पणजी कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गाने नेण्यास पोलिसांची हरकत

0
142

>> आज जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक

शनिवार दि. २२ पासून सुरू होणार्‍या पणजी कार्निव्हलची चित्ररथ मिरवणूक जुन्या मार्गावरून काढण्यास पोलिसांनी हरकत घेतलेली आहे. त्यामुळे कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गावरूनच काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पणजी महापालिकेने उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी मेनका यांनी आज गुरूवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला आमदार बाबुश मोन्सेर्रात हजर राहणार आहेत. अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

दरम्यान, पणजी कार्निव्हल महोत्सवासाठीची तयारी जोरात सुरू असून कार्निव्हलनिमित्त पणजी शहरात सुशोभिकरणासाठीचे काम यापूर्वीच सुरू झाले असल्याचे ते म्हणाले.

मांडवीवरील तिसर्‍या रस्त्याचे काम चालू होते ते काम संपलेले असल्याने या मार्गावरून मिरवणूक काढण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मडकईकर यांनी सांगितले.