योगसाधना – ४५४ अंतरंग योग – ४०

0
160
  • डॉ. सीताकांत घाणेकर

 

आपणही शास्त्रशुद्ध ध्यान केले तर जीवनातल्या समस्यांची उत्तरे वेळोवेळी मिळतील. जी गोष्ट देवांना साध्य झाली ती आम्हालादेखील होणार. सगळी उत्तरे पुस्तकात किंवा गुरुकडून मिळणार नाहीत. ध्यानात आपली आत्मशक्ती वाढते कारण आपला योग म्हणजे जोडणे हे प्रत्यक्ष भगवंताशी होते.

 

अंतरंग योगात आपण आता पुढे पुढे जात आहोत. ध्यान या पैलूवर विचार चालू आहे. त्यात मूर्तिपूजा (शास्त्रशुद्ध व नियमित) कशी उपयोगी पडू शकते हे आपण बघत आहोत. अवधानासाठी आवश्यक अटींवर विचार करताना आपण – ‘विश्‍वास अथवा अभिरुची’- या मुद्यांवर सखोल विचार केला. आता आपण ‘नैसर्गिक प्रेरणा’ याचा अभ्यास करत आहोत. इथे तीन मुख्य भाव आवश्यक आहेत- * कुतूहल, *जिज्ञासा, * आत्मियता.

यातील कुतूहल या विषयावर पू. पांडुरंगशास्त्री काय सांगतात ते आपण बघितले. आता ‘जिज्ञासा’ याबद्दल ते काय सांगतात ते बघूया-

* जिज्ञासा ः ‘जिज्ञासे’ने मनात आकर्षण निर्माण होते. सृष्टीतील भिन्न भिन्न रहस्ये, त्यांचा निर्माता भगवान या सर्वांना जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. तिच्यामुळे ध्यान केंद्रीत होते.

भौतिक जीवनात किंवा विज्ञान क्षेत्रातसुद्धा जिज्ञासा मुख्य आहे.

* गुरुत्वाकर्षण ः आयझॅक न्यूटन हा १२ ते १४ वर्षांचा शेतकर्‍याचा मुलगा, बागेत बसला होता तेव्हा त्याने सफरचंद खाली पडताना बघितले. त्याच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली… हे फळ खालीच का पडले?.. वर किंवा डावी-उजवीकडे का गेले नाही? या विषयावर त्याने चित्त एकाग्र केले म्हणजेच त्याने ‘ध्यान’ केले आणि त्याला गुरुत्वाकर्षणाची जाणीव झाली. त्या विषयाचे त्याने काही नियम विज्ञानाला दिलेत.

त्याच्या साथीदारांनी सफरचंदे खाऊन टाकली. त्यांनी चिंतन केले नाही, ध्यान केले नाही. म्हणून ते सामान्यच राहिले व आयझॅक न्यूटन प्रख्यात वैज्ञानिक झाला. तसे बघितले तर त्याच्या कुटुंबात या विषयावर विचार नव्हताच.

भारतीय विज्ञानाकडे लक्ष दिले तर कळेल की भारतात गुरुत्वाकर्षणाबद्दल ज्ञान फार पूर्वीपासून उपलब्ध होते.

विमान ः माणूस आकाशात उडू शकत नाही पण पक्षी उडतात. राईट बंधूंनी हे बघितले व त्यांची जिज्ञासा जागृत झाली. त्यांनी या विषयावर विविध प्रयोग केले. सुरुवातीला पुष्कळ अपयश आले. पण ते खचले नाहीत. प्रत्येक अपयश ही यशाची पायरी आहे हे मानून त्यांनी प्रयोग चालू ठेवले. त्यांच्या प्रयत्नांची परिणती म्हणजेच हवाई जहाज. हल्ली तर हे शास्त्र एवढे प्रगत झाले आहे की मोठमोठी विमानं बनवली जात आहेत. स्पेसशिप्स सुद्धा तयार होताहेत.

