>> कोविड-१९ च्या साधनसुविधांसाठी निधी
केंद्रीय खाण मंत्रालयाने जिल्हा मिनरल फंडातून कोविड-१९ हॉस्पिटल व वैद्यकीय साधन सुविधा उभारण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून कर्नाटकातून गोव्यात कडधान्य घेऊन येणारी वाहने सोडण्यास मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच राज्यातील औषधाच्या तुटवड्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
खाजगी कंपन्यात काम करणार्या कर्मचार्यांना त्यांचा पगार द्यावा असे निर्देश केंद्राने दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोव्यात औषधांचा तुटवडा भासू लागला असून अन्न आणि औषध संचालनालयाकडून संबंधित घाऊक औषध पुरवठादारांशी औषधाच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून भुसारी सामान घेऊन येणार्या वाहनांना वाहतुकीसाठी मान्यता मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यासाठी धान्याचा साठा सुरळीत करण्यावर भर दिली जात आहे. गावांगावातील पिठाच्या गिरणी चालू करण्याची सूचना करण्यात आली आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाच्या १२०० विक्री केंद्रातून २६८ टन भाजीचे वितरण काल करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
१६०० विदेशी नागरिक गोव्यात अडकून
सुमारे १६०० विदेशी नागरिक गोव्यात अडकून पडले आहे. संबंधित देशाकडून त्यांना परत नेण्याची व्यवस्था आगामी काही दिवसात केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्य सरकारचे ६० टक्के कर्मचारी कार्यरत आहे. हे कर्मचारी कार्यालयात बसून कामकाज करीत नाहीत. तर, नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी (फिल्ड) कार्यरत आहेत. सरकारच्या सचिवांबरोबरच वरिष्ठ, कनिष्ठ अधिकार्यांकडे महत्त्वाच्या कामाच्या जबाबदार्या सोपविण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
परराज्यातील कामगारांची दोन छावण्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. काही कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी परवानगी मागत आहेत. त्यांना १४ एप्रिलपर्यंत येथेच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. या कामगारांची पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी आणखी काही दिवस राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या कामगारांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
स्वयंसेवकांबाबत कोणतेही राजकारण नाही
सरकारने नियुक्त केलेले सरपंच. पंच सदस्य तसेच आमदारांनी नियुक्त केलेल्या स्वंयसेवकांची संख्या जास्त असल्याने पोलीस खात्याकडे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात कोणतेही राजकारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सीमा सील केलेल्या असल्याने औषध निर्मिती कंपन्यांना परराज्यातील कामगार आणता येणार नाहीत. स्थानिक कामगार घेऊन कामकाज केले पाहिजे. गोव्याच्या सीमेवरील गावातील कामगारांना प्रवेश दिला जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना संशयितांची प्रकृती स्थिर
राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. नव्याने कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कांतील सर्वांना क्लारांटाईन करण्यात आले आहेत. तर, विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. क्लारांटाईन करण्यात येणार्या नागरिकांवर बीएलओकडून देखरेख ठेवली जात आहे. कोरोना हॉस्पिटल आणि तपासणी प्रयोगशाळा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. केंद्रीय पातळीवरून प्रयोगशाळेला मान्यता मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.