नौदलाचे लढाऊ विमान गोव्यानजीक कोसळले

0
153

>> वैमानिकाने केला स्वत:चा सुखरुप बचाव

भारतीय नौदलाच्या मिग-२९ के या लढाऊ विमानाला रविवारी गोव्यात किनारी भागात अपघात होऊन विमान कोसळले. मात्र, यावेळी वैमानिकाने सुरक्षितपणे विमानातून बाहेर उडी घेण्यात यश मिळवल्याने जीवित हानी टळली.

सदर विमानाने काल सकाळी १०.३० वा. कारवार येथील विक्रमादित्य या प्रशिक्षण तळावरून उड्डाण केले होते. मात्र, नंतर हे विमान गोव्यातील किनारपट्टीपासून काही अंतरावर समुद्रात कोसळले व त्या आधीच वैमानिकाने विमानातून सुरक्षितपणे बाहेर उडी घेण्यात यश मिळवले, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली. नौदलाने या विमानाच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही प्रवक्त्यांने दिली. नौदलाच्या सूत्रांनी काल ट्विटद्वारेही या अपघाताची माहिती दिली आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळले असावे असा अंदाज आहे.

गेल्या १६ नोव्हेंबर रोजीही गोव्यात अशाच प्रकारे मिग-२९ के विमान अपघातग्रस्त झाले होते. त्यावेळी मिग वेर्णा गावातील एका खडकाळ माळरानावर कोसळले होते. त्यावेळी ते विमान दाट लोकवस्तीवर न कोसळल्याने मोठी हानी टळली होती. हा अपघात विमानाला पक्षाची धडक बसल्याने झाला होता.

२०१८ सालीही गोव्यात मिग-२९ के विमानाला अपघात झाला होता. त्यावेळी विमान धावपट्टीवरून घसरून आय्‌एन्‌एस हंसा तळावर कोसळले होते. वैमानिकानी सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यश मिळवल्याने त्यावेळीही जीवितहानी टळली होती.