भो राम, माम् उद्धर

0
326
  • प्रा. रमेश सप्रे

 

यासाठी हवा वज्रसंकल्प… (करोना) विषाणूच्या कहरावर (श्रीराम) मात करण्यासाठी विष्णूचा गजर करण्याचा. श्रीरामचरित्राचं चिंतन आणि रामनामाचं स्मरण म्हणजे केवळ उच्चारण (जप) नव्हे तर रात्रीचा दिवस करून स्वतःचं चरित्र सुधारण्यासाठी साधना करण्याचा.

 

रामनवरात्राानिमित्तानं प्रवचनमाला सुरु होती. गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काळ्या रामाच्या मंदिराची कल्पक सजावट नि आकर्षक रोशणाई केली होती. उत्सवाची मध्यवर्ती उद्दिष्टं होती समाजसंघटन नि समाजप्रबोधन. त्यादृष्टीनं विचार करायला प्रवृत्त करणारी प्रवचनमाला हे विशेष आकर्षण होतं.

व्यासपीठ रामचरित्रातील प्रसंग चिंत्रांनी सजवलं होतं. पण प्रवचनकारांच्या मागे पडद्यावर एक सर्वांचं लक्ष वेधून घेणारं भव्य चित्र (कट आउट) लावलं होतं. दशानन रावणाची फक्त दहा तोंडं दाखवली होती नि प्रत्येक मुखाच्या वर असलेल्या मुकुटावर एकेक राष्ट्रीय (तशी जागतिकही) समस्या लिहिली होती. सर्वांसमोर आ वासून उभ्या असलेल्या या समस्या होत्या-

* आर्थिक मंदीचा धोका, दारिद्य्र, दहशतवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक असुरक्षितता, सर्वंकष प्रदूषण, दुर्बल प्रशासन, अपुर्‍या पायाभूत सुविधा, सामाजिक विषमता…

रामचरित्राच्या माध्यमातून या दश समस्यांचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं होतं.  श्रोत्यांना एक गोष्ट ठासून सांगितली जात होती की या रावणाचं दहन अखेरच्या दिवशी करायचंय. पुतळा जाळणं सोपं असतं पण पुतळा ज्या वृत्तिप्रवृत्तींचं प्रतीक असतो. त्यांचा विनाश खूप अवघड असतो. तोच कसा करायचा हाच विषय प्रवचनातून मांडायचा होता.

प्रवचनमालेतील पुष्पांचे तीन विभाग केले होते.

* पूर्वरंग ः श्रीरामचरित्राची पार्श्‍वभूमी

* मध्यरंग ः श्रीराम चरित्रातील महत्त्वाचे पैलू (एका खास अंगानं)

* उत्तररंग ः श्रीरामराज्याचं वर्णन – आजचं राज्य रामराज्य बनवण्याचे मार्ग नि साधनं.

याच अंगांनी आपणही श्रीरामचरित्रावर सहचिंतन करु या.

श्रीरामचरित्राची पार्श्‍वभूमी –

सर्वसाधारण कथाप्रसंग आपल्याला माहीत असतो.

महर्षी वाल्मीकी शिष्यांसह तमसा नदीवरून प्रातःस्थान करून पुण्यपवित्र भावनेनं आश्रमाकडे येताहेत. वाटेत एका वृक्षावर क्रौंच पक्ष्यांच्या युगुलाची क्रीडा चालू असताना एक बाण भिरभिरत येतो नि वेध घेतो क्रौंच नराचा. बाण लागलेला तो क्रौंच खाली कोसळतो. पक्षिणी त्याच्याभोवती व्याकूळ होऊन आक्रंदत फिरत राहते. चोचीनं बाण काढण्याचाही प्रयत्न करते. पण व्यर्थ! हे करुण दृश्य पाहून उत्स्फूर्तपणे वाल्मीकींच्या मुखातून त्या बाण मारणार्‍या व्याधाला (शिकार्‍याला) उद्देशून शापवाणी बाहेर पडते. सर्वांना दोन गोष्टींचं आश्‍चर्य वाटतं. जितक्रोध – (राग जिंकलेल्या) वाल्मीकींच्या तोंडून शाप कसा बाहेर पडला? त्या पक्ष्यानं व्याधाचं काहीही वाईट केलं नसताना त्याला का मारलं? हा प्रश्‍न त्या शापाच्या मुळाशी होता, त्याच न्यायानं त्या व्याधानं वाल्मीकींचं प्रत्यक्ष काय वाईट केलं होतं, म्हणून त्यालाच नव्हे तर त्याच्या वंशाला वाल्मीकींनी शाप दिला.