सारांश एवढाच की कुतूहलाबरोबर जिज्ञासाही हवीच. तरच नवीन शोध लागतात.

पाश्‍चात्त्यांनी भौतिक विज्ञानाचा शोध घेतला तर भारतीय वैज्ञानिक म्हणजे आमचे ऋषी- प्रगल्भ बुद्धीचे- त्यांनी आध्यात्मिकतेचा शोध सुरू केला. त्यातही विविध मुद्दे आहेत…

* जीव – जगत् – जगदीश

* आत्मा – परमात्मा

* विश्‍व – सृष्टी – पंचमहाभूतं

* जन्म – मृत्यू

* सृष्टी ः रचना – सांभाळ – नाश

हे विषय अत्यंत गहन आहेत. फार सूक्ष्म आहेत. वरवर अभ्यास, विचार, चर्चा करून सर्व उत्तरे मिळणार नाहीत. त्यासाठी ‘ध्यान’ करावे लागते. अंतर्मनात खोल पोहावे लागते. केव्हा केव्हा अंतरंगयोगातील पुढील ‘समाधी’च्या अवस्थेमध्ये जावे लागते. ही अवस्था सोधीसोपी नाही. त्यासाठी नियमित साधना करावी लागते.

मुख्य मुद्दा हा की या सर्व उच्च अवस्थांपर्यंत पोचण्यासाठी ‘ध्यान’ करणे आवश्यक आहे.

आध्यात्मिक ज्ञान- जे भारतात प्रगत झाले त्याबद्दल अनेक कथा, आख्यायिका, महाकाव्ये आहेत. ही सर्व बोधप्रद आहेत. ऋषी आपल्या शिष्यांना आत्मज्ञान देण्यासाठी विविध उपाय करत असत. अशीच एक कथा-

एक दिवस आश्रमात असलेल्या देव आणि दैत्यांना गुरुंनी विचारले ः ‘तुम्ही कोण?’ तेव्हा सर्वांनी सांगितले ः ‘मी म्हणजे माझे शरीर. त्याला जे नाव आहे ती माझी ओळख.’

गुरुंनी म्हटले ः ‘शरीर तर नश्‍वर आहे. तू नश्‍वर नाहीस. तुम्ही चिंतन करा, ध्यान करा. नंतर मला सांगा.’

दुसर्‍या दिवशी विद्यार्थी परत आले. दैत्य म्हणाले, ‘‘आम्हाला काही उत्तर मिळत नाही. आम्हाला वाटते की आम्ही शरीरच आहोत. आम्हाला आणखी विचार करून वेळ वाया घालवायचा नाही.’’

ऋषी म्हणाले, ‘‘बरं, तुम्हाला पाहिजे ते करा.’’ तेव्हापासून दैत्य म्हणजे असुर शरीरालाच सर्वस्व मानून त्याचेच चोचले पुरवण्यात मग्न झाले. ‘खाओ- पिओ – मजा करो’ हेच त्यांचे ब्रीद वाक्य झाले.

देव शहाणे होते. त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही चिंतन केले. मी म्हणजे माझे मन. त्याच्यामुळेच मला विचार येतात. मी त्याप्रमाणे वर्तन करतो…’’

गुरु म्हणाले, ‘‘मन चंचल आहे. ते स्थिर नाही. तुम्ही परत चिंतन करा.’’

देव आज्ञाकारक होते. गुरुची आज्ञा त्यांना शिरसावंद्य होती. ते परत गेले. चिंतन सुरू केले. काही दिवसांनी परत गुरुकडे आले, म्हणाले ः ‘‘मी म्हणजे माझी बुद्धी. मन बुद्धीच्या ताब्यात आहे. बुद्धीचे मनावर नियंत्रण असते.’’

ऋषी म्हणाले ः ‘‘बरोबर आहे, पण बुद्धीसुद्धा कलुषित होऊ शकते. खरे म्हणजे बुद्धी ही सद्सद्विवेक बुद्धी असणे आवश्यक आहे. तिच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. काही वेळा हीच बुद्धी जी तारक असायला हवी ती मारक होऊ शकते. म्हणून म्हणतात ना- * विनाशकाले विपरीत बुद्धी.

