पंजाबात १ मे पर्यंत लॉकडाऊन

0
137

ओडिशा पाठोपाठ पंजाब सरकारनेही काल राज्यात लॉक डाऊनची मुदत १ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा याविषयी घोषणा केली. विविध तज्ज्ञांनी कोरोना विषाणूचा फैलाव भयानक व भीतीयुक्त असा होण्याची शक्यता व्यक्त केल्याने अशा संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या सरकारची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या लॉकडाऊनमधून केवळ रबी पीक कापणीसाठी शेतकर्‍यांना जिल्ह्यांनुसार सूट देण्यात येणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले आहे. यंदा पंजाबात गव्हाचे १८५ लाख टन पीक अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारनेही आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट झाल्याचे याआधी जाहीर केले आहे. केंद्र सरकारनेही १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

पंजाब सरकारने लॉकडाऊन वाढीचा निर्णय एकमताने घेतला आहे. पंजाबात आतापर्यंत ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे व कोरोना बाधितांची तेथील संख्या १३७ वर गेली आहे.