याहूनही आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे वाल्मीकींना क्रौंच हत्येमुळे झालेल्या शोकातून शाप बाहेर पडला. पण तो प्रथमच प्रकट झालेल्या मंजुळ अशा अनुष्टुप छंदात व्यक्त झाल्याने त्याचा श्‍लोक बनला. उत्कट वेदनेनं भरलेला तो श्‍लोक ही पहिली कविता होती. वाल्मीकी खर्‍या अर्थानं आदिकवी नि रामायण हे आदिकाव्य ठरण्यासाठी आणखी काही घटना घडायच्या होत्या. त्या घडल्याही त्याच दिवशी. साक्षात् ब्रह्मदेव, सरस्वती यांनी येऊन वाल्मीकींना त्यांची प्रतिभाशक्ती जागी झाल्याचे सांगून त्यांच्याकडून काळावर मात करणारी काव्यरचना होणार असल्याचं भविष्य वर्तवलं. याचा निश्‍चित अर्थ काय यावर चिंतन करत असतानाच नारदमुनी आले. त्यांना घडलेला सारा प्रकार सांगून वाल्मीकींनी नारदांना विचारलं – मला एका महामानवावर काव्यरचना करायला आवडेल. पण त्या महापुरुषात १६ गुण (षोडशगुणसंपन्न) असायला हवेत. ‘कोणते गुण’ असं नारदांनी विचारल्यावर वाल्मीकींनी एक यादीच सादर केली…

१. सद्गुणसंपन्न, २. वीर्यवान (शूरवीर), ३. धर्माचं ज्ञान असलेला (धर्मज्ञ), ४. कृतज्ञ, ५. सत्यवचनी, ६. दृढनिर्धारी, ७. चारित्र्यवान,

८. सर्वभूतहितरत, ९. विद्वान, १०. सामर्थ्यवान, ११. सर्वांचं प्रिय पाहणारा (प्रियदर्शी), १२. आत्मज्ञानी, १३. जितक्रोध (क्रोध जिंकलेला), १४. तेजस्वी, १५. निर्मत्सरी, १६. कधी क्रुद्ध झालाच तर देवांनाही भय उत्पन्न करणारा.

हे सारे गुण ऐकून नारद आनंदानं उद्गारले, ‘यापेक्षाही अधिक गुणांनी युक्त असलेला श्रीराम नावाचा एक राजा आपल्या सुदैवानं सध्या (सांप्रतकाली) अयोध्येत राज्य करतोय. एवढंच नव्हे तर त्याच्या जीवनातील आजवरच्या घटना मी तुला संक्षिप्त रुपात सांगीन. पुढच्या चरिाला तुम्ही स्वतः साक्षीदार असाल इतकंच नाही तर साथीदारही असाल.’ नारदांच्या या आशीर्वादानं वाल्मीकींचा आत्मविश्‍वास वाढला; काळाच्या ओघात त्यांच्याकडून रामायणासारखं कालजयी महाकाव्य रचलं गेलं. ते स्वतःही श्रीरामचरित्राचा महत्त्वाचा भाग बनले.

श्रीरामचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग –

सप्तकांडात्मक (सात कांडं म्हणजे विभाग असलेला) रामायण किंवा त्याच्यावर म्हणजे वाल्मीकींनी रचलेल्या रामकथेवर आधारित असं आध्यात्मिक उपासनेच्या अंगानं तुलसीदासांचं ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथच श्रीरामाचं शरीर आहे असं अप्रतिम वर्णन तुलसीदासांनी केलंय.

