निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातल्या चारही दोषींना २० मार्च रोजी फाशी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केली आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फासावर लटकावण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे निर्भयाच्या दोषींवर काढण्यात आलेलं हे चौथे डेथ वॉरंट आहे. फाशी जाण्यापूर्वी कोर्टाच्या नियमानुसार सर्व दोषी आपापल्या वकिलांची भेट घेऊ शकतात.
या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी अद्यापही कायदेशीर पर्याय बाकी असल्याचा दावा केला आहे. मात्र कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, या नव्या तारीख निश्चितीनंतर फाशीपासून वाचण्यासाठी दोषींकडे आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
दुसरीकडे, निर्भयाची आई आशा देवी यांनी न्यायालयीन निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. फाशी लांबवण्यासाठी ते अजून पर्याय वापरू शकतील मात्र एक दिवस हे दोषी नक्की फासावर जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.