म्हणून तुम्ही बुद्धीही नाहीत. परत चिंतन करा. प्रामाणिक प्रयत्न करा. भगवंताला समर्पित होऊन ध्यान करा. तुम्ही सज्जन आहात. उत्तर नक्की सापडेल.’’

देव निराश झाले नाहीत. गुरुवर त्यांचे प्रेम होते. त्यांच्याबद्दल आदर व अतूट श्रद्धा होती. गुरुंचे आशीर्वाद घेऊन ते परत गेले. त्यांना दुसरे काहीच सुचेना. फक्त एकच ध्यास- ‘‘मी कोण?’’

या विषयातील उत्तरे मिळणे सोपे नसते. नियमित साधना जर प्रामाणिकपणे केली तर कठीणही नसते. म्हणून शिष्याकडे चिकाटी असणे आवश्यक असते आणि ती देवांकडे होती.

काही काळ गेला आणि देव परत एकदा गुरुकडे आले व म्हणाले, ‘‘गुरुजी, मी म्हणजे आत्मा.’’ गुरुजींनी विचारले, ‘‘असे का म्हणता तुम्ही?’’

देव म्हणाले, ‘‘कारण आत्मा अजर, अमर आणि अविनाशी असतो.’’

गुरुजींनी म्हटले, ‘‘बरोबर आहे. मी सांगितले होते की तुम्ही नश्‍वर आहार. मी तुम्हाला हा मूळ मुद्दा सांगितला होता. तुम्ही ध्यान केले म्हणून तुम्हाला बरोबर उत्तर मिळाले’’.

आपणही शास्त्रशुद्ध ध्यान केले तर जीवनातल्या समस्यांची उत्तरे वेळोवेळी मिळतील. जी गोष्ट देवांना साध्य झाली ती आम्हालादेखील होणार. सगळी उत्तरे पुस्तकात किंवा गुरुकडून मिळणार नाहीत. ध्यानात आपली आत्मशक्ती वाढते कारण आपला योग म्हणजे जोडणे हे प्रत्यक्ष भगवंताशी होते.

शेवटी प्रत्येकाने ठरवायला हवे – ‘मी कोण होणार?’

* भोग-विलासात रमणारा असुर की आत्मज्ञान मिळवून मोक्ष- मुक्ती मिळवणारा शुद्धात्मा? पवित्र आत्मा?

श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला त्याची ओळख करून देताना श्रीकृष्ण सांगतात-

 

* नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः |

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः |(गीता २.२३)

 

– शस्त्रे आत्म्याला तोडू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वायू त्याला सुकवू शकत नाही.

 

* अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च |

नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २.२४)

 

– कधीही न तोडता येणारा, न जळणारा, न भिजणारा, न सुकणारा असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी, स्थिर, अचल, सनातन आहे.

आत्म्याबद्दल हे सर्व सांगण्याआधी भगवंत शरीर म्हणजे काय याचे ज्ञान पार्थाला देतात-

* वासांसि जीर्णानि यथा विहाय |

नवानि गृह्णाति नरोऽपराणि |

तथा शरीराणि विहाय जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ (गीता २.२२)

 

– ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवी वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणे देही म्हणजे जीवात्मा जुनी शरीरे टाकून नवी धारण करतो.

देवाना ध्यान करून प्राप्त झालेले ज्ञान मनुष्य विसरला. शरीरच सर्वस्व आहे म्हणून त्याच्या भोगांमध्ये व्यस्त झाला. म्हणून स्वतः भगवंत श्रीकृष्णावतार घेऊन आले व हे ज्ञान आम्हाला दिले. आम्हाला आता हे ज्ञान मिळवण्यासाठी ध्यानाची गरज नाही. गरज आहे ती आत्मानुभूती अनुभव करण्याची. मग योगसाधक तयार आहेत ना यासाठी?