अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीचे फलित म्हणून तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती आणि तीन समझोता करार आणि एक सहकार्य पत्रावर प्रत्यक्षात शिक्कामोर्तब झाल्याचे भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. ज्या तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक व्यवहाराविषयी ट्रम्प यांनी वारंवार सांगितले, तो २४ एमएच ६० रोमिओ हेलिकॉप्टर व सहा अपाचे हेलिकॉप्टर यांचा खरेदी व्यवहार ही भारत सरकारसाठी ट्रम्प यांच्या या भेटीची एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. अमेरिका हा संरक्षणक्षेत्रासाठीचा एक मोठा पुरवठादार देश म्हणून गेल्या काही वर्षांत समोर आलेला आहे. गेले जवळजवळ एक दशक अमेरिकेने वीस अब्ज डॉलरची संरक्षणविषयक सामुग्री भारताला पुरवली. प्रस्तुत तीन अब्ज डॉलर मूल्याच्या साधनसामुग्रीद्वारे दोन्ही देशांतील हे नाते अधिक बळकट बनले आहे हे निश्चित. भारत आणि अमेरिका संरक्षणक्षेत्रामध्ये एकमेकांच्या अधिक जवळ आलेले आहेत. उभय देशांच्या तिन्ही सेनादलांनी गतवर्षी ‘टायगर ट्रायम्फ’ ही संयुक्त लष्करी कवायत केली होती. अत्याधुनिक युद्धसामुग्रीचा निर्माता असलेल्या अमेरिकेला भारताच्या संरक्षणविषयक गरजांची पुरेपूर जाण आहे. मध्यंतरी फ्रान्सकडून भारताने राफेलची थेट खरेदी केली. रशियाकडून युद्धसामुग्रीही भारताने मिळवली आहे. रशियाशी भारताचा संरक्षण खरेदी व्यवहार साडेचौदा अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे अमेरिका संरक्षण खरेदी व्यवहारामध्ये आपले अग्रस्थान कायम राखू इच्छिणे साहजिक आहे. ट्रम्प यांच्या भेटीचे म्हणूनच हा संरक्षणविषयक व्यवहार हे प्रमुख अंग राहिले. भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकाळ प्रलंबित असलेला आणि मध्यंतरी विवादाचे कारण ठरलेला दुसरा विषय म्हणजे व्यापार. भारत आणि अमेरिकेच्या व्यापाराचा विचार करता भारताकडून आयातीपेक्षा अमेरिकेत निर्यात अधिक होत असते. अमेरिकेला हा असमतोल संपवायचा आहे. त्यामुळे ती सातत्याने भारतावर दबाव टाकत आली आहे. भारताशी एक मोठा व्यापारी करार पुढील काळापर्यंत लांबणीवर टाकण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी या भारतभेटीपूर्वीच करून त्यासंदर्भातील चर्चेला विराम दिला होता, त्यामुळे त्यासंदर्भात काही निर्णय या भेटीत झालेला नसला तरी ही चर्चा प्रगतिपथावर आहे असे ते म्हणाले आहेत. जे समझोता करार दोन्ही देशांदरम्यान ट्रम्प यांच्या या भारतभेटीदरम्यान प्रत्यक्षात झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले आहे, त्यामध्ये दोन्ही देशांच्या आरोग्य मंत्रालयांदरम्यान मानसिक आरोग्यविषयक समझोता कराराचा समावेश आहे. त्याच जोडीने वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षेसंबंधी भारताच्या आरोग्य मंत्रालयाखालील अन्न व औषध प्रशासन आणि अमेरिकेच्या आरोग्य व मानवीसेवा संचालनालयादरम्यानही समझोता करार झालेला आहे. तिसरा सहकार्य करार झाला आहे तो ऊर्जा क्षेत्रामध्ये. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अमेरिकेच्या चार्ट इंडस्ट्रीजशी केलेला करार हा एलएनजी वायूवाहिन्यांसंदर्भातील आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेकडून भारतामध्ये कच्चे तेल व वायूची आयात होत नसे, परंतु इराणवरील निर्बंध, व्हेनेझुएलाकडून होणार्या कच्चे तेल खरेदीविरोधातील दबाव यातून अमेरिकेने आपल्या तेल व वायूची खरेदी करण्यास भारताला भाग पाडले आहे. सध्या भारताला त्यासंदर्भात सवलती जरी दिल्या गेलेल्या असल्या तरी त्या भविष्यात कायम राहतील असे नाही, परंतु भारताच्या ऊर्जा संसाधनांच्या प्रचंड मागणीवर डोळा ठेवून अमेरिकेने या क्षेत्रामध्ये सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे हे येथे उल्लेखनीय आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान ट्रम्प यांच्या या भारतभेटीदरम्यान ज्या क्षेत्रांसंबंधी चर्चा झाल्याचे भारत सरकारने जाहीर केेले त्यामध्ये अमली पदार्थविषयक कृतिगटाच्या स्थापनेचाही समावेश आहे. शिवाय उभय देशांच्या जनतेदरम्यान संपर्क व संवाद वाढावा यासाठीही प्रयत्न करण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या भारतभेटीदरम्यानच्या त्यांच्या एका विधानाकडे मात्र दुर्लक्ष करता येत नाही. अहमदाबादेतील स्वागत समारंभात त्यांनी इस्लामी दहशतवादाविरुद्ध लढण्याची ग्वाही देतानाच पाकिस्तान हा आपला चांगला मित्रदेश असल्याची जी स्तुतीसुमने उधळली ती बोलकी आहेत. अमेरिकेच्या तालिबानशी अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमधील राजकारणासाठी पाकिस्तानची मदत अमेरिकेसाठी अपरिहार्य आहे. त्यामुळे पाकला चुचकारण्याची नीती त्यांनी काही सोडलेली नाही हेही ट्रम्प यांच्या या दौर्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र, पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा निर्धार काल त्यांनी पुन्हा एकवार व्यक्त केला हेही नसे थोडके. ट्रम्प यांच्या या भारतभेटीतून भारताच्या पदरात फार काही पडले आहे असे नव्हे, परंतु दोन्ही देश यापुढील काळात एकजुटीने वावरतील अशी आशा मात्र ट्रम्प यांच्या या दिमाखदार दौर्याने जागली आहे.