म्हापशात एकाच कुटुंबातील ४ मृतावस्थेत

0
137

>> सामूहिक आत्महत्येने गोवा हादरला
>> आर्थिक संकटांमुळे टोकाचे पाऊल

खोर्ली – म्हापसा येथील गॉडस् गिफ्ट या इमारतीमध्ये शाहू धुमाळे (४५), त्यांची पत्नी कविता धुमाळे (३८) व त्यांचे दोन पुत्र पारस (१०) आणि साईराज (३) हे मूळ आजरा (जि. कोल्हापूर) येथील कुटुंब काल मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली. शाहू यांचा मृतदेह छताला टांगलेल्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत आढळून आला, तर अन्य तिघांचे मृतदेह झोपण्याच्या खोलीत जमिनीवर आढळून आले. मृतदेहांवर कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत, परंतु पोलिसांना एक पत्र आढळल्याचे वृत्त आहे.

काल सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना उघडकीस आली. शाहू धुमाळे हे काही वर्षांपूर्वीच नोकरीनिमित्ताने गोव्यात स्थायिक झाले होते. सुरक्षा रक्षक सुपरवायजर म्हणून ते काम करत होते. त्यांनी अनेक बँकांतून कर्जे काढली होती. तसेच अनेकांचे ते देणे होते अशी माहिती मिळाली आहे. आर्थिक ताणतणावांतूनच त्यांनी आपल्या कुटुंबियांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मराठीतून त्यांनी लिहिलेले चार पानी पत्र सापडले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून शाहू हे याच फ्लॅटमध्ये प्रथम भाड्याने रहात होते. नंतर त्यांनी हा फ्लॅट विकत घेतला. दहा वर्षांपूर्वी नेसरी गडहिंग्लज येथील कविता कांजोळे (आत्ताच्या कविता धुमाळे) यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. गेल्याच महिन्यात ते रहात असलेला हा फ्लॅट एका ख्रिश्‍चन व्यक्तीस त्यांनी विकला होता. मात्र आपण आणखी एक महिना यामध्ये रहातो असे शाहू यांनी त्या व्यक्तीस सांगितले होते. सोमवारी सदर व्यक्ती त्या ठिकाणी आली असता त्यांना दोन्ही मुले खेळत असल्याचे त्यांनी पाहिले होते व काल मंगळवारी ही घटना घडली.

दरम्यान, काल मंगळवारी सकाळी ९ या दरम्यान, शाहू यांचा मेहुणा लक्ष्मण कांजोळे हे त्यांच्या घरी आल्याची माहिती लक्ष्मण यांनीच पोलिसांना दिली. दरवाजातून हाक मारली असता कोणीही आतून प्रतिसाद न दिल्याने लक्ष्मण यांनीच पोलिसांना याबाबत खबर दिली व त्यानंतर म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. त्यानंतर पोलिसांनी दार उघडले असता आत शाहू, त्यांच्या पत्नी व दोन मुले मृतावस्थेत आढळून आले.

पोलिसांनी सर्व मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. मृतांच्या नातलगांशीही संपर्क साधण्यात आला. शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले. म्हापसा पोलिसांनी अनैर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांना दुर्घटनास्थळी एक विस्तृत पत्र सापडले असून त्याच्या मजकुराच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. पत्रातील मजकूर सविस्तर असून त्याच्या सत्यतेची शहानिशा करण्यात येत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली. या पत्रामध्ये अनेक इतर बाबीही नमूद करण्यात आल्या असून त्या सर्व अंगांनी झाल्या प्रकाराचा तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले.