याही हॉटेलात साधी भजी पण खाल्लेली नाहीत. कुठलंच पार्सल पण आणलं नाही. जेवणाची तर गोष्टच सोडा. सध्या सर्व ‘होममेड रेसिपीज’ बनवते. आधुनिकतेच्या नावाखाली रोजच वेगवेगळ्या पारंपरिक पौष्टिक रेसिपीज नव्या नामकरणाच्या संस्कारासह बनू लागल्या. मॅकडी, पिझ्झा, डॉमिनोज बर्गर… किचनमधील स्विगी, झोमॅटोच्या एन्ट्रीज् कधीच नामशेष झाल्या.

रवाउतप्पा, इडली-सांबार. सांबार उरला तर मेदूवडे. मेदूवड्याचं पीठ उरलं तर दहीवडे, उरलेल्या कोबीची भजी, शिल्लक राहिलेल्या फणसाच्या भाजीचे कटलेट अशा मुलामा दिलेल्या चटपटीत पदार्थांची चंगळमंगळ होत आहे. उद्याच्या ‘मेनू’चे काय? कार्यकुशलतेने ‘प्लॅनिंग’ करायचं ते रात्रीच डोक्यात सुरू झालेलं असतं. सारखं आपलं खायला काय आहे, खायला काय आहे या प्रश्‍नांचा तगादा ऐकून एखादे वेळेस असाही विचार येतो की नको हे ‘लॉकडाऊन’. आता ‘नॉकडाऊनच’ बरं. परंतु शवपेटीतील अवस्थेपेक्षा घरातले लॉकडाऊन केव्हाही चांगले या कल्पनेने मी नॉकडाऊनच्या विचाराचा चोळामोळा करून टाकला. ‘स्टे होम, स्टे सेफ’ आज हाच सुरक्षित जीवनाचा मूलमंत्र झाला आहे.

प्रत्येकाचं जीवन महत्त्वाचं हे ध्यानात घेतलं तर आजच्या वर्तमान स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या घरात राहून आपला वेळ सकारात्मक कार्य करण्यात व्यतीत करावा.

आपण बालपणात पत्त्यांचा बंगला बनवत असू. ठीक अशीच आजची स्थिती आहे. पत्त्यावर पत्ते ठेवून सात मजली बंगला बांधायचो. सातव्या मजल्यावर एकच पत्ता दिसायचा. परंतु तो एक पत्ता खालील कित्येक पत्त्यांच्या आधारे उभा राहायचा. सर्व पत्त्यांच्या एकमेकांच्या आधारावरच बंगला उभा केला जायचा.

अशीच आजची परिस्थिती आहे. भविष्यात जेव्हा आमचा हा सुरक्षा कवचाचा बंगला जाईल तेव्हा सर्वात वर आपल्या मोदीजींचा पत्ता असेल कारण ते आपले प्रधानमंत्री आहेत आणि अतिशय कार्यकुशलतेने ते आपल्या देशवासियांचे नेतृत्व करत आहेत. परंतु खालच्या सर्व पत्त्यांनी जनतेने आपलं दायित्व पूर्ण केलेलं असेल तरच हेसुद्धा कवच पूर्ण होईल.

गेल्या १०-१२ दिवसांत कळत नकळत छोटी-मोठी कामं करताना कुटुंबियांचा, शेजार्‍यांचा अहंकार कमी झाला. जगण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची गरज असते याची जाणीव झाली. जीवनातील यांत्रिकीपणा हळूहळू नाहीसा होऊन माणसांशिवाय जगणं नसतं याची प्रचीती आली. कुटुंबातील माणसांच्या आपुलकीच्या नात्यांची परत नाळ जुळली.

अचानक वाचनात आलं – ‘आपल्याच विश्‍वात गाढ झोपलो होतो आपण आणि आता एका वेगळ्याच विश्‍वात आपल्याला जाग आलीय. आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या गोष्टी कुचकामी आहेत. विश्‍वाचा गाडा मात्र पूर्ववत चालूच आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना.’

खरंच कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं. आम्ही कधीच घरी राहून वेळ घालवत नव्हतो. राहिलो तरी एकमेकांशी संवाद साधत नव्हतो. सगळे आपापल्या लहरी वागण्यात मग्न. आईला मोबाईलशिवाय मुलांसाठी वेळच नसायचा. वडील तर नेहमी फुरसतीच्या वेळात वर्तमानपत्रात तोंड खूपसून नाहीतर व्हॉटस्‌ऑफ, फेसबुकवर असायचे.

कोरोनाने दुरावलेल्या नात्याना लळा लावला. गलथानपणात राहण्यात आम्हाला अभिमान वाटायचा. मॉडर्नतेचे नाव घेऊन विकृती फोफावत होती. विसरून गेलो होतो आपण आपली संस्कृती. कोरोना, माणसातील माणसूकीचे नातं तू दाखवून दिलेस. माणसाचे निःस्वार्थी रूप प्रकट केलंस. खरंच कोरोना, तू माणसाला कुटुंबात, समाजात जगायचं कसं ते शिकविलंस.