गोमेकॉत सुपर स्पेशालिटी विभागाचे सहा महिन्यांत उद्घाटन ः विश्‍वजित

0
105

प्रधान मंत्री स्वास्थ्य् सुरक्षा योजनेखाली (पीएमएसएसवाय) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळाच्या बाजूला उभारण्यात येत असलेले सुपर स्पेशालिटी विभागाचे येत्या सहा महिन्यात उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सुपर स्पेशालिटी विभागाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

या सुपर स्पेशालिटी विभागामुळे रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पावर साधारण ४५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. भाजप सरकारमध्ये आरोग्य मंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर या प्रकल्पाचे बांधकामाला प्रारंभ करण्यात आला. आता या प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नीती आयोग आणि केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या सार्वजनिक व खासगी भागीदारीच्या माध्यमातून हा सुपर स्पेशालिटी विभाग सुरू केला जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

चीनमध्ये प्रवास टाळण्याचा
आरोग्य खात्याचा सल्ला
आरोग्य खात्याने नागरिकांना चीनमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. राज्यात अद्यापपर्यत करोनाचा एकही संशयास्पद रूग्ण आढळून आलेला नाही. सहा जणांच्या रक्ताची पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असून सहाही जणांचे रक्त तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. आरोग्य खात्याकडून चीनमधून आलेल्या ३६ जणांवर देखरेख ठेवली जात आहे. विमानातून येणार्‍या प्रवाशांची विमानळावर तपासणी केली जात आहे. तसेच मुरगाव बंदरातसुद्धा प्रवाशांची तपासणी केली जात आहे. चीनमधून येणार्‍या नागरिकांना वेगळे ठेवले जाणार आहेत, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.