१बालकांड प्रभुपाय, २अयोध्या कटि मनमोहै |

उदर बन्यो३अरण्य, हदय४किष्किंधा सोहै ॥

५सुंदर ग्रीव, मुखारविंद६लंका कहिआयो |

जेहि महँ रावण आदि निसाचर सर्व समायो ॥

मस्तक७उत्तरकांड गनु, एहि बिधि तुलसीदास मनु |

आदि अंत लौ देखिये, श्रीमन्मानस रामतनु ॥

– याचा अर्थ तसा सरळ आहे. सात कांडातून रामायणाची रसवाहिनी आपल्याला आस्वाद घ्यायला मिळते.

तुलसीदास म्हणतात त्याप्रमाणे, ‘हरि अनंत, हरिकथा अनंता’. हरी म्हणजे भगवान विष्णू ज्याचा सातवा अवतार श्रीराम म्हणून जन्माला आला. रामायणाची कथा जवळजवळ सर्व भारतीयांना माहीत असते. सर्वांना ती अगदी आतून आवडते, असं घडण्यात रामकथेवरची अनेक भाषातली असंख्य पुस्तकं तर आहेतच, पण नाटकं, चित्रपट अशा माध्यमातून या कथेची अविट गोडी आपण चाखत असतो. रामचरित्र सर्वात प्रभावीरीत्या जवळजवळ सर्व मानवजातीपर्यंत पोचवण्याचं काम अलीकडच्या काळात दूरचिवाणी (टीव्ही)नं केलं.

या कथेतली श्रीराम- सीता, लक्ष्मण-भरत, हनुमान या पात्रांनी असंख्य मनांवर जी मोहिनी घातलीय तिला मानवाच्या इतिहासात तोड नाही.

आपण माहीत असलेल्या श्रीरामकथेचा वेगळ्या अंगानं विचार करु या.

* ऋषीमंडलाचा श्रीरामचरित्रावर प्रभाव –

१. श्रावणबाळाचे ऋषीपिता – श्रावणबाळाची हदयस्पर्शी कथा सर्व आबालवृद्धांना ठाऊक असते. दशरथाच्या शब्दवेधी बाणानं श्रावणबाळ मारला गेला. (बाळ म्हटलं ते रूढार्थानं, एरवी तो अंध मातापित्यांना कावडीत बसवून सारी तीर्थक्षेत्र दाखवण्याची क्षमता असलेला युवक होता. ) आपल्या पुत्राचा वियोग सहनव न होऊन दशरथाला त्यांनी अशाच पुत्रवियोगानं मरण येण्याचा शाप दिला. साडेतीनशे राण्या असूनही दशरथाला अपत्यप्राप्ती झाली नव्हती. एका अर्थी हा शाप इष्टापत्तीच ठरला. श्रीरामाच्या जन्माचा प्रवास अशाप्रकारे एका ऋषींच्या शापवाणीतून सुरू झाला.

२. ऋष्यशृंग – अनेक ज्ञानी हितचिंतकांच्या सांगण्यावरून दशरथानं अपत्यलाभासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञातून अग्निदेवानं दशरथाला दिव्य पायसदान दिलं. ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्शनानं यज्ञ सिद्ध झाला. श्रीरामादी चार पुत्रांचा जन्म झाला हाही श्रीरामाच्या जीवनावर झालेला जन्मपूर्व ऋषिप्रभावच होता.

३. वसिष्ठ  हे तर रघुकुलाचे राजगुरु, कुलगुरुच होते. साहजिकच त्यांच्या आश्रमात श्रीराम व इतर बंधूंचं आवश्यक ते शिक्षण झालं. पुढे राज्याची पाहणी केल्यावर त्यातील परिस्थितीमुळे श्रीरामाच्या संवेदनशील मनाला उदासीनं, खिन्नतेनं ग्रासलं. त्याच्या मनाला पुन्हा उभारी आणून त्याचा पुरुषार्थ जागा करण्याचं कामवसिष्ठांनीच श्रीरामाच्या सर्व प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरं देऊन केलं. यातूनच साकारला सार्‍या मानवजातीला सर्वकाळासाठी मार्गदर्शक असा ‘योगवासिष्ठ’ हा महाग्रंथ.

