परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यात इराणमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. दरम्यान, भारतात ताज्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण १५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीय नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये २५५ भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. या व्यतिरिक्त हॉंगकॉंगमध्ये १, इटलीत ५, कुवैत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ आणि सौदी अरबमध्ये १२ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.
इराणमधून ५०९ जणांना आणले
यापूर्वी इराणमधील तेहरान येथून एकूण २०१ भारतीयांना बुधवारी विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले. आतापर्यंत इराणमधून एकूण ५०९ भारतीयांना परत आणले गेले आहे. या सर्व लोकांना राजस्थान येथील जैसलमेर येथे क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे.