>> मुख्यमंत्री सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
राज्यात आत्तापर्यंत एकही कोरोना विषाणू प्रोझेटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. तरी, कोरोना विषाणू संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांच्या आरोग्याच्या हितार्थ जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक रितीने अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. राज्यात एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नये म्हणून जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. तसेच, राज्याच्या सीमा सील करण्याबाबत सचिव पातळीवर बोलणी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोविड-१९ चा फैलाव रोखण्याबाबतच्या उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्सफरन्सच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत पत्रकारांशी बोलत होते. राज्यात आत्तापर्यंत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नसली तरीही योग्य सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे. निवडणुकीपेक्षा लोकांच्या आरोग्याचे रक्षण महत्त्वाचे असल्याने जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी परत प्रचाराला वेळ दिला जाणार नाही. राज्य निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून मतदानाची तारीख जाहीर केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनंतर नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
परराज्यातील पर्यटकांनी तूर्त राज्यात येऊ नये. नागरिकांनीसुध्दा प्रवास टाळावा. विमानतळ, रेल्वे स्थानकावर आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील १८ ते १९ खासगी इस्पितळाशी कोरोना संशयित रुग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात अन्नधान्य परराज्यातून आणले जात आहे. त्यामुळे राज्याच्या सीमा सील करण्याबाबत सचिव पाळीवर बोलणी सुरू आहे. धार्मिक उत्सव, लग्न समारंभात जास्त माणसांनी एकत्र येऊ नये. लग्न सोहळा निकटच्या कुटुंबीयासमवेत आयोजित करावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवार २२ मार्चला देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या हाकेला जोरदार प्रतिसाद द्यावा. राज्यातील खासगी कंपनीसुद्धा या हाकेला प्रतिसाद द्यावा. राज्य सरकार कुणालाही सक्ती करू शकत नाही. नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग घ्यावा, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
विश्वजित राणे
लोकांची गर्दी टाळण्यासाठी १४४ कलम लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परराज्यातील चारचाकी वाहनातून येणार्या पर्यटकांवर बंदी घालण्याची गरज आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. कोरोनापासून सुरक्षेसाठी नवनवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली जात आहेत. कोरोना विषाणूच्या नमुन्याची तपासणी करण्यासाठी खास प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंजुरी दिली आहे. प्रयोगशाळेच्या कामाला गती दिली जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.