४. विश्‍वामित्र – वसिष्ठ हे रामाचे शास्त्रगुरु आणि मंत्रगुरु होते. विश्‍वामित्र हे रामाचे शस्त्रगुरु आणि तंत्रगुरु बनले. श्रीरामाच्या ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम्’ या अवतारकार्याचा आरंभ विश्‍वामित्रांनी त्याला दिलेल्या शस्त्रास्त्रविद्या नि इतर शक्तींमुळे झाला. त्राटिकावध, विश्‍वामित्रांचा यज्ञ भ्रष्ट नि उध्वस्त करणार्‍या सुबाहू- मारीच या त्राटिकापुत्रांना शासन करुनच झाला. यापैकी सुबाहूला ठार केलं तर मारीचाला दूर फेकून दिलं. कारण आपल्या भावी जीवनात मारीचाकडून एक कार्य घडणार आहे याची श्रीरामाला कल्पना होती.

विश्‍वामित्रांच्या उपस्थितीत घडलेल्या श्रीरामाच्या जीवनातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे शापित अहल्येचा उद्धार आणि मिथिलानगरीत राजा जनकाच्या उपस्थितीत झालेला सीतेशी विवाह. गीतरामायणातील त्या अमरगीतात ग.दि. माडगूळकर – सुधीर फडके या प्रतिभावंत जोडीनं साकार केल्याप्रमाणे …

‘आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे |

स्वयंवर झाले सीतेचे ॥

यात निळ्यासावळ्या श्रीरामाला अनंत आकाश म्हटलंय हे किती अर्थपूर्ण आहे!

५. गौतम ऋषी – हे सती अहल्येचे पती. आपल्या पत्नीकडून घडलेल्या चुकीमुळे तिला (नि तिला भ्रष्ट करणार्‍या इंद्रालासुद्दा) जो शाप दिला, त्यावेळी तिचा उद्धार विणू भगवानांच्या श्रीराम अवतारात श्रीरामाच्या पदस्पर्शानं होईल असा उःशाप दिला. त्यात गौतम ऋषींची द्रष्टा शक्ती दिसून आली. एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष अहल्योद्धाराच्या वेळी ते स्वतः, पु शतानंदासह उपस्थित होते. त्यांनी श्रीरामाला भरभरून आशीर्वादही दिला.

६. भरद्वाज – वनवासाच्या आरंभी नि अंती यांच्याच आश्रमात श्रीरामादींनी मुक्काम केला. वनवासारंभी श्रीरामाला अनेकानेक जडीबुटीच्या औषधी उपयोगांचं नि आयुर्वेदाचं ज्ञानही दिलं.

७. जाबाली – चित्रकूट पर्वतावरील भरत, सर्व माता, वसिष्ठ, सुमंत्रादी ज्ञानीजन यांच्या अयोध्येत परतण्याच्या सूचनेचा स्वीकार रामानं केला तेव्हा जाबाली ऋषींनी सांगितलं की राम हा कौसल्येचा मुलगा आहे पण दशरथाचा पुत्र नाही. त्याचा जन्म यज्ञातील पायसापासून झालाय. हे ऐकल्यावर वरच्या आवाजात रामानं असं नास्तिक मत मांडल्याबद्दल त्यांचा निषेध केला. यावर जाबाली ऋषी उद्गारले, ‘साधु! साधु! रामा असं मत मांडूनही तू आपल्या प्रतिज्ञेपासून ढळत नाही याची इतिहासात नोंद व्हावी. तुझं चारित्र्य उजळून निघावं यासाठीच मी तसं विधान केलं. माझं तसं मत नाही.’

८. अत्रि(अनसूया) – श्रीरामाचं आपल्या पावन आश्रमात स्वागत करून, त्याला ओउपदेश करून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं. विशेषतः सीतेला सती अनसूयेनं आईच्या ममतेनं उपदेश करून अलंकार, सौभाग्यभूषणं प्रदान केली. सीतेला धीर दिला. धन्यतेचा अनुभव दिला.

