>> संचारबंदीचा मच्छिमारी व्यवसायावरही परिणाम : शेकडो ट्रॉलर किनार्यावर स्थिरावले
देशात संचारबंदी लागू केल्यामुळे मच्छिमारी बंद आहे. आधीच ट्रॉलर किनार्यावर नांगरून ठेवण्यात आले आहेत. मच्छिमारी हंगाम संपण्याच्या वेळी ट्रॉलर किनार्यावर नांगरून ठेवले जातात. मात्र संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ट्रॉलर मासेमारीसाठी जात नाहीत. वास्कोतील खारीवाडा येथील जेटीवर तसेच खोल समुद्रात शेकडो ट्रॉलर किनार्यावर नांगरून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ माशांची विक्री केली जाते. काही ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात गेले होते, तेही आता परतले आहे. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर छत्तीसगड, ओडिशा येथील खलाशीही गोव्यातील ट्रॉलरवर काम करतात. पावसाळ्यात मच्छिमारी बंद असल्याने ते गावी जातात. आणि पुन्हा दोन महिन्यांनी परत येतात. मोठ्या ट्रॉलरवर साधारणतः ४० तर छोट्या ट्रॉलरवर १५ ते २० खलाशी काम करतात. हे खलाशी सध्या ट्रॉलरवर अडकले असून गावी जाण्यासाठी त्यांना कोणतीही सुविधा नसल्याने मालकांना त्यांना बसूनच पगार द्यावा लागत आहे. दरम्यान फिशिंग ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले, मासे विक्रीसाठी बाजारपेठ बंद आहे. शिवाय ट्रक बंद आहेत. त्यामुळे मासे निर्यातही होत नाही. गोवेकर जे मासे खात नाहीत ते मासे गोव्याबाहेर पाठविले जातात. मात्र ट्रक वाहतूक बंद असल्याने ते मासे तसेच पडून आहेत. ते मासे खराब होण्याअगोदर मंत्र्यांकडे यावर उपाययोजना करण्यासंबंधात प्रयत्न करावेत, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.