मीराबाई, जेरमी ऑलिंपिकसाठी पात्र

0
139

कोरोना विषाणूंमुळे ऑलिंपिकसाठीच्या वेटलिफ्टिंग पात्रता स्पर्धांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. या पात्रता स्पर्धा झाल्या किंवा झाल्या नाहीत तरीसुद्धा मीराबाई चानू व जेरमी लालरिनुंगा ही दुकली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार हे जवळपास नक्की आहे.

कोरोना विषाणूंमुळे ताश्कंतमधील ऑलिंपिकसाठीची शेवटची खंडीय पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर आहे. नवीन पात्रता नियमांनुसार मीराबाईने सहा पैकी पाच पात्रता स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या कार्यकारी समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनशी (आयओसी) १७ व १८ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीत महासंघाने आयओसीला पात्रता स्पर्धांबद्दल काही शिफारसी केल्या आहेत. यातील प्रमुख शिफारस म्हणजे ऑलिंपिक पात्रता प्रक्रिया बंद करण्याची आहे. महासंघाची ही विनंती आयओसीने मान्य केल्यास वर्तमान क्रमवारीच्या आधारे खेळाडूंंना स्थान देण्यात येणार आहे.

‘मीराबाई क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर आहे. ऑलिंपिक पात्रता कालावधी समाप्तीनंतर पहिल्या आठ स्थानावर राहणारे खेळाडू पात्र ठरतात’, असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी काल शुक्रवारी सांगितले. राखी हल्दर (महिला ६४ किलो वजनी गट) हिचा ऑलिंपिक प्रवेश मात्र गॅसवर आहे. आशियाई स्पर्धा रद्द झाल्याचा जबर फटका दिला बसला आहे. मीराबाईने पाच स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. ताश्कंत येथील स्पर्धा रद्द करावी लागली. यापुढे पात्रता स्पर्धा होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मीराबाईचा ऑलिंपिक प्रवेश नक्की झाल्याचे यादव यांनी पुढे बोलताना सांगितले.

नवीन नियमानुसार वेटलिफ्टरला नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९, मे २०१९ ते ऑक्टोबर २०१९ व नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२० या तीन सहामाहींमध्ये किमान प्रत्येकी एका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणे अनिवार्य होते. तसेच गोल्ड व सिल्वर दर्जाच्या प्रत्येकी एका स्पर्धेमधील सहभागही अनिवार्य होता. २५ वर्षीय चानूने ३८६९ रोबी गुण मिळविले आहेत. होव झिहुई (चीन, ४७०३) व री सोंग गम (उ. कोरिया, ४२०९) अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानावर आहे.
१७ वर्षीय जेरमी (पुरुष ६७ किलो वजनी गट) याने २०१८ युथ ऑलिंपिक स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात अव्वल स्थान मिळविले होते. ऑलिंपिकमध्ये प्रत्येक वजनी गटात प्रत्येकी १४ खेळाडू असतात. क्रमवारीतील आघाडीच्या ८ खेळाडूंसह प्रत्येक खंडात (५ खंड) क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूला स्थान मिळते. आशियाई क्रमवारीत जेरमी पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे महासंघाची शिफारस मान्य केल्यास जेरमी आपली पहिली ऑलिंपिक स्पर्धा खेळू शकतो. आशियाई क्रमवारीत जेरमीचे ३११९ रोबी गुण तर दुसर्‍या स्थानावर असलेल्या सौदी अरेबियाच्या मोहम्मद अलमझादी नवाफ याचे २६७२ गुण आहेत.

वेटलिफ्टिंगमधील चौदावे स्थान यजमान देशातील खेळाडूला दिले जाते. यजमान देशातील खेळाडू पात्र न ठरल्यास ट्रिपरटाईट कमिशन पद्धतीद्वारे या खेळाडूंना स्थान मिळते.