टी-ट्वेंटीत विराटची घसरण

0
120

>> लोकेश राहुल, रोहित शर्मा ‘जैसे थे’

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-ट्वेंटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. लोकेश राहुल (२) व रोहित शर्मा (११) यांच्या स्थानात बदल झालेला नाही.
इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेवरील २-१ अशा विजयात १३६ धावा केलेला इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने ६८७ गुणांसह नववे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे विराट कोहली (६७३) दहाव्या स्थानी फेकला गेला आहे. जांघेच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहितने आपले स्थान टिकवले असून या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानी आहे.

एकदिवसीय क्रमवारीत आपले पहिले स्थान गमावलेला जसप्रीत बुमराह टी-ट्वेंटीत वेस्ट इंडीजच्या शेल्डन कॉटरेलसह संयुक्तपणे १२व्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा चायनामन गोलंदाज तबरेझ शम्सी याने ९ स्थानांची उडी घेत आठव्या स्थानासह ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला. इंग्लंडचा लेगस्पिनर गोलंदाज आदिल रशीद याने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू आंदिले फेहलुकवायोला सातव्या स्थानी ढकलत सहावे स्थान आपल्या नावे केले आहे. दुसर्‍या टी-ट्वेंटीत इंग्लंडला दोन धावांनी थरारक विजय मिळवून दिलेला जलदगती गोलंदाज टॉम करन मालिकेतील पाच बळींच्या जोरावर २८ स्थानांची प्रगती साधत ‘टॉप ३०’मध्ये दाखल झाला आहे. फलंदाजांमध्ये क्विंटन डी कॉक (+ १०, १६वे स्थान), तेंबा बवुमा (+ १२७, ५२वे स्थान), जॉनी बॅअरस्टोव (+ १५, २३वे स्थान), रस्सी वेंडर दुसेन (+ २१, ३७वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. बवुमाने ३ सामन्यांत सलामीला येताना १५३.७५च्या सरासरीने १२३ तर डी कॉकने ३१, ६५ व ३५ धावांची खेळी तीन सामन्यांची मालिकेत केली होती.

डेव्हिड मलानची घसरण झाली असून तरीसुद्धा सहाव्या स्थानासह तो इंग्लंडचा सर्वोत्तम स्थानावरील फलंदाज आहे. गोलंदाजी व अष्टपैलूंच्या यादीत अफगाणचा राशिद खान व मोहम्मद नबी पहिल्या स्थानी कायम आहेत.