एफसीविरुद्ध यशस्वी प्रतिआक्रमण रचत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील दुसर्या टप्यात घरच्या मैदानावर ३-१ अशा विजयासह एटीकेने आव्हान राखले. ३-२ अशा ऍग्रीगेटसह एटीकेने आगेकूच केली. आता त्यांची लढत येत्या शनिवारी (दिनांक १४ मार्च) चेन्नईन एफसीविरुद्ध गोव्यात होईल.
एटीकेला पहिल्या टप्यात बंगळुरूविरुद्ध एकमेव गोलने पराभूत व्हावे लागले होते. दुसर्या टप्यात एटीकेचा संघ पाचव्याच मिनिटाला पिछाडीवर पडला. त्यामुळे त्यांच्यावर दडपण आले होते, पण एटीकेने ५० हजार १०२ प्रेक्षकांच्या साक्षीने स्पेनचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार खेळ केला. रॉय कृष्णाने (३०वे मिनिट) बरोबरी साधून दिल्यानंतर डेव्हिड विल्यम्स (६३वे मिनिट पेनल्टी व ७९वे मिनिट) याने पेनल्टीसह दोन गोल केले. त्यामुळे कार्लेस कुआद्रात यांच्या बंगळुरू संघाची निराशा झाली. घरच्या मैदानावर आघाडी घेऊन आणि मग प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर आधी खाते उघडूनही बंगळुरू फायदा उठवू शकला नाही.
विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर यजमान एटीकेला पाचव्याच मिनिटाला धक्का बसला. बंगळुरूचा बचावपटू फ्रान्सिस्को बोर्जेस याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित प्रतिआक्रमण रचले. त्याने उजवीकडून घोडदौड करणारा आघाडी फळीतील सहकारी आशिकला पास दिला. आशिकने मग एटीकेचा बचावपटू सुमित राठी याला चकवून गोल क्षेत्रात मुसंडी मारली. मग त्याने एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला यशस्वी शह देत गोल नोंदविला.
फिजीचा खेळाडू रॉय कृष्णा याने एटीकेला ३०व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. आघाडी फळीतील सहकारी डेव्हिड विल्यम्स याच्या क्रॉस पासवर त्याने उजवीकडून शानदार फिनिशिंग केले. मध्यंतरास १-१ अशी बरोबरी कायम होती.
एका तासाच्या खेळानंतर बंगळुरूचा सुरेश वांगजाम याने गोलक्षेत्रात एटीकेच्या विल्यम्सला पाडले. त्यामुळे एटीकेला पेनल्टी बहाल करण्यात आली. ती सत्कारणी लावताना विल्यम्सने बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा बचाव भेदण्याचा पराक्रम केला. विल्यम्सनेच ७९व्या मिनिटाला एटीकेला एकूण लढतीत प्रथमच आघाडी मिळवून दिली. बचावपटू प्रबीर दास याने रचलेल्या चालीवर त्याने सफाईदार हेडिंगवर लक्ष्य साधले. अंतिम टप्यात बंगळुरूला डिमास डेल्गाडो याचे फ्री कीकवरील कौशल्य तारू शकले नाही. एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला बचाव फळीतील सहकार्यांनी चिवट साथ दिली. त्यामुळे एटीकेचे नेट सुरक्षित राहिले.