>> चर्चिल आलेमाव यांचे पंतप्रधानांना पत्र
विदेशी जहाजांवर काम करणारे कित्येक गोमंतकीय कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अडकून पडलेले आहेत. विदेशात अडकून पडलेल्या या गोमंतकीय बांधवांना गोव्यात आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी करणारे एक पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून त्याची एक प्रत गृहमंत्री अमित शहा यांना पाठवली आहे.
दि. २९ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या या पत्रातून आलेमाव यांनी विदेशी जहाजांवर (युरोप व अमेरिकी जहाजे) काम करणारे हे गोमंतकीय सध्या कोरोनामुळे संकटात सापडले आहेत. त्यांना गोव्यात परत यायचे आहे. पण या संकटाच्या काळात त्यांना गोव्यात परतण्यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही. कित्येक राष्ट्रांनी कोरोनामुळे लॉकडाऊन केलेले असल्यामुळे भारत सरकारच्या मदतीशिवाय हे गोमंतकीय आपल्या मायभूमीत परत येऊ शकणार नाहीत असे म्हटले आहे.