९. शरभंग ऋषी – रामादींचं हार्दिक स्वागत करून, बोधपर संवाद करून सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात जायला सांगितलं. वाटेत मानवांच्या अस्थींचा प्रचंड ढीग पाहून श्रीरामानं तेथील ऋषीकुमारांना त्यासंबंधी विचारलं. ‘ते आमच्या गुरुंचे, त्यांच्या पूर्वीच्या गुरुंचे अनेक पिढ्यांचे हाडांचे ढीग आहेत. या पूज्य मंडळींना नरभक्षक राक्षसांनी खाऊन, आतंक निर्माण करून येथील आश्रम नि यज्ञसंस्कृतीचा अनेकवेळा विध्वंस केला. तरीही आम्ही गुरुपरंपरा नि यज्ञसंस्कृती चालू ठेवण्यासाठी निर्भयपणे इथे वास्तव्य करून आहोत.’ हे ऐकून श्रीरामानं राक्षसांचा समूळ संहार करण्याची वज्रकठोर प्रतीज्ञा केली. एकप्रकारे त्याच्या खर्‍या अवतारकार्याची ही नांदी होती. त्याच्या पराक्रमाचा श्रीगणेशा (आरंभ) होता.

१०. सुतीक्ष्ण ऋषी – यांच्या आश्रमात श्रीरामादी पोचले तेव्हा वनवासाची दहा वर्षं पूर्ण झाली होती. पुढील कार्याची प्रेरणा, चर्चा, मार्गदर्शन सुतीक्ष्णांच्या उपस्थितीत झालं.

११. अगस्ती – या महान ऋषींनी श्रीरामाला विष्णुधनुष्य, ब्रह्मदेवाचा बाण, अक्षयभाते नि तेजस्वी खड्‌ग (तलवार) प्रदान करून शस्त्रास्त्रसज्ज केलं. दक्षिण भारतात प्रवेश करून त्यांना गोदावरीकाठी पंचवटी- निवास करण्यास सुचवलं. इथंच पुढे शुर्पणखेची विटंबना, मायावी सुवर्णमृग (मारीच राक्षस जो आता साधूचं आश्रम आयुष्य जगत होता.), सीतेचं रावणाकडून अपहरण, जटायूचा पराक्रम नि श्रीरामाकडून त्याला मुक्ती असे महत्त्वाचे प्रसंग घडले. सीताशोध, रावणसंहार हा रामचरित्राचा कलशाध्याय सुरु झाला.

१२. वाल्मीकी – रावणसंहार, सीतामुक्ती, अयोध्येत राज्याभिषेक, रामराज्याचा आरंभ, सीतेचा त्याग, तिला वाल्मीकींच्या आश्रमासमोर सोडणं हे प्रसंग घडले. त्यानंतर गर्भवती सीतेची प्रसूती, कुश-लवांचं नामकरण, शिक्षण नि श्रीरामचरित्राचं ज्ञान या महत्त्वाच्या घटना वाल्मीकींच्या सहभागानं नि साक्षीनं घडल्या. पुढे सीता, कुशलवांना अयोध्येत नेऊन श्रीराम नि अयोध्यावासी यांच्या सुपुर्द करण्याचं महत्त्वाचं कार्य वाल्मीकींकडून घडलं. सर्वांत मुख्य म्हणजे ‘रामायण’ हे चिरंतन महाकाव्य रचून मानवतेवर मोठे उपकार केले.

१३. दुर्वास – तपःसामर्थ्य आणि क्रोध यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ऋषींनी काळपुरुष आणि श्रीराम यांच्यात एकांतात संवाद चालू असताना लक्ष्मणाला तिथं जाण्यास भाग पाडून एका अर्थी श्रीरामाच्या जीवनाचा, रामायणाचा अंतिम प्रवास निश्‍चित केला. पूर्वअटीनुसार लक्ष्मणाचा त्याग (मत्युदंड), नंतर सर्व भावांच्या नि आपल्या पुत्रांकडे राज्यव्यवस्था सोपवून श्रीरामानं, आपल्या माता, सल्ला देणारे मार्गदर्शक इत्यादींसह शरयू नदीत आत्मविसर्जन केलं. अवतार कार्य संपन्न झालं होतं. चरित्राचा हा कळसबिंदू होता.

