केशव स्मृती हायस्कूलने मदर ऑफ मर्सी इंग्लिश हायस्कूलचा ३७ धावांनी पराभव करत दिलीप सरदेसाई आंतरशालेय १६ वर्षांखालील मुरगाव विभागीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. वास्को एमपीटी मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आला. केशव स्मृती हायस्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा संपूर्ण डाव ३३.३ षटकांत १४३ धावांत संपला. त्यांच्या रिशू सिंग याने ४९ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांसह ४२ धावा केल्या. सोहेल खानने ४ चौकार व १ षटकारासह ३८ धावा करत त्याल चांगली साथ दिली. मदर ऑफ मर्सीकडून नागराज यत्तीनामणी याने २९ धावा देत ६ गडी बाद केले.
दर्शन मधुमय याने ३२ धावांत ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. विजयासाठी १४४ धावांचे किरकोळ लक्ष्य असताना मदर ऑफ मर्सीचा डाव ४०.१ षटकांत अवघ्या १०६ धावांत संपला. दर्शन महेंद्रकर (३१) व सीझन थम्मनेन (२७) यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला प्रतिकार करता आला नाही. केशव स्मृतीच्या सोहेल शेखने ३० धावांत ५ व शिवांक देसाईने २३ धावांत ३ गडी बाद केले. केशव स्म-तीचा सोेहेल शेख सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. नेव्हल चिल्ड्रन स्कूलचा अर्श सरदेसाई (सर्वोत्तम फलंदाज), नागराज यत्तीनामणी (सर्वोत्तम गोलंदाज), राहुल वंटामुरी (स्पर्धावीर) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विपुल फडके, संयुक्त सचिव अब्दुल माजिद, दक्षिण गोवा संयोजक रुपेश नाईक. मुरगाव विभाग संयोजक अब्दुल खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले.