जि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी

0
161
>> सविस्तर कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू
>> मतपत्रिकेद्वारे मतदान, २३ मार्च रोजी मतमोजणी
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत काल जाहीर केला. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च २०२० रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दि. २७ फेब्रुवारी ते दि. ५ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२० पासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असून ती दि. २३ मार्च २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांनी दिली.
जिल्हा पंचायतीसाठी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांपैकी ३० जागा महिला, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती यांच्यासाठी राखीव आहेत. उमेदवारी अर्ज २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. १ मार्चला उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. खुल्या गटातील उमेदवाराकडून ५०० रुपये आणि राखीव गटातील उमेदवाराकडून ३०० रुपये अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे. ६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ७ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. या निवडणुकीसाठी १५ निवडणूक अधिकारी आणि १५ साहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना ५ लाख रुपये खर्चाचे बंधन घालण्यात आले आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दररोज तपासणी केली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी १५ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहेत. तसेच उमेदवारांच्या खर्चाची तपासणीसाठी १५ खर्च तपासणी निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी ९५०० सरकारी व पोलीस कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या काळात मतदानाची टक्केवारी मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवर अंदाजे ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाने वर्षभरापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीसंबंधी सरकारला कळवून निवडणुकीसाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना केली होती. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १५ मार्च ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती. तथापि, राज्य सरकारच्या विनंतीनुसार २२ मार्चला निवडणूक घेण्याचे निश्‍चित केले. या निवडणुकीत मतदारसंघ राखीवता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे, असेही आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला निवडणूक आयोगाचे सचिव मेल्वीन वाझ, विशेष अधिकारी गुरूदास देसाई, डॉ. दुर्गा प्रसाद, नोडल अधिकारी सागर गुरव यांची उपस्थिती होती.
भाजप उमेदवारांची नावे २६पर्यंत ः तानावडे
भाजप जिल्हा पंचायतीच्या ५० जागा लढविणार आहे. काही जागांवर समविचारी उमेदवार किंवा पक्षांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. भाजपच्या जिल्हा पंचायत उमेदवारांची नावे २६ फेब्रुवारीपर्यंत निश्‍चित करून जाहीर केली जाणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेस पक्षाकडे निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्याने निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे, असा आरोप तानावडे यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाला लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही. कॉंग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निवडक लोक एकत्र येऊन केवळ सरकारवर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून तानावडे यांनी, ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची सेमी किंवा क्वाटर फायनल नाही, असा दावा केला.
निवडणूक कार्यक्रम
१. उमेदवारी अर्ज स्वीकारणे अंतिम तारीख गुरुवार ५ मार्च २०२०.
२. उमेदवारी अर्जांची छाननी – शुक्रवार ६ मार्च २०२०
३. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार ७ मार्च २०२०.
४. मतदान – रविवार २२ मार्च सकाळी ८ ते संध्याकाळी ५
५. मतमोजणी – सोमवार २३ मार्च २०२०.
एकूण मतदार – ८२९८७६
उत्तर गोवा – ४१८२२५
( पुरुष – २०४२३०, महिला – २१३९९५)
दक्षिण गोवा – ४११६५१
( पुरुष – २०००४१, महिला – २११६१०)
मतदान केंद्रे – १२३७
( उत्तर गोवा – ६४१- दक्षिण गोवा ५९६)
जिल्हा पंचायत राखीवता
उत्तर गोवा
धारगळ – अनुसूचित जाती,
तोरसे – महिला,
शिवोली – महिला,
हळदोणे – इतर मागासवर्गीय महिला,
हणजूण – महिला,
कळंगुट – इतर मागासवर्गीय,
रेईश मागूश – इतर मागासवर्गीय,
पेन्ह द फ्रान्स – इतर मागासवर्गीय महिला,
ताळगाव – महिला,
खोर्ली – इतर मागासवर्गीय,
लाटंबार्से – इतर मागासवर्गीय,
कारापूर – सर्वण – इतर मागासवर्गीय,
पाळी – अनुसूचित जमाती,
केरी (सत्तरी) – महिला,
नगरगाव – इतर मागासवर्गीय महिला.
दक्षिण गोवा
उसगाव गांजे – अनुसूचित जमाती,
बेतकी खांडोळा – इतर मागासवर्गीय,
कुर्टी – इतर मागासवर्गीय महिला,
वेलिंग – इतर मागासवर्गीय,
शिरोडा – अनुसूचित जमाती,
नूवे – अनुसूचित जमातीतील महिला,
कोलवा – इतर मागासवर्गीय महिला,
वेळ्ळी – इतर मागासवर्गीय,
बाणावली – इतर मागासवर्गीय,
गिरदोली – महिला,
कुडतरी – महिला,
धारबांदोडा – महिला,
पैंगीण – अनुसूचित जमातीतील महिला,
सांकवाळ – महिला,
कुठ्ठाळी – अनुसूचित जमाती.