* रामराज्य – * उदात्त संस्कार, उच्च मूल्यं यावर आधारित शासनयंत्रणा अस्तित्वात आली.

* लोकांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य यांचा लाभ. अपघात, आत्महत्या, अनैसर्गिक मत्यू यांचा अभाव.

* स्त्रियांना वैधव्य नाही, वृद्धांना बालकांची, युवकांची प्रेतकर्मं (अंत्यसंस्कार) करावे न लागणं.

* संपूर्ण समाज मानसिकदृष्ट्या सुदृढ, सुरक्षित.

* चोरी, हिंसा अपराध, सामाजिक विषमता यांचा अभाव.

* कुटुंब आनंदी, पुत्रपौत्रसहित, सुखवस्तू, समाधानी.

* सर्व सामाजिक, नैतिक कर्तव्यांचं सर्वांनी पालन केल्यामुळे ऋतुचक्र (पर्जन्य) नियमित.

* पर्जन्यवत करयोजना – श्रीमंत सागराकडून पाऊस निर्माण करून सर्व शेताना, जनतेला वृष्टी.

* लोककल्याण (प्रजानुरंजन), अनुकूल लोकमतावर आधारित कल्याणकारी राज्ययंत्रणा (व्यवस्था).

* स्वकर्म, स्वकर्तव्य, स्वधर्म यांचं पालन करणारी कर्तव्यपरायण (केवळ हक्कपरायण नाही) जनता.

* ‘यथा राजा तथा प्रजा नि यथा प्रजा तथा राजा’ या तत्त्वाचं प्रभावी पालन.

अशा गुणवैशिष्ट्यांनी रामराज्याची स्थापना करून मानवजातीला एक आदर्श घालून दिला.

असं रामराज्य प्रत्यक्षात आणणं हेच खरं दशमुखी (समस्या) रावणाचं दहन असतं. पुतळे जाळणं हे प्रतीकात्मक असतं. आता तर रावण दहन (नरकासुर वध) हे भव्य- इव्हेंट्‌स झालेयत. गदारोळी वातावरण, सेल्फी- फेसबुक अशा अत्यंत उथळ प्रकारांनी गजबजलेले उत्सव हे ‘उत्-सव’ (काहीतरी उदात्त, मंगल, महन्मधुर निर्माण करणारे ) उरलेले नाहीत.

… तरी बरं कोरोना विषाणूनं (व्हायरस) प्रत्येक व्यक्तीला नि राष्ट्राला त्याची जागा दाखवून दिलीय. सारे देश या विषाणूमुळे एकाच अगतिक पातळीवर आलेयत.

हीच संधीही आहे (केवळ संकट नव्हे!) आपल्या मर्यादांची आतून जाणीव होऊन त्यावर (केवळ करोना विषाणूवर नव्हे, कारण हंता नावाचा दुसरा विषाणू अवतरला आहेच) मात करून ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं अनुसरण करण्याची. श्रीरामचरित्र नि त्याचं नामस्मरण करण्याची, खर्‍या अर्थानं रामजन्म साजरा करण्याची. यासाठी हवा वज्रसंकल्प… (करोना) विषाणूच्या कहरावर (श्रीराम) मात करण्यासाठी विष्णूचा गजर करण्याचा. श्रीरामचरित्राचं चिंतन आणि रामनामाचं स्मरण म्हणजे केवळ उच्चारण (जप) नव्हे तर रात्रीचा दिवस करून स्वतःचं चरित्र सुधारण्यासाठी साधना करण्याचा. नाहीतरी हाच संदेश नाही का पाडव्यापासून सुरू झालेल्या शार्वरी (शर्वरी म्हणजे रात्र) संवत